प्रशासकीय राज असल्याने पुलाच्या कामास वेळकाढूपणा
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर शहरातील स्वामी समर्थ मंदिर ते गंगामाई घाटाकडे जाणारा म्हाळुंगी नदीवरील पूल तुटून दीड वर्षाचा कालावधी उलटला आहे. या पुलासाठी निधी मंजूर होऊनही नव्याने या पुलाची उभारणी करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याच्या आरोप या परिसरातील नागरीकांनी केला आहे. या पुलाचे काम तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी आज शुक्रवारपासून स्वामी समर्थ मंदिराजवळ नागरिक साखळी उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला या पुलाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
तत्कालीन एका कामाच्या चुकीमुळे म्हाळुंगी नदीवरील पूल कोसळला होता. संगमनेर शहरातील अनेक विभागांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल असल्याने या पुलाची बांधणी तातडीने करण्यात यावी अशी मागणी होती. पूल कोसळल्याने या परिसरातील अनेक नागरीकांची मोठी गैरसोय निर्माण झाली. मात्र पालिकेमध्ये प्रशासकीय राज सुरू असल्याने या पुलाच्या कामास वेळकाढूपणा केला जात असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी त्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले होते.
पुलाच्या कामासाठी लागणारा मोठा निधी लक्षात घेता बराच काळ रखडलेल्या या पुलाच्या निर्मितीसाठी निधीवरून तालुक्याचे आमदार बाळासाहेब थोरात आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात रंगलेली जुगलबंदी देखील संगमनेरकरांनी अनुभवली. पुलाच्या निर्मितीसाठी नगरपालिकेच्या सुरू असलेल्या एका कॉम्प्लेक्सच्या कामाचा निधी त्यासाठी वळविण्यात आला. हा निधी वळविण्यात आल्यानंतर मंत्री विखे समर्थकांनी पुलाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याच्या गप्पा देखील मारल्या. मात्र तरी देखील पुलाच्या कामाला अद्यापही सुरुवात झाल्याचे दिसत नाही.
नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्या नंतर वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर जाग आलेल्या पालिका प्रशासनाने या कामासाठीच्या आवश्यक मंजुर्या मिळवत या कामाची निविदा देखील काढली. कामाचा कार्यारंभ आदेशही देण्यात आला. मात्र कोठे माशी जिंकली कोण जाणे? पुलाच्या बांधणीसाठी जुन्या सध्याच्या पुलावर असलेल्या जलवाहिन्या स्थलांतरित करणे आवश्यक आहे मात्र या कामाला देखील अद्याप सुरुवात होत नसल्याने यात प्रशासनाची दिरंगाई दिसून येत आहे. असा आरोप करत म्हाळुंगी पूल बनाव कृती समितीच्यावतीने शुक्रवार सकाळपासून साखळी उपोषणास सुरुवात केली आहे. या आंदोलनात अमोल डुकरे, अमित देव्हारे, अमर कतारी, दिवेकर सर, अनुप म्हाळस, किरण पाटणकर, संकेत पाटणकर यांच्यासह अनेक नागरीक सहभागी होत आहे.