निमा उपक्रम : ‘ नव्या युगाचे आर्थिक नियोजन ‘ व्याख्यान
युवावार्ता (प्रतिनिधी) – चीनच्या ‘ ग्लोबल टाइम्स ‘ या दैनिकात भारताच्या प्रगतीची प्रशंशा करताना फुदान विद्यापीठातील सेंटर फॉर साउथ एशियन स्टडीचे संचालक झांग जियाडोंग यांनी भारताचा जगात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक असा उल्लेख करताना ‘ भारत खरंच एक मोठी शक्ती ‘ असं म्हटलं आहे. वेगाने विकसित होणाऱ्या या भारतातील म्युच्युअल फंड उद्योगानेही ५० लाख कोटींचा टप्पा नुकताच पार केला असून या उद्योगाची भविष्यकालीन वाटचाल येत्या तीन ते चार वर्षात शंभर लाख कोटींची होईल असा आशावाद कडलग इन्व्हेस्टमेंटचे संचालक सुनील कडलग यांनी व्यक्त केला.
नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) सिन्नर आयोजित “नव्या युगाचे आर्थिक नियोजन” या विषयावर चर्चासत्र निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे व मानद सचिव राजेंद्र अहिरे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले होते, यावेळी आर्थिक सल्लागार सुनील कडलग यांनी भविष्यात शंभर लाख कोटींचा म्युच्युअल फंड होण्याचा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी व्यासपीठावर सुधीर बडगुजर, किरण वाजे, एस. के. नायर, प्रवीण वाबळे, सुभाष कदम, एडलवाईज म्युच्युअल फंडाचे शाखाधिकारी यज्ञेश मराठे, एन . जे. इंडिया इन्व्हेस्ट प्रायव्हेट लिमिटेडचे मनीष पाटील उपस्थित होते.
दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात एस. के. नायर यांनी कार्यक्रमामागचा उद्देश स्पष्ट केला. व्यवसायाच्या धावपळीत उद्योजकांचे आपल्या वैयक्तिक आर्थिक नियोजनाच्या संदर्भात दुर्लक्ष होते. आर्थिक नियोजनाची योग्य दिशा मिळावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात कडलग यांनी भारत देश हा अमृत काळाचा अनुभव घेत असून पुढील वीस वर्ष ही भारताची आहेत असे सांगितले.
भारत हा तरुणांचा देश असून भारताचे वय सरासरी २८.४ आहे.भारताची युवकांची लोकसंख्या ६८ टक्केहून अधिक आहे. भारतातील युवक अधिकाधिक खर्च करतात. त्यामुळे कंपन्यांचा नफा वाढून शेअर बाजार वाढत आहे. त्याचा अनुकूल परिणाम भारतीय अर्थव्यवस्था वृद्धींदरावर व गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वेगाने वाढीवर होतो. शिवाय ज्या देशात खर्च होतो, तोच देश संपत्ती निर्माण करतो. म्हणूनच भविष्यात गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून संपत्ती निर्माण करतील.
उद्योजक हा जगाचा पोशिंदा असून भारताच्या आर्थिक वृद्धी दरात भर घालणारा महत्त्वपूर्ण घटक आहे असा उल्लेख त्यांनी केला. आपल्या पैशांतून आपण झोपेत असतानाही अर्थवृद्धीचे काम झाले पाहिजे. अमेरिका आणि चीनचा इतिहास बघता त्या देशांत अडीच ते पाच ट्रिलियन डॉलरच्या प्रवासात त्या देशांच्या अर्थव्यवस्थेचा विकास झाला होता. तोच ट्रेंड आता भारतात पाहायला मिळत आहे. भारतातील म्युच्युअल फंड उद्योगाने ५० लाख कोटींचा टप्पा ओलांडला असून या उद्योगाची आश्वासक वाटचाल शंभर लाख कोटींकडे चालू आहे असेही ते म्हणाले.भारतीय अर्थव्यवस्था ३.७ ट्रिलीयन डॉलरची असून २ वर्षांत ती ५ ट्रिलीयन डॉलरवर जाईल, आणि २०३० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था सात ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचेल असा आशावादही केंद्र सरकारने व या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. भविष्यात भारताचा आर्थिक वृद्धी दर ७% पेक्षा अधिक असेल व जगाच्या तुलनेत असा वृद्धीदर असणारा भारत आश्वासकरीत्या तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून पुढे येईल. ज्या देशाचा आर्थिक वृद्धीदर अशा प्रकारचा असतो त्याचा उपयोग कंपन्यांची नफा क्षमता वाढण्यात होतो व वाढलेला नफा इक्विटीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना संपत्ती निर्माण करून देतो. त्यामुळे भारत तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून लवकरच उदयास येईल. महागाईवर मात करणारी गुंतवणूक करून आपल्या ध्येयांना आणि स्वप्नांना अर्थ प्राप्त करून देणारी श्रीमंती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रत्येक भारतीयाने इक्विटी मध्ये गुंतवणूक करावी असे आवाहनही त्यांनी केले.
आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यास म्युच्युअल फंड, एसआयपी, शेअर मार्केट, आपत्कालीन निधीसाठी लिक्विड फंड, जीवन संरक्षणासाठी टर्म इन्शुरन्स, आरोग्य विमा, अपघात विमा यांचा प्राधान्याने विचार करणे गरजेचे आहे. आर्थिक नियोजनात आरोग्य विमा नसेल तर अचानक गंभीर आजारपण आल्यावर आपली उपलब्ध सर्व बचत व गुंतवणूक त्यात खर्ची पडू शकते. आर्थिक नियोजनात आयुर्विम्याचे व अपघाती विम्याचे कवच घेतल्यास कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या आकस्मिक निधन किंवा अपघाती कायमस्वरूपी अपंगत्वामुळे येणारे आर्थिक संकटावर मात करणे शक्य होते.
कडलग म्हणाले सध्या गुंतवणूकदार १७ हजार करोडहून अधिक रक्कम प्रतिमाह एसआयपीतून म्युच्युअल फंडात गुंतवतात. उद्योजक हा स्वतःच्या व्यवसायामध्ये प्रामुख्याने पैसा अडकवतो. आपल्या व्यवसायाच्या व्यतिरिक्त अनेक विविध व्यवसायांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान दिलेले आहे ते व्यवसाय सुद्धा अनेक पटींनी वाढले आहेत. आपल्याच व्यवसायाबरोबर गुंतवणुकीच्या माध्यमातून आपण भारताला वेगवान अर्थव्यवस्था म्हणून पुढे आणणाऱ्या व्यवसायाचे भागीदार गुंतवणुकीच्या माध्यमातून होऊ शकतो आणि त्या नफ्याचा लाभ घेऊ शकतो. म्हणूनच म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून गुंतवणूक करणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.
आर्थिक आरोग्यासाठी बचत गुंतवणुकीत परावर्तित करणे महत्वाचे ठरते. कारण नियमित गुंतवणुकीमुळे संपत्ती वाढते व आर्थिक आरोग्य चांगले राहते. यासाठी इच्छा व गरज तसेच बचत व गुंतवणूक यांतील फरक समजावून घेणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.
याप्रसंगी विश्वजित निकम, अनिल सरवार, मिलिंद इंगळे, व्ही वाय वांद्रे, संजय पवार, अरुण खालकर, दत्तात्रय नवले, संतोष भामरे, विजय गोडगे, कैलास इप्पर, उमेश पवार, विजय विघे, राकेश गोजरे, ऋषिकेश आरोटे, सुदर्शन आव्हाड, दारुंटे साहेब, रावसाहेब सोनवणे आदी उद्योजकांनी विचारलेल्या प्रश्नांना सुनील कडलग व यज्ञेश मराठे यांनी उत्तरे दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण वाबळे व आभार प्रदर्शन किरण वाजे यांनी केले.