पोलीसांकडून एकाचवेळी अनेक भंगार दुकानांची झाडाझडती

0
1649

पोलीसांना संशय – चोरीचा माल भंगारात

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
संगमनेर पोलीस उपविभागातील संगमनेर तालुका, घारगाव, अकोले, राजुर, आश्वी, संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोटर सायकल चोरी त्याचप्रमाणे शेतकर्‍यांची शेती अवजारे शेतीपंप, केबल चोरी, बॅटरी चोरी यासारख्या चोर्‍यांचे प्रमाण वाढले होते. तसेच चोरट्यांकडून चोरी केलेले साहित्य हे संगमनेर शहर व परिसरातील विविध भंगार दुकानांमध्ये अत्यल्प किमतीमध्ये विकले जात आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने संगमनेर उपविभागातील सर्व भंगार गोडाऊन व दुकानांची एकाच वेळी तपासणी करून गायब झालेल्या वाहनांचा, शेती औजारांचा शोध घेतला. या कारवाईमुळे भंगार व्यवसायीकांचे मात्र धाबे दणाणले आहे. तर नागरिकांमधून या कारवाईचे स्वागत होत आहे.
मागील काही दिवसांमध्ये शेतकर्‍याचे स्प्रिंकलर पाईप, ठिबक सिंचन पाईप तसेच सबमर्सिबल पंप चोरी होत आहे. तर अनेक दुचाकी, चारचाकी वाहने, शेतकर्‍यांचे ट्रॅक्टर चोरी झाले आहे. या बाबतचे अनेक गुन्हे उपविभागातील विविध पोलीस स्टेशनला दाखल आहे.


या पार्श्वभूमीवर संगमनेर शहर व तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील 14 भंगार दुकानांवर, भंगार गोडाऊनवर एकाच वेळी 14 टीम ने संशयास्पद किंवा चोरीच्या दुचाकी, चार चाकी गाड्या त्याचप्रमाणे या गाड्यांचे पार्ट अर्थात इंजिन, चेसिस इत्यादी मिळून येतात किंवा काय याचा शोध घेतला. तसेच विविध शेती अवजारे, सबमर्सिबल पंप, पाईप, लोखंड, सेंट्रींग कामाचे स्टील अशा वस्तू मिळून येतात काय याची तपासणी करण्यात आली.
तपासणी करण्यात आलेल्या 14 भंगार गोडाऊन दुकानांमध्ये मिळून आलेल्या संशयास्पद वस्तूंचे सविस्तर पंचनामे करण्यात आलेले असून त्यामध्ये मिळून आलेल्या वस्तूंबाबत संबंधित भंगार दुकानाचे चालक मालक यांना लेखी विचारणा करण्यात येणार आहे. त्यांचे खुलासे समाधानकारक प्राप्त न आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. भंगार गोडाऊनवाल्यांनी चोरीचा मुद्देमाल विकत घेतल्यास भारतीय दंड विधान कलम 411, 413, 414 खाली यापुढे त्यांना आरोपी करण्यात येईल. त्यामुळे सर्व भंगार दुकानदारांना निर्देश देण्यात येत आहे की, त्यांनी भंगार म्हणून कोणतीही वस्तू व मुद्देमाल विकत घेत असताना विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीची खातर जमा करावी. तसेच तो मुद्देमाल त्याच्याच मालकीचा आहे किंवा नाही त्याची खातरजमा केल्यानंतरच भंगार म्हणून खरेदी करावी. तसेच मुद्देमाल ज्या व्यक्तीकडून घेतला असेल त्याची व घेतलेल्या मुद्देमालाची नोंद ही विहीत रजिस्टरमध्ये घेण्यात यावी. अशा सुचना उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिल्या.
सदरच्या कारवाईमध्ये संगमनेर शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांच्यासह संगमनेर शहर पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here