अन्न व औषध विभागाची कारवाई
संगमनेर
राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्ह्यातील दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न औषध प्रशासनाने दूध संकलन केंद्रासह दूध प्रकल्पांची तपासणी सुरू केली आहे. या तपासणी मोहिमेत अन्न औषध प्रशासनाने चालू आठवड्यात संगमनेर, पारनेर, राहुरी, श्रीगोंदा, श्रीरामपूरमध्ये दुधाची तपासणी केली असून यात दूध संकलन केंद्र अथवा प्रकल्प या ठिकाणाहून 14 दुधाचे नमुने, संगमनेरमध्ये 19 किलो गायीचे तूप यासह 7 ठिकाणी वजनमापन शास्त्र विभागाच्या नियमानुसार 7 ठिकाणी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आणखी आठ दिवस अन्न व औषध विभागाची तपासणी मोहीम सुरू राहणार आहे.
राज्य सरकारच्या सुचनेनंतर जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार नगरच्या अन्न औषध प्रशासन विभागाने जिल्ह्यातील दूध संकलन केंद्र आणि प्रकल्पांची तपासणी सुरू केली आहे. चार पथकांच्यावतीने जिल्ह्यात 15 सप्टेंबरपर्यंत ही तपासणी मोहीम सुरू राहणार आहे. या तपासणी मोहिमेत चालू आठवड्यात संगमनेर तालुक्यातून 5, पारनेर तालुक्यातून 1, श्रीगोंदा 3, पारनेर 2 आणि नगर तालुक्यातून 3 असे 14 संशयीत दूधाचे नमुने घेण्यात आले आहेत. यासह संगमनेर तालुक्यातून गायीचे 19 किलो तूप जप्त करण्यात आले असून दोन ठिकाणी गायीचे तूप तयार करणार्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
यासह संगमनेर तालुक्यात 2, पारनेर तालुका 1, राहुरी 3 ठिकाणी दुध केंद्रात इलेक्ट्रीक वजन काटा यावर महाराष्ट्र वैधमापन शास्त्र (अंमल) नियम 1011 प्रमाणे नोटिसा बजावण्यात आल्या असून दंड आकारण्यात आला आहे. यासह पारनेर तालुक्यात 1 हजार लि.दूध नष्ट करण्यात आले आहे. गुरूवारी नगर तालुक्यात संशयित दुधाचे 3 नमुने घेण्यात आले आहेत. यापूर्वी मागील आठवड्यात 12 ठिकाणी संशयीत दूधाचे नमुने घेण्यासोबत 540 लिटर दूध नष्ट करण्यात आले आहे. दुधाचे घेतलेले नमुने प्रयोग शाळेसाठी तपासणीसाठी पाठवण्यात आले असून येत्या 15 तारखेपर्यंत अन्न औषध विभागाकडून जिल्ह्यात दूध भेसळ रोखण्यासाठी तपासणी मोहिम राबवण्यात येणार आहे.