१० हजारांच्या दंडाचीही शिक्षा
२०१८ मध्ये जवळेबाळेश्वरमध्ये घडली होती घटना
संगमनेर
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात पाटा घालून निर्घृण खून केला होता. या प्रकरणी दाखल खटल्यात सर्व पोलीस तपास, साक्षी पुरावे लक्षात घेऊन जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी नवऱ्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. हा निर्घृण खून संगमनेर तालुक्यातील जवळेबाळेश्वरमध्ये १२ नोव्हेंबर २०१८ रात्री झाला होता.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, मयत शांता प्रकाश धांडे वय ३२ यांची आई गंगुबाई महादू निटकारे रा. शेंडेवाडी, हिवरगाव पठार, ह. मु. मुंबई यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती या फिर्यादीत त्यांनी म्हटले की, त्यांची मुलगी शांता हिचे पहिले लग्न मामेखेल येथील एका तरूणासोबत झाले होते. परंतु त्यांच्यात न पटल्याने त्यांच्यात घटस्फोट झाला होता. त्यानंतर शांता हिचा दुसरा विवाह खून होण्याच्या सहा महिन्यापुर्वी प्रकाश नामदेव धांडे रा. आंबेवंगन ता. अकोले याच्या सोबत जवळेबाळेश्वर येथील मंदिरात झाला होता. त्यानंतर मयत शांता व नवरा प्रकाश हे दोघे श्रीगोंदा येथील एका होस्टेल मध्ये काम करून रहात होते.
दरम्यान फिर्यादी आई आजारी असल्याने मुलगी शांता व जावई प्रकाश हे दोघे तीला भेटण्यासाठी मुंबई भिवंडी येथे आले होते. त्यावेळी फिर्यादीची दुसरी मुलगी कांता व जावई बाळू धांडे हे देखील भेटायला आले होते. यावेळी मयत कांता हिने आपल्या आईला सांगितले की, माझा नवरा प्रकाश हा माझ्या चारीत्र्याविषयी शंका घेऊन मला त्रास देत आहे. याबाबत मी माझ्या सासू सासऱ्यांना देखील सांगितले आहे, तु ही त्यांना समजून सांग. यानंतर आईने तिची तिथे समजूत काढत मी गावी येऊन त्यांना सांगतेसांगते. असे म्हणून वेळ मारून नेली.
यानंतर काही दिवसातच फिर्यादी आई ही आपली मुलगी कांता व जावई बाळू घोडे याच्या जवळेबाळेश्वर येथील घरी आले. मुलगी शांता व जावई प्रकाश हे देखील १२ नोव्हेंबर २०१८ रोजी तेथे आले. दरम्यान रात्री सर्वांनी सोबत जेवण केले, व सर्व झोपेत असताना अचानक रात्री दोनच्या सुमारास मुलगी कांता हीने आरडाओरडा केली, की अक्का (शांता) ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असून जावई प्रकाश फरार आहे. तीच्या शेजारीच दगडी पाटा रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेला आहे. जखमी शांता च्या उपचारासाठी तात्काळ गावातील डॉ. भोईर यांना बोलविण्यात आले मात्र डॉक्टरांनी शांताला मयत घोषित केले. मयत शांताचा खून करून आरोपी नवरा पळून गेला आहे. अशी फिर्याद मयताच्या आईने घारगाव पोलीस ठाण्यात दिली. त्यांनंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक ए. एस. भुसारे यांनी चोख तपास करत आरोपीला गजाआड केले.
सदर प्रकरण जिल्हा सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्या समोर सुनावणी झाली. सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी सर्व साक्षी पुरावे न्यायालयासमोर ठेवून आरोपीला जन्मठेपेच्या शिक्षेपर्यंत नेले. न्यायालयाने आरोपी नवरा प्रकाश धांडे याला कलम 302 नुसार जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे.
सरकारी पक्षातर्फे 8 साक्षीदार यात आई, बहिण, डॉ. सौ. सी. आर. लोहारे, पो. नि. ए. एस. भुसारे, उपनिरीक्षक योगेश मोहिते यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांना पैरवी अधिकारी आर. व्ही. भुतांबरे, पो हे काॅ प्रविण डावरे, उपनिरीक्षक विजय परदेशी म. पो. काॅ स्वाती नाईकवाडी, प्रतिभा थोरात, विक्रांत देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले.