माय-लेकराची संघर्षगाथा ‘अग्निदिव्य’ पुस्तकरुपात…

0
1813

रमाबाई कांबळे यांच्या आयुष्यावर लिहिलेले ‘अग्निदिव्य’ हे चरित्रात्मक पुस्तक

एका स्त्रीचा लढा केवळ तिच्या वास्तव जगण्याच्या बाबतीत मर्यादित न राहता ‘अग्नितांडव’ मधून तो ‘अग्निदिव्य’ बनत जातो. म्हणूनच एका स्त्रीचा जीवनप्रवास भावनाविवश करतांना त्याला अनेक छटा आहेत. येथील युवालेखक आशिष निनगुरकर यांनी रमाबाई कांबळे यांच्या आयुष्यावर लिहिलेले ‘अग्निदिव्य’ हे चरित्रात्मक पुस्तक नुकतेच ‘चपराक प्रकाशन’च्या वतीने रसिकवाचकांच्या भेटीला आले आहे…

एका संकटग्रस्त कुटुंबातील स्त्रीला संशयकल्लोळातून कोणत्या अग्निदिव्यातून जावं लागलं, हे सांगणारी ही वास्तव कथा आहे. लागोपाठच्या संकटांनी तिच्या आयुष्याची परवड झाली. त्यातही ती खंबीरपणे उभी राहिली. संकटांशी दोन हात केले. आपल्या मुलासाठी संघर्ष केला. अनंत अडचणींवर मात केली. मुलाला अर्थार्जनासाठी सक्षम केले. त्याच्या पायावर उभं केलं. एका आईचं कर्तव्य पार पाडलं. कुठलाही दोष नसताना, गैरसमजाच्या अग्निदिव्यातून जात तिनं एक महत्त्वाचा टप्पा गाठला. यात आपलं अस्तित्व, ओळख मात्र ती पार विसरून गेली. एका स्त्रीचा स्वतःच्या आस्तित्वासाठी, स्वतःच्या मुलाला हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी दिलेला हा लढा, एक संघर्ष म्हणजेच हे पुस्तक ‘अग्निदिव्य’.रमाबाई कांबळे यांच्या जीवनावर आधारित या पुस्तकाचे लेखन येथील युवालेखक आशिष निनगुरकर यांनी केले असून ‘चपराक प्रकाशन’ ने या पुस्तकाची उत्तम मांडणी केली आहे.


चित्रपट- मालिका क्षेत्रात काम करणारे हरहुन्नरी कलावंत म्हणून ओळख असणार्‍या आशिष निनगुरकर यांच्या आयुष्यात डाक कार्यालयात काम करतांना भेटलेला मित्र म्हणजे अभिषेक कांबळे. रमाबाई यांचा एकुलता एक मुलगा. त्याचा जीवनप्रवास ऐकल्यावर त्यांना राहवले नाही. अभिषेकच्या मनात त्याच्या भूतकाळाविषयी अनेक प्रश्न होते, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आटोकाट प्रयत्न आशिष यांनी चालू केला. मग त्यातून ‘अग्निदिव्य’ हे पुस्तक जन्माला आले. एका महिलेचा संघर्ष, माहेर-सासर जबाबदारी, त्यातून वाढलेल्या अनेक गोष्टी या सर्व परिस्थितीतून एका स्त्रीला कशाप्रकारे सर्व गोष्टींमधून जावे लागते. सासर व माहेरची दोन्ही नाती कशी सांभाळावी लागतात. हे सर्व या पुस्तकातून बारकाईने मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एक स्त्री आपल्यावर आलेल्या सर्व संकटावर कशी मात करते. वेळप्रसंगी पळ न काढता प्रत्येक गोष्टीला कशी सामोरी जाते. तोंड देते, कुणाच्या खोट्या आश्वासनांना बळी पडत नाही. हे या पुस्तकातून वाचायला मिळेल.
प्रत्येकाच्या जीवनात अनेक चढउतार येत असतात. आयुष्य हे असेच चित्रविचित्र गुंतागुंतीचे बनलेले आहे. कुठलाही रस्ता सरळ नसतो आणि सहजसोप्या पद्धतीने काहीच मिळत नसते आणि सहजसोपे काही मिळाले तरी त्याची किंमत नसते. कोणतेही मोठे दुःख झाले तरी आत्महत्या करणे हा शेवट असता कामा नये.सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात, फक्त आपण ती शोधायला हवीत. हे पुस्तक वाचून तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि ती आजच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जगात जगायला बळ देईल.
नात्यांची वस्तुस्थिती कळेल. नुकतेच हे पुस्तक रसिक-वाचकांच्या स्वाधीन झाले आहे.संतोष घोंगडे यांनी विषयाला धरून जबराट असे मुखपृष्ठ या पुस्तकाचे साकारले आहे.‘चपराक प्रकाशन’ चे संपादक-प्रकाशक घनश्याम पाटील यांच्या द्वारे ‘अग्निदिव्य’ पुस्तक कौतुकास पात्र ठरत आहे. चपराक टीमने या पुस्तकाची दर्जेदार निर्मिती केली आहे. पुस्तक 7057292092 सवलतीत म्हणजे अवघ्या 130 रुपयांत भारतात कुठेही उपलब्ध आहे. एका चरित्रात्मक गोष्टीचा संघर्ष वाचून आपल्या आयुष्यातील नकारात्मक गोष्टींना दूर करून सकारात्मकतेची कास धरा.संघर्ष केल्याशिवाय हर्ष मिळत नाही आणि प्रहार झेलल्याशिवाय गळ्यात पडत नाही,हे विधिलिखित सत्य आहे…माय- लेकराची ही संघर्षगाथा युवालेखक आशिष निनगुरकर यांच्या ‘अग्निदिव्य’ या पुस्तकातून वाचतांना तोच संदेश मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here