श्रीरामांच्या कार्यावर मालपाणी परिवाराची वाटचाल प्रेरणादायी – डॉ. कुमार विश्वास

0
1641
डॉ. कुमार विश्वास

उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘अपने अपने राम’ने संगमनेरकर मंत्रमुग्ध

युवावार्ता (संगमनेर – प्रतिनिधी)
आपल्या उद्योगाचा वापर हा उत्त्पन्न वाढीबरोबरच रोजगारनिर्मिती आणि समाजसेवेमध्ये करणार्‍या मालपाणी बंधू आणि संपूर्ण परिवाराची वाटचाल समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन श्रीराम कथेचे मर्मज्ञ आणि विश्‍वविख्यात वक्ता डॉ. कुमार विश्‍वास यांनी अपने अपने राम या रामकथेवर आधारित कार्यक्रमात केले. अडचणीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला यशस्वी जीवन जगण्याचा सन्मार्ग दाखवण्याचे सामर्थ्य श्रीरामाच्या चरित्रात आहे. त्याचे अनुकरण केल्यास जगातील अनाचार नियंत्रणात येऊन संपूर्ण सृष्टीचे कल्याण होईल असे मत डॉ.कुमार विश्‍वास यांनी व्यक्त केले.


उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, भाजपा नेते श्यामसुंदर जाजू, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, राजेंद्र पिपाडा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. विश्‍वास यांनी रामचरितमानसच्या आधारे प्रभू श्रीरामांच्या जीवनातील विविध अपरिचित प्रसंग मोठ्या ताकदीने उलगडून दाखवले. त्यांच्या प्रभावी वक्तृत्व शैलीमुळे श्रोत्यांच्या समोर रामायणातील प्रसंगांची चित्र उभी राहिली.


रामायणातील प्रत्येक पात्र अनुकरणीय असून मनात राम ठेवले तर आयुष्यातील मार्गक्रमण यशस्वी होते आणि जीवन सार्थकी लागते. उत्कृष्ट पुत्र, पिता, पती, बंधू, शिष्य, राजा असेलेले राम वंदनीय आहेत. भावाचे आणि वहिनींचे रक्षण करण्यासाठी एका पायावर तयार झालेल्या लक्ष्मणासारखा भाऊ सर्वांना मिळाला पाहिजे. 14 वर्षे वनवासात जाणार्‍या भावाची गादी मिळाली तरी 14 वर्षे कुटीत जीवन जगणार्‍या उत्कृष्ट राजा आणि भाऊ भरत याची गोष्ट अनोखी आहे. देवी लक्ष्मीचा अवतार असणारी सीता माता पतिव्रता होत्या. घरातील छोटा मुलगा शत्रुघ्न आपल्या कुटुंबाची काळजी घेत बंधू भरत यांना मदत करत होता. पवनपुत्र हनुमान सावलीसारखे श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मातेची सेवा करीत होते. सीता मातेसाठी ते पुत्रच होते. वालीचा मुलगा आणि राजा सुग्रीव यांचा पुतण्या अंगद चतुर आणि मुत्सदी होता. रामायणातील प्रत्येक पात्र आपल्याला शिकवण देऊन जाते असे डॉ. विश्‍वास यावेळी म्हणाले.
यावेळी पुढे बोलतांना डॉ. विश्‍वास म्हणाले की, रामायण हे कधीही कालबाह्य होणार नाही. प्रभू श्रीरामांनी दिलेली शिकवण ही स्वतःच्या वागणुकीतून दिली आहे, तो केवळ कोरडा उपदेश नाही. त्यामुळे राममार्ग हा त्रिकालाबाधित सत्य आहे, अजरामर आहे. प्रभू श्रीरामांची शिकवण केवळ भारतभूमीपुरती मर्यादीत नाहीतर वैश्‍विक क्षितिजावर देखील ती अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रभु रामचंद्रांचा त्याग, धैर्य, शौर्य, लोक कल्याणकारी धोरण, पारिवारिक सुसंवाद इत्यादी गुणवैशिष्ट्यांचे त्यांनी सविस्तर विवेचनही यावेळी केले. त्यांच्या वक्तृत्वामध्ये हिंदी, इंग्रजी, संस्कृत भाषेतील विविध कविता व गीतांचे संदर्भ देण्याची पद्धत श्रोत्यांना थक्क करणारी होती. त्यांनी व त्यांच्या सहकारी वृंदांनी सादर केलेल्या विविध रचनांवर उपस्थित हजारो श्रोत्यांनी टाळ्यांचा ठेका धरला आणि जाणता राजा मैदान श्रीराम भजनाने दुमदुमून गेले होते. संत कबीरांचे दोहे त्यांच्या अर्थासह समजावून सांगताना त्यांनी जगणे म्हणजे काय याचे सविस्तर विवेचनही केले. सुमारे अडीच तासांच्या या कार्यक्रमात हजारो श्रोते देहभान विसरुन तल्लीन झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित श्रोत्यांना शिवकालात नेले. छत्रपतींच्या पराक्रमाचे विविध दाखले देतांना निती आणि न्यायावर आधारित असलेल्या स्वराज्याची संकल्पनाही त्यांनी उलगडून सांगितली. शिवरायांच्या नसानसात राष्ट्रधर्म, स्वाभिमान आणि नितीचे पवित्र रक्त प्रवाहित करणार्‍या जिजामातेचेही त्यांनी यावेळी स्मरण केले.


उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या औद्योगिक प्रवासाचे वर्णन असलेल्या डॉ. संतोष खेडलेकर लिखीत ‘ओपन सिक्रेट’ या पुस्तकाची कार्यक्रमस्थळी सवलतीच्या दरात विक्री सुरु आहे. त्याला मोठा प्रतिसाद मिळत असून त्यातून मिळणारी संपूर्ण रक्कम सामाजिक कार्यासाठी वापरली जाणार असल्याची घोषणा मालपाणी परिवाराच्यावतीने करण्यात आली. त्यांच्या या निर्णयाचे उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांचा गजर करीत स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here