वीरगाव फाट्यावर मटका आणि अवैध दारु जोरात

0
1590

सामाजिक स्वास्थ्य बिघडले

युवावार्ता (प्रतिनिधी)
वीरगाव – अकोले पोलिस स्टेशनपासून 8 किलोमीटर इतक्या हाकेच्या अंतरावर असणार्‍या वीरगाव फाट्यावर मटक्याचा आकडा आणि अवैध दारु विक्री हे दोन्ही धंदे पोलिसांना माहित नसल्याने जोरात सुरु आहे. दिवसा आणि रात्रीही हे दोन्ही धंदे तेजीत चालतात.अकोले पोलिस स्टेशन अंतर्गत समशेरपूर बीटच्या कमांड एरियात या धंद्यांनी जोर धरला आहे.
दिवसभर टाईम, मिलन आणि कल्याण आणि रात्री मिलन नाईट बाजारावर याठिकाणी लाखोंची उलाढाल होते. ओपन, क्लोज, मेट्रो पट्टा, संगम यावर नोटा लावून नशीब अजमावले जाते.अनेकजण यात कंगाल झाल्याची माहिती पोलिसांना बहूतेक नसावी. अन्यथा हा धंदा त्यांनी यापुर्वीच बंद केला असता. लाखो रुपयांची उधळण याठिकाणी रोज होते.
अवैध दारुविक्री देखील वीरगाव फाट्यावर जोरदार चालते. देशी-विदेशी दारु मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असल्याने लोकांना अकोले येथे खास पिण्यासाठी जावे लागत नाही. हवी त्या दारुची गरज येथेच भागते ही पिणार्‍यांच्या दृष्टीने जमेची बाजू ठरली. अकोलेहून नाशिक किंवा संगमनेरला जाण्यासाठी वीरगाव फाटा हे मध्यवर्ती ठिकाण आहे. समशेरपूर बीटकडे जाताना किंवा आढळा परिसरात पेट्रोलिंग करताना पोलिसांनाही याच मार्गाचा वापर करावा लागतो.


वीरगाव फाट्यावर नेहमी प्रवाशांची गर्दी असते. खासकरुन महाविद्यालयीन विद्यार्थी -विद्यार्थिनी नेहमीच असतात. अनेक पालकांच्या आणि प्रवाशांच्या याबाबद तक्रारी आहेत. परंतु अवैध धंदेवाल्यांना अनेक समाजसुधारकांची पाठराखण असल्याने हे दोन्ही धंदे वीरगाव फाट्यावर ‘समाजसुधारणा’ आणि ‘विकास’ या व्याख्येत येत असल्याने कुणाचेही तक्रार करण्याचें धाडस होत नाही. अनेक प्रसारमाध्यमांनी हा विषय प्रसारीत करुनही म्हणावी अशी दखल घेतली जात नसल्याने अवैध धंदेवाल्यांना नक्की कुणाचे पाठबळ मिळते याचा शोध पोलिसांनी यथावकाश का होईना पण घ्यावा अशी इच्छा लोक व्यक्त करतात. लोक बनावट दारु पिऊन त्यांच्या शरीराची चाळण होण्यापुर्वी आणि मटक्यात कंगाल होण्यापुर्वी ही शोधमोहिम पोलिसांनी राबवावी अशी परिसराची इच्छा आहे.

सामाजिक स्वास्थ्य बिघडले
वीरगाव फाटा हे मध्यवर्ती ठिकाण आहे. अनेक इतर व्यावसायिकांची दुकानेही याठिकाणी आहेत. अवैध दारुविक्री आणि मटका यामुळे याठिकाणी लोक थांबण्याचे धाडस करत नाहीत. वास्तविक मध्यवर्ती ठिकाणाची तुलना करता इतर चांगल्या व्यावसायिकांची याठिकाणी मोठी आर्थिक उलाढाल झाली असती. परंतु अवैध धंद्यांनी निर्माण झालेल्या बकालपणामुळे येणारे-जाणारे येथे इच्छा असली तरी थांबू शकत नाहीत. वीरगाव परिसरात कायमच चोरीच्याही घटना घडतात. अवैध धंद्यांमुळे सामाजिक स्वास्थ्य याठिकाणचे पार बिघडून गेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here