बसस्थानकातील अस्वच्छता व तेथील दिव्यांगाची शौचालये म्हणजे घाणीचे आणि अस्वच्छतेचे आगार
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुमारे सात एकर जागेवर राज्यातील प्रथम क्रमांकाचे दोन मजली हायटेक आणि आर्कषक स्वरुपाचे बसस्थानक प्रवाशांच्या सर्व सोयी सुविधांसाठी सज्ज आहे. या बसस्थानकाने शहराच्या वैभवात मोठी भर घातली आहे परंतु सध्या याच बसस्थानकातील अस्वच्छता व तेथील दिव्यांगाची शौचालये म्हणजे घाणीचे आणि अस्वच्छतेचे आगार बनते आह. दिव्यांगांच्या शौचालयाची स्वच्छता आणि देखरेख अभावी बोजवारा उडाला आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या बसस्थानकातून दिवसभरात हजारो प्रवाशांची व शेकडो बसची वर्दळ असते. पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या या बसस्थानकावर इतर राज्यातील बसेस सुद्धा मोठ्या प्रमाणात फेर्या मारत असतात. परंतू या स्थानकात दिव्यांग लोकांसाठी जे शौचालय आहे त्याचा पुरता बोजवारा उडाला आहे. संबंधित कंपनीचे या प्रश्नाकडे लक्ष नसल्याने दिव्यांगांचे प्रचंड हाल होत असतात. त्यातील उपयोगी पाण्यांचे नळ आणि दरवाजा मोडकळीस आला असून कमोड भांडे देखील नेहमी अस्वच्छ असते. या शौचालयात फावडे, घमेले, साफसफाईचे सामान सर्वत्र अस्थाव्यस्त पडलेले असते. मुख्य दरवाजाची मोडतोड झाली आहे. या शौचालयात दिव्यांग लोकांसाठी विनामूल्य सेवा आहे असा आदेश असतानाही तेथील सुलभ शौचालयाचे कर्मचारी जबरदस्तीने दिव्यांग लोकांकडून शुल्क आकारतात. या सर्व प्रकारामुळे दिव्यांग लोकांची येथे मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे. तालुक्याच्या ठिकाणी खेड्यापाड्यातून आणि इतर शहरातील अनेक दिव्यांग लोक येत असतात. या सर्व सुविधा नेहमी प्रमाणे पुर्ववत व्हाव्यात अशी मागणी संतप्त दिव्यांगांकडून होत आहे.