निरीक्षक माजी मंत्री चंद्रकांत हंडोरेंची प्रमुख उपस्थिती
युवावार्ता (प्रतिनिधी ) संगमनेर – नुकतीच काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण बैठक पार पडली. राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये काँग्रेसने पूर्वतयारी सुरू केली आहे. नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. येत्या रविवारी (दि.१३) नगर शहरात दक्षिण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची तर संगमनेरमध्ये उत्तरेची बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे व शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली आहे.
या बैठकीसाठी निरीक्षक हंडोरे यांच्यासह दक्षिण मतदारसंघाचे नवनियुक्त समन्वयक वीरेंद्र किराड (पुणे), शिर्डी मतदारसंघाचे समन्वयक ज्ञानेश्वर गायकवाड (नाशिक), आ. लहू कानडे, यांच्यासह जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांमधील नगर शहर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, ग्रामीण जिल्हा कार्यकारणी, विविध सेल, फ्रंटल, विभागांचे प्रमुख, प्रदेश पदाधिकारी यांची उपस्थिती असणार आहे. बैठकीची जय्यत तयारी शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने सुरू आहे.
रविवारी सकाळी १० वाजता संगमनेरच्या शासकीय विश्रामगृह येथे तर नगर शहरात नगर मनमाड रोडवरील हॉटेल मेघनंद या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ आहे. मागील निवडणुकीत या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आहे. मात्र विद्यमान खासदार हे सत्ताधारी शिंदे शिवसेनेसह भाजप बरोबर उघडपणे गेले आहेत. त्यामुळे या जागेवर उत्तरेतील कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा उमेदवार देण्याचा आग्रह सुरुवातीपासून धरला आहे.
नगर दक्षिणेचा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या अनेक वर्षांपासून लढवत आहे. मात्र याही मतदारसंघावर मुंबईत झालेल्या लोकसभा आढावा बैठकीमध्ये काँग्रेसने दावा ठोकला आहे. हा दावा ठेवताना आतापर्यंत बारा वेळा काँग्रेसचा खासदार या मतदारसंघातून निवडून गेला असल्याची आकडेवारी मांडली गेली आहे.जिल्ह्यातील दोन्ही जागांवर काँग्रेसने दावा ठोकला आहे. त्यातच आता पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या दोन स्वतंत्र बैठकांचे आयोजन करण्यात आल्यामुळे काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची थेट पूर्वतयारीच सुरू केल्याची जिल्ह्यात सुरू झाली आहे. लवकरच खा. राहुल गांधी इंडियाच्या बैठकीच्या निमित्ताने मुंबईत येत आहेत. त्या आधीच नगर दक्षिण, शिर्डीसह राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसने मिशन हाती घेतले आहे. लोकसभा ही देशाची निवडणूक आहे. कोणता मतदारसंघ कुणाकडे याचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर ठरेल. मात्र जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांमध्ये काँग्रेस शतप्रतिशत तयारी करणार असल्याची माहिती किरण काळे व राजेंद्र नागवडे यांनी दिली आहे.