तालुक्यात दिवसभर विविध मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम
अवघ्या देशाला ज्या क्षणाची आतुरता होती, तो ऐतिहासिक क्षण अखेर आज आला. उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान मोदींच्या हस्ते व राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ व प्रमुख महंत यांच्या उपस्थितीत पार पडली. अवघ्या 84 सेकंदाच्या मुहूर्तावर रामाच्या लोभस बालमूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडली. त्यामुळे अयोध्येसह देशभरात एकच उत्साह संचालरला आहे. हा शुभ मुहूर्त 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजून 29 मिनिटे 8 सेकंदांना सुरू होऊन तो दुपारी 12 वाजून 30 मिनिटं 31 सेकंदांनी संपला. आता रामलला अयोध्येतील राम मंदिरात विराजमान झाले आहेत. लाखो भाविक या ऐतिहासिक क्षणाचे प्रत्यक्ष व करोडो भावीक थेट प्रेक्षपणाद्वारे साक्षीदार झाले.
युवावार्ता (प्रतिनिधी)-
संगमनेर – आज 22 जानेवारी अयोध्येतील भव्य मंदिरात श्रीरामलल्लाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठेचा ऐतिहासिक सोहळा साजरा झाला. या पार्श्वभूमीवर भगव्या ध्वज पताकांनी सजलेले संगमनेर शहर देखील राममय झाल्याचे पहावयास मिळत आहे. सर्वत्र झळकणार्या भगव्या झालरी, भगवे झेंडे, भगव्या कमानी, प्रभू श्रीरामांचे फ्लेक्स बोर्ड, जय श्रीरामाच्या घोषणांनी संगमनेर श्रीराममय होऊन एक वेगळाच उत्साह भाविकांमध्ये संचारल्याचे पहायला मिळत आहे.
शहरातील चंद्रशेखर चौकातील राम मंदिरात आज (सोमवारी) सकाळपासून दिवसभर विविध रामभक्तीपर आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट लाईव्ह प्रक्षेपण मोठ्या स्क्रिनवर मंदिर समितीच्यावतीने करण्यात आले होते. सकाळी 7 वाजता श्रीरामरक्षा आणि हनुमान चालीसाचे सामुदायिक पठाणाचा कार्यक्रम देखील उत्साहात पार पडला. तर शहरातील बसस्थानक परिसरात विविध संस्थांच्या वतीने खिचडी, लाडू वाटप व फटक्यांची आतिषबाजी करत हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात प्रत्येक भारतीयांनी मोठ्या उत्साहाने आनंदाने सहभागी होऊन दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते त्यानुसार प्रत्येक घरापुढील अंगण सारवून त्यावर आकर्षक रांगोळी, दुकानावर, बंगल्यावर रामभक्तांनी केलेली आकर्षक विद्युत रोषणाईमुळे शहराचा चेहरामोहरा बदलून गेला. सगळीकडे फक्त जय श्रीरामचा नारा गुंजला. शहरात ठीकठिकाणी स्टेज उभारण्यात आले असून त्यावर श्रीरामांची व अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती. गल्लीगल्लीतून, चौकाचौकातुन मंगल अक्षदा कलशाच्या शोभायात्रा मोठ्या दिमाखात निघाल्या होत्या. अयोध्येतील ऐतिहासिक श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी संगमनेरच्या प्रत्येक राम भक्तांचे नयन आतुरल्याचे पहायला मिळत होते. तर संगमनेर शहरात पक्षभेद विसरून प्रत्येक जण फ्लेक्स बोर्डवर श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने जयश्रीराम म्हणत शुभेच्छा संदेश देताना झळकत आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भाजप, शिवसेना, ठाकरे सेने सहित काँग्रेसच्या कार्यकर्त्यामधील राम या सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आला आणि संगमनेरकरांनी देखील न भुतो न भविष्यती असा हा सोहळा मंगलमय वातावरणात साजरा केला. तालुक्यात देखील आज दिवसभर विविध मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून हा सोहळा स्क्रिनवर दाखविण्यात आला. प्रशासनाने या सोहळ्यासाठी सुरक्षेचे सर्व उपाय केले होते.