आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या क्षेत्रात नकारात्मक शक्यतांविषयी तज्ञ लोकांचे भाकित
(लेखक – अमोल साळे संगणक अभियंता आहेत. अर्थशास्त्र, आधुनिक तंत्रज्ञान
व त्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत.)
आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या निमित्ताने अनेक चर्चांना उधाण आले आहे. त्याच्या फायद्या तोट्याविषयी वेगवेगळे मतप्रवाह बनत आहेत. हे सॉफ्टवेअर ऑटोमेशन चे नवयुग आहे, ते हे ऑटोमेशन साधे सुधे नसून यावेळी हे वेगळे प्रकरण आहे (This Time It’s Different) असे मतमतांतरं आहेत.
या लेखाच्या माध्यमातून मुख्यत्वे आर्टीफिसिअल इंटेलिजन्स च्या नकारात्मक शक्यतांचा उहापोह करण्याचा प्रयत्न करूया. या चर्चेत पुढे जाण्यापूर्वी हे नोंदवावेसे वाटते आहे की जेव्हा कुठलेही तज्ज्ञ काही नकारात्मक शक्यतांचे भाकीत करतात तेव्हा त्या शक्यता खऱ्या ठरतीलच असे नसते पण योग्य वेळी योग्य उपाय केले नाहीत तर असे घडू शकते यासाठी ती वॉर्निंग असते. बऱ्याच वेळेला योग्य उपाय योजून ते परिणाम टाळले जातात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या क्षेत्रात अशाच नकारात्मक शक्यतांविषयी खूप महत्त्वाचे तज्ञ लोक वेगवेगळी भाकितं करत आहेत. ती काय-काय आहेत त्याविषयी थोडक्यात:
२०१४ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हौकिंग यांनी मत मांडले होते की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे मानवजातीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होऊ शकतो. त्यांनी असेही सांगितले होते की आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर जेव्हा शस्त्रनिर्मितीत होऊ लागेल तेव्हा मानवी हस्तक्षेपाशिवाय जीव घेऊ शकणारी हत्यारं बनतील आणि ती जर चुकीच्या हातात गेली काय काय घडू शकेल याची कल्पनाच न केलेली बरं. प्रसिद्ध उद्योगपती एलोन मस्क यांनी सुद्धा अशाच शक्यता वर्तवल्या आहेत. त्यांच्यानुसार AI एक दिवस मानवापेक्षा जास्त बुद्धिमान बनेल आणि त्या दिवशी मानवाच्या पृथ्वीवरील सत्तेला आव्हान उभे राहील. ते स्वायत्त शस्त्रांविषयी सुद्धा धोक्याची सूचना देतात.
निक बॉस्ट्रॉम हे सुपर इंटेलिजन्स या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक सुद्धा चेतावणी देतात की AI मुळे मानवी अस्तित्वच धोक्यात येऊ शकते.मागच्या काही महिन्यात चॅट GPT वगैरेंच्या आगमनानंतर या चर्चांनी पुन्हा वेग घेतला. त्या चर्चेला पुन्हा एकदा महत्व प्राप्त झाले ते Geoffrey Hinton यांच्यामुळे. Geoffrey Hinton, हे गुगल मध्ये VP आणि Engineering Fellow होते. त्यांनी गुगल मध्ये असताना आधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डीप लर्निग या विषयात काही महत्त्वाच्या टेक्निक डिझाईन केल्या होत्या. त्यांनी काही नैतिक कारणास्तव आपली गुगल मधली हाय प्रोफाईल नोकरी सोडली आहे.Hinton यांना २०१८ चा टुरिंग अवॉर्ड (कॉम्प्युटर सायन्स मधील नोबेलच्या बरोबरीचा अवॉर्ड) दिला गेला आहे.
गुगल मधील इतका महत्त्वाचा रोल सोडून देण्यामागे नैतिक कारण हे मुख्य आहे असे ते सांगत आहेत. इथून पुढचा वेळ हा मुख्यत्वे “आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे मानवतेसाठी निर्माण झालेले चॅलेंजेस” या विषयावर जनजागृती करण्यासाठी घालवायचा असे ते म्हणत आहेत. हे सगळे शोध लावून आपण किती धोकादायक काम केले आहे याचा विचार करून मनात अपराधीपणाची भावना येते आहे असे ते म्हणत आहेत.
हिन्तोन यांनी गुगल सोडल्यानंतर MIT (Massachusetts Institute of Technology) ने त्यांची एक महत्वाची मुलाखत घेतली. हिन्तोन यांनी या मुलाखतीत मांडलेले मुद्दे दुर्लक्ष करून नक्कीच चालणार नाहीये. त्यांनी अधोरेखित केलेले काही महत्त्वाचे मुद्दे असे:
# आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्या मूळ तत्वावर उभे आहे ते Large Language Model हे भव्य Neural Networks वर उभारलेले आहेत. मानवी मेंदूच्या तुलनेत हे मॉडेल अजून छोटे आहे. आपल्या मेंदूत शंभर ट्रिलियन न्यूरल कनेक्शन असतात. लार्ज लांग्वेज मॉडेलमध्ये फक्त अर्धा ट्रिलियन न्यूरल कनेक्शन्स आहेत. इथपर्यंत यायला वीस तीस वर्षे लागली आहेत. पण हा प्रवास सरळ रेषेत नसून घातांक दराने म्हणजेच एक्सपोनेंशनली झालेला आहे. काही वर्षातच एक दिवस येईल जेव्हा लार्ज लँग्वेज मॉडेलचे न्युरल कनेक्शन मानवी मेंदू पेक्षा जास्त होतील. आणि तिथून पुढे घातांक दराने वाढत जातील.
# मानवी संस्कृती ही स्पेसिलायझेशन वर उभी आहे. कुठल्यातरी एकाच क्षेत्रात स्पेसिलायझेशन असलेले आणि इतर क्षेत्रांमध्ये काहीही न कळणारे मानव आपल्या अवतीभोवती आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या सिस्टीम तशा असणार नाहीत. एकच सिस्टीम कोडींग, रोगनिदान, अवघड गणिते सोडवणे, कायद्याची एक्सपर्ट वगैरे क्लिष्ट कामे किंवा इतर कुठलेही काम सहज आणि अचूकपणे करू शकेल. थोडक्यात मानवी मेंदूला शक्य असणारे सगळे काम ती करू शकेल. प्रत्येक मानवात ते सगळे कामे करण्याची क्षमता नाही.
# आतापर्यंत AI सिस्टीम फक्त लर्निंग करत आहेत. पण जेव्हा एकापेक्षा अधिक AI सिस्टीम अस्तित्वात येतील तेव्हा एका सिस्टीमने कमावलेले ज्ञान इतर हजारो लाखो सिस्टीम्स ला सहज शिकता येईल हे फक्त फाईल कॉपी करणे इतके सरळ सोपे राहील. मानवामध्ये ही क्षमता नाही. एका मानवाने कमावलेले ज्ञान, अनुभव दुसऱ्याला जसेच्या तसे पोहोचत नाही.
# या सिस्टिम्स मानवी मेंदूच्या क्षमतेपेक्षा अधिक बुद्धिमान होण्यासाठी फक्त काही वेळ बाकी आहे. तसेच ही प्रक्रिया तिथे थांबणार नाही. त्यांची बुद्धिमत्ता घातांक दराने वाढत जाईल. एकदा तो दिवस उगवला तर या सिस्टीम मानवाला कंट्रोल करू शकतील. मानवाला मिळणारी माहिती, त्याची विचारक्षमता आणि बऱ्याच गोष्टीवर त्यांचे नियंत्रण येऊ शकते.
# आतापर्यंतच्या संगणक प्रणाली एका साध्या तत्त्वावर बनलेल्या आहेत त्या मानवाने दिलेल्या कमांड्स किंवा त्यांचा सिक्वेन्स संगणक प्रणाली पूर्ण करू शकते. एकापेक्षा अधिक कमांड म्हणजेच subgoals हे सुद्धा यांत्रिकी पद्धतीने म्हणजेच सांगितले तितकेच पूर्ण करणाऱ्या सिस्टीम्स आता अस्तित्वात आहेत. पण AI मुळे या subgoals मध्ये बुद्धिमत्ता संचारेल. आणि प्राप्त परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकणाऱ्या प्रणाली अस्तित्वात येतील. हा AI च्या क्रांतीतील सर्वात धोकादायक टप्पा असेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
# मानवी अस्तित्वाला धोका निर्माण करण्याची क्षमता असलेल्या सिस्टीम याआधी शक्यतो सरकारी पातळीवर बनवल्या गेल्या. त्यांच्यावर कायदेशीर नियंत्रण आणण्यात आली. पण AI च्या सिस्टिम्स तशा नाहीत. या मुख्यत्वे नफ्यासाठी आसुसलेल्या कॉर्पोरेशन्सच्या ताब्यात आहेत. दुसऱ्या महायुद्धात आयबीएम ने हिटलरला पद्धतशीरपणे नरसंहार करण्यासाठी algorithms विकले होते हे विसरून चालणार नाही.या भव्य कंपन्या अशा सिस्टिम्स पुतीन किंवा तत्सम हानिकारक शक्तींना विकू शकतात. आणि त्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर नरसंहार करण्यासाठी होऊ शकतो.एखादी बिग फार्मा कंपनी जेव्हा एखाद्या असाध्य रोगावर औषध बनवते तेव्हा नफा कमवणे हे मुख्य उद्दिष्ट असते. यात त्या रोगाचे निवारण करण्यापेक्षा औषधाची विक्री वाढवणे हा मुख्य हेतू असू शकतो. रोग निवारण झालेच तर औषध विकत कोण घेणार असाही विचार नफेखोरी साठी असू शकतो. त्यामुळे फक्त नफ्यासाठी व इन्व्हेस्टरच्या रिटर्न साठी काम करणाऱ्या बिग कॉर्पोरेशन च्या भरवशावर या सिस्टीम्स ठेवल्या जाऊ शकत नाही. त्यांच्यासाठी योग्य कायदे करावे लागतील. या कायद्यांसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार गरजेचा आहे. ते साध्य करण्यासाठी कित्येक वर्षे लागू शकतात. तितका वेळ मानवाकडे सध्या नाही.
Artificial intelligence काय काय घडवणार आहे हे समजून घेण्यासाठी मागच्या काही दिवसात घडलेल्या या दोन घटना समजून घ्या.
१. Drake नावाचा एक प्रसिद्ध रॅप गायक आहे. अगदी त्याच्यासारखा हुबेहूब आवाज असलेले आणि त्याच्याच शैलीत लिहिलेले AI वापरून बनवलेले एक नकली गाणे इंटरनेट वर टाकण्यात आले. आणि काही तासातच ते गाणे व्व्हायरल झाले. सगळ्या महत्वाच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स वर ते ट्रेंडिंग होऊ लागले. कुठलाही प्रेक्षक हे गाणे नकली आहे किंवा AI ने बनवले आहे हे ओळखू शकला नाही. काही तासांनी ड्रेक आणि Universal Music Group जी कंपनी ड्रेक चे संगीत वितरित करते त्यांनी आक्षेप घेतल्यावर हे गाणे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स वरून काढले गेले.
२. Sony World Photography Awards हा फोटोग्राफी मधला एक फार महत्वाचा आंतरराष्ट्रीय अवॉर्ड आहे. यावर्षी तो अवॉर्ड एका जर्मन फोटोग्राफर ला मिळाला. अवॉर्ड ची घोषणा झाल्यावर त्याने तो अवॉर्ड नाकारला. का? त्याने सांगितले की तो फोटो त्याने काढलेलाच नाहीये. तो फोटो DALL-e नावाच्या Artificial intelligence वापरून बनवला आहे. विशेष म्हणजे या अवॉर्ड चे परीक्षक हे जागतिक दर्जाचे तज्ञ असतात. आणि त्यांना हा फोटो नकली असेल याची जरासुद्धा कल्पना आली नाही.
या दोन बातम्या खरं म्हणजे साध्या घटना नाहीयेत. यात सगळ्यात महत्वाची बाब ही की दोन्ही घटनांमध्ये खरे काय ते उघड झाले आणि त्या अचंबित करणाऱ्या बातम्या बनल्या. खरे उघड न झालेल्या काय काय घटना घडत असतील किंवा घडणार आहेत??
आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे निर्माण संभाव्य धोक्यांचे खालील काही मुख्य प्रकारात वर्गीकरण करता येईल:
- फेक न्युज चा प्रसार वाढेल:
गेल्या काही वर्षात फोटो, व्हिडिओ इत्यादी एडिट करून उपलब्ध माहिती ला चुकीच्या पद्धतीने सादर करणे म्हणजेच फेक न्युज पसरवण्याचे प्रमाण लक्षणीय रित्या वाढले आहे. २०१७ साली कॉलिन्स डिक्शनरीने फेक न्यूज हा वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केला होता. फेक न्युज पसरवून आपले राजकीय अजेंडे पूर्ण करणे हे जवळजवळ प्रत्येक देशात दिसून येत आहे. आतापर्यंत फोटो व व्हिडिओ एडिट करणारे टूल वापरून हे साध्य केले जात असे. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या आगमनाने फेक न्यूज अधिक प्रभावशाली रूप धारण करणार आहे. मागच्याच महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटकेचे असे हुबेहूब फोटो बनवण्यात आले की कुणालाच ते खरे आहेत की खोटे आहेत हे ओळखता आले नाही. आर्टिफिशल इंटेलिजन्स वापरून कुणाचेही डीप फेक व्हिडिओ बनवता येऊ शकतील. त्या व्हिडिओमध्ये आपल्याला हवे ते शब्द कुणाच्याही मुखी घालता येतील आणि हा व्हिडिओ डीपी आहे हे मानवी मेंदूला ओळखणे जवळजवळ अशक्य राहील. याची झलक मागच्या काही दिवसांपासून येते आहे.
- आर्टिफिशियल इंटेलिजन्स लोकांवर बरे वाईट संस्कार करू शकेल
सध्या वापरत असलेले इंस्टाग्राम, टिक टॉक, यूट्यूब इत्यादींमुळे त्यांच्या वापरकर्त्यांच्या सवयीमध्ये आणि वागण्या बोलण्यात फरक होतो आहे हे बऱ्याच संशोधनाअंती दिसून येते आहे. पौगंडावस्थेत असलेल्या मुला मुलींमध्ये आपल्या शरीराविषयीच्या आणि सौंदर्याविषयीच्या कल्पना विषयीच्या कल्पना या इंस्टाग्राम, टिक टॉक वगैरे प्लॅटफॉर्म घडवून आणत आहेत असे निष्कर्ष संशोधनातून येत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे तयार होणारे फोटो आणि व्हिडिओ या समाजांना वेगळ्याच पातळीवर घेऊन जाऊ शकतात. हे फक्त आपले शरीर व सौंदर्य यांच्या विषयीच्या विचारांपुरते सिमित नाही. तुमच्या राजकीय, धार्मिक, सामाजिक समजांना आकार देण्याचे काम आर्टिफिशियल इंटेलिजन्स करू शकेल. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्या शक्तींच्या ताब्यात राहील त्या शक्तींना समाजावर नियंत्रण करणे अधिक सोपे होत जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
- आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे सायबर हल्ले वाढतील आणि ते करणे सोपे होत जाईल
सायबर हल्ले ही आधुनिक समाजाची मोठी डोकेदुखी आहे. शत्रू राष्ट्रांवर सायबर हल्ले करून महत्त्वाची माहिती मिळवणे, आर्थिक नुकसान घडवणे इत्यादी प्रकार दिवस-रात्र सुरू असतात. सायबर हल्ले हे प्रत्यक्ष युद्धापेक्षा कमी नाहीत. त्यामुळे खूप मोठे नुकसान घडवून आणले जाऊ शकते. भारतात नुकताच AIIMS हॉस्पिटल वर सायबर हल्ला झाला होता. त्यामुळे झालेली आर्थिक आणि जीवितहानी याची माहिती सार्वजनिक झालेली नाही. तरीही ती हानी फार मोठी असावी असा तज्ञांचा अंदाज आहे. आपण बऱ्याच वेबसाईट वापरताना आपण बॉट नाही हे सिद्ध करण्यासाठी काही साध्या चाचण्या द्याव्या लागतात ज्यामध्ये फोटोत दाखवलेले गणित सोडवणे, काही फोटो मधील चित्रांना ओळखणे, किंवा साधे क्लिक करून सिद्ध करणे की मी बॉट नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून या चाचण्यांना सहज पूर्ण केले जाऊ शकते. जगभरातील वेबसाईट बनवणाऱ्यांसाठी ही नवीन डोकेदुखी होणार आहे. आणि यामुळे खूप नकारात्मक परिणाम घडणार आहेत. सरकारला, खाजगी संस्थांना सायबर हल्ल्यांपासून सुरक्षा करण्यासाठी खूप मोठा खर्च भविष्यात करावा लागणार आहे.
- आर्टिफिशियल इंटेलिजन्स मानवी क्षमतेपेक्षा अधिक बुद्धिमान आणि ताकदवान होण्याचा धोका
हा धोका सर्वात अधिक अधोरेखित केला जातो आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या रूपात मानव एका अधिक बुद्धिमान आणि ताकतवान प्रजातीला जन्म देतो आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे न्यूरल कनेक्शन मानवी मेंदूच्या न्यूरल कनेक्शन पेक्षा अजून तरी बरेच कमी आहेत. पण त्यात वेगाने वाढ होते आहे. लवकरच ते मानवी मेंदू इतके होतील आणि ही प्रक्रिया तिथे थांबणार नाही. ती क्षमता दिवसेंदिवस वाढतच राहील. मानवी मेंदू पेक्षा अधिक क्षमता असलेले, स्वतः विचार करू शकणारे आणि प्राप्त परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स भविष्यात कायम मानवी हिताचे निर्णय घेतील याची शाश्वती नाही. त्यावेळी आपल्यापेक्षा अधिक बुद्धिमान असलेल्या आणि त्या बुद्धीत घातांक दराने वाढ होत असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टिम्सला थांबवणे मानवाला शक्य होणार नाही. या प्रक्रियेद्वारे मानवी अस्तित्वाला धोका होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढू शकते.
मानवी उत्क्रांती जर समजून घेतली तर दिसून येते की, लाखो वर्षांपूर्वी जंगलात भटकणाऱ्या आणि आपल्यापेक्षा इतर ताकतवान प्राण्यांपासून स्वतःचा जीव वाचवत फिरणारा मानव प्राणी आज जगावर राज्य करतो आहे. आपल्या जीविताला धोका निर्माण करू शकणाऱ्या इतर सगळ्या प्राण्यांवर, वनस्पतींवर आणि निसर्गनिर्मित इतर शक्तींवर जसे अग्नी, जल, वायू इत्यादींवर मानवाने बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे. असे म्हणता येईल की आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या सिस्टिम्स बनवून मानव प्राणी ते नियंत्रण आपल्यापेक्षा कितीतरी बुद्धिमान अशा सुपर प्रजातीकडे देऊ इच्छितो आहे. पृथ्वीवर निर्माण केलेले आपले नियंत्रण याद्वारे धोक्यात येत आहे.
या लेखात आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे निर्माण होऊ शकणारे धोके अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. इथे उल्लेख केलेले संभाव्य धोके प्रत्यक्षात उतरतीलच असे नाही. तरीही हे संभाव्य धोके अधोरेखित करत राहणे आणि ते टाळण्यासाठी उपाययोजना करत राहणे हे महत्त्वाचे आहे. या आधी सुद्धा मानवी अस्तित्वालाच धोका निर्माण करू शकणारे तंत्रज्ञान मानवाने निर्माण केले आहे. त्या तंत्रज्ञानाचा योग्य रीतीने वापर करणे ही आपली जबाबदारी आहे हे विसरून चालणार नाही. अशा प्रकारचे तंत्रज्ञान चुकीच्या हातात गेले तर काय परिणाम होऊ शकतात या उदाहरणांनी आपला इतिहास काठोकाठ भरलेला आहे. त्या इतिहासापासून आपण काय शिकतो व आपले भविष्य किती सुरक्षित करतो यावर आपल्या प्रजातीचे अस्तित्व ठरणार आहे.