आ. सत्यजित तांबे यांचा सरकारकडे पाठपुरावा
उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे तातडीने कार्यवाहीचे आदेश
युवावार्ता (प्रतिनिधी) संगमनेर- उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेली आणि शेतकर्यांसाठी वरदान ठरलेले इंग्रजकालीन भंडारदरा धरण लवकरच 100 वर्षे पूर्ण करीत आहे. तसेच हा संपूर्ण परिसर निसर्गरम्य ठिकाणांनी बहरलेला आहे. दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देऊन निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतात. पर्यटकांचा हा आनंद आणखी द्विगुणित करण्यासाठी या ठिकाणी ‘भारतातील पहिले वॉटर म्युझियम’ सुरू करण्याचा प्रयत्न आमदार सत्यजित तांबे यांनी सुरु केला असून त्या संदर्भाने त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. फडणवीस यांनीदेखील या उपक्रमाचे कौतुक करत तातडीने दखल घेत भंडारदरा येथे वाटर म्युझियम सुरू करण्यासाठी कार्यवाही सुरू करावी असे आदेश दिले आहेत.
मुंबई, ठाणे,नाशिक, नगर, पुणे या पाच जिल्ह्यांना जवळ असणारे भंडारदरा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच असणारे कळसूबाई शिखर हे याच पर्वत रांगेत आहेत. या ठिकाणी केवळ भंडारदराच नाही तर हरिश्चंद्रगड, आंब्रेलाफॉल, रंधा फॉल, रतनवाडी, घाटघर, सांदनदरी, कोकणकडा, घाटघर प्रकल्प, निळवंडे प्रकल्प यासह अनेक पर्यटनस्थळे आहेत. तसेच भंडारदरा अभयारण्यात अनेक प्रकारच्या वनस्पती, पक्षी, प्राणी अढळून येतात. पावसाळ्यापुर्वी काजवा महोत्सव हे येथील नव्याने विकसीत झालेले पर्यटनस्थळ आहे. हा संपूर्ण निसर्ग डोळ्यात साठविण्यासाठी लाखो पर्यटक दुरवरून येत असतात. त्यामुळे येथील पर्यटनाला आणखी चालना मिळण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी पुढाकार घेऊन वॉटर म्युझियमची संकल्पना तयार केली व तीचे सादरीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर केले. आ. सत्यजीत तांबे यांची कल्पकता आवडल्याने त्यांनी या प्रकल्पासाठी तात्काळ होकार दर्शविला.
उत्तर अहमदनगर जिल्ह्याची जीवन वाहिनी असलेल्या प्रवरा नदीवरील भंडारदारा धरणाला लवकरच 100 वर्षे पूर्ण होत आहेत. भंडारदारा धरण नसते तर काय झाले असते? याची कल्पनासुध्दा उत्तर नगर जिल्ह्यातील लोक करू शकत नाहीत. सह्याद्रीच्या कुशीतील भंडारदरा परिसर हा महाराष्ट्रासह देश-विदेशातील पर्यटकांना नेहमीच खुणावत असतो. भंडारदारा धरणाच्या शतकपूर्ती निमित्त एक भव्य कार्यक्रम करण्याचा आमदार सत्यजित तांबे यांचा मानस आहे. हा संपूर्ण परिसर पाण्याने समृद्ध असल्याने या ठिकाणी पाण्याविषयीची सर्व माहिती देणारे वॉटर म्युझियम उभारण्याची कल्पना मांडण्यात आली. त्या निमित्त या परिसरात भारतातील पहिले वॉटर म्युझियम उभारण्यासाठी भंडारदरा धरणाच्या जवळ असलेली जलसंपदा विभागाच्या मालकीच्या कृष्णावंती विश्राम गृहाची जागा ही गेली दहा वर्षे पडून आहे. त्यामुळे ही जागा या वॉटर म्युझियम प्रकल्पासाठी देण्यात यावी व त्यासाठी केवळ 20 करोड इतका खर्च अपेक्षित असल्याने याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी सत्यजीत तांबे यांनी केली.
या प्रकल्पासाठी जागा निश्चिती व निधीची तरतूद झाल्यानंतर हा प्रकल्प सुरू झाला. तर या पर्यटन क्षेत्रात पर्यटकांची संख्या लक्षणीयरित्या वाढणार आहे. त्याच बरोबर पर्यटन वाढण्यासाठी रस्त्यांचीही चांगली सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी केली.