विधिमंडळाच्या नेतेपदी बाळासाहेब थोरात
मुंबई (वृत्तसंस्था)
युवावर्ता – महाराष्ट्रातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदासाठी आमदार विजय वड्डेटीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने या बाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तर विधिमंडळाच्या नेतेपदी बाळासाहेब थोरात यांना कायम ठेवण्यात आले आहे. काँग्रेसकडे चार वर्षांनंतर हे पद आले आहे. त्यामुळे या पदावर कोणाची नियुक्ती होते याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.राज्याच्या राजकारणात सुमारे चार वर्षांनंतर काँग्रेसकडे हे पद चालून आले आहे. काँग्रेसचे अनेक नेते हे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. त्यामुळे या पदासाठी कोणत्याही परिस्थितीत भाजपकडे न जाणार्या नेत्याच्या शोधात पक्षश्रेष्ठी होते. यात पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्याही नावाची चर्चा होती.
मात्र अखेर पक्षश्रेष्ठींनी विजय वड्डेटीवार यांच्या नावाची घोषणा केली असून त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. विधीमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडेच राहणार आहे. बाळासाहेब थोरात यांना हा निर्णय दिल्ली हायकंमाडने कळवला आहे. त्याचबरोबर आता महाराष्ट्राच्या विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी विजय वड्डेटीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक दिवसांच्या चर्चेनंतर पक्षाने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचा दिल्ली व्यार्या झाल्या आहेत.
काँग्रेसमधील दुसर्या फळीतील नेत्याकडे ही जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता याआधी वर्तवण्यात आली होती. त्यानुसार सुनील केदार, विजय वड्डेटीवार, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे यांच्या नावाची देखील चर्चा होती. मात्र, यात वड्डेटीवार यांच्या माध्यमातून जुन्या आणि नव्यांचा मेळ साधण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे.अजित पवारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले होते. या जागेवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडूनही दावा करण्यात येत होता. विधानसभेत ज्याचे सर्वाधिक सदस्य त्याचा विरोधी पक्षनेता असं सूत्र आहे. त्यानुसार, महाविकास आघाडीत आता सर्वाधिक सदस्य काँग्रेसचे असल्याने विरोधी पक्षनेते पदही काँग्रेसला देण्यात आले आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद मिळणार यावरती शिक्कामोर्तब झाले होते.
पावसाळी अधिवेशन या आठवड्यात संपणार आहे. आधीचे दोन आठवडे विरोधी पक्षनेत्याशिवाय हे अधिवेशन पार पडले. त्यामुळे अखेरच्या तीन दिवसांत विरोधी पक्षनेते किती आक्रमक होतात हे पाहावे लागणार आहे. विजय वड्डेटीवार हे एक अक्रमक नेते आहे. त्यांचा पक्षाला किती फायदा होईल हे येणार्या काळात समजणार आहे. मात्र सध्यातरी या विष्यावरचा पडदा पडला आहे.