संगमनेर बसस्थानकाचे नामांतर नाही तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ बसस्थानक अभियान
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- संगमनेर शहरात परिवहन विभागाच्या वतीने बीओटी तत्वावर भव्य दिव्य असे बसस्थानक उभारण्यात आले आहे. या बसस्थानकाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे अशी मागणी शिवसैनिकांच्या वतीने तत्कालीन महाआघाडी व आत्ताच्या युती सरकारकडे लावून धरण्यात आली आहे. त्यातच संगमनेर बसस्थानकावर चौकशी कॅबीनच्या वर लावण्यात आलेल्या फ्लेक्स बोर्डवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव व फोटो लागल्याने या बसस्थानकाचे नामांतर ठाकरे यांच्या नावाने झाले अशा स्वरुपाच्या अफवा शहरात पसरल्याने एकच खळबळ उडाली
.
परंतु या संदर्भात अधिक माहिती घेतली असता परिवहन विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान राबविण्यात येत आहे. आणि संपूर्ण राज्यात एकच थीम वापरून हे फ्लेक्स लावण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांचा गैरसमज झाला आहे.
संगमनेर बसस्थानकाचे नामांतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बसस्थानक करावे ही मागणी आजही शिवसैनिक लावून धरत आहे. या नावाने या बसस्थानकाचा लौकिक आणखी वाढणार असून सदर फ्लेक्स लागल्याने शिवसैनिकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र नामांतराची अफवा निघाल्याने शिवसैनिकांचा हिरमोड झाला आहे