रूफटॉप सोलर उभारणीचा राज्यातील पहिला कारखाना
युवावार्ता (प्रतिनिधी) संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने छतावरी सोलर सिस्टीम (रूफ टॉप) द्वारे ७५० किलोवॅट वीज निर्मितीचा राज्यातील पहिला प्रकल्प कार्यान्वित करून इतरांसाठी आदर्श निर्माण केला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांनी दिली आहे.
आज पुणे येथे को-जन इंडियाच्या बैठकीत राज्य साखर संघाचे चेअरमन व को -जन इंडियाचे उपाध्यक्ष डॉ जयप्रकाश दांडेगावकर यांनी थोरात कारखान्याने अवघ्या तीन महिन्यात हा प्रकल्प कार्यान्वित केल्याबद्दल कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांचा सत्कार केला आहे. यावेळी संचालक तथा श्रीगोंदा सह साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांवर वाटचाल करणाऱ्या थोरात सहकारी साखर कारखान्याने काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी, सभासद , ऊस उत्पादक, कामगार यांचे हित जपताना सातत्याने विक्रमी भाव दिला आहे. नव्याने उभारलेल्या 5500 मे. टन क्षमता व 30 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प हा यशस्वीपणे कार्यरत असून इतरांसाठी दिशादर्शक ठरला आहे.
याच बरोबर कारखान्याने छतावरील सोलर सिस्टीम द्वारे 750 किलोवॅट वीज निर्मितीचा प्रयोग अवघ्या तीन महिन्याच्या कालावधीत पूर्ण करून नुकताच कार्यान्वित केला आहे. या सोलर सिस्टीम मधून एका तासात 750 युनिट वीज तयार होणार आहे. यातून दिवसाचे बारा तासात 9000 युनिट तयार होतील. कारखान्याच्या ऑफ सीजन काळात ही वीज, ऊर्जामहामंडळाला विकली जाणार आहे . या प्रकल्पाच्या उभारणीचा 2 कोटी 90 लाख रुपये खर्च अवघ्या अडीच ते तीन वर्षात वसूल होणार आहे. यामुळे कारखान्याला नक्कीच लाभ होणार आहे . कारखान्याने उभारलेल्या सौर ऊर्जेवरील दिशादर्शक रूफ टॉप सोलर प्रकल्पाचे को-जन इंडियाचे संचालक मंडळाच्या बैठकीत कौतुक करण्यात आले
कारखान्याने उभारलेल्या या यशस्वी प्रकल्पाबद्दल, को-जनचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार , काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, मा. आ डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे ॲड .माधवराव कानवडे, बाजीराव पा.खेमनर, रणजीतसिंह देशमुख, इंद्रजीत भाऊ थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, शंकरराव पा. खेमनर, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे ,राजेंद्र गुंजाळ, कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, सर्व संचालक मंडळ व सभासद यांनी अभिनंदन केले आहे