गुरूजी राजकारण आणि मोबाईलमध्ये व्यस्त

0
1640

जि. प. शाळेत घटती विद्यार्थी संख्या चिंताजनक

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर
– शिक्षण क्षेत्र हे गुंतवणुकीचे क्षेत्र नाही. त्यामुळे या क्षेत्रात पैसे गुंतवून खर्च वाढवून घेण्याऐवजी शासनाने खासगीकरणाला प्राधान्य दिले. त्यामुळे आज गावोगावी खासगी शाळांचे पेव फुटले आहे. त्यातच खासगी शाळांमध्ये चांगले शिक्षण मिळते असा समज वाढल्याने पालकांचाही कल बदलला आहे. पर्यायाने जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडू लागल्या आहेत. त्यातच जिल्हा परिषदेच्या काही कामचुकार शिक्षकांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मोबाईलमुळे आधीच मुलांचे प्रचंड नुकसान होत असताना शिक्षकही मोबाईलच्या आहारी गेल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे.


तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद प्राथमिक शाळांनी नावलौकिक मिळवून असंख्य विद्यार्थी घडवले आहे. प्रामाणिक शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता टिकविण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. परंतु अनेक शाळांमध्ये शासकीय पगार घेऊन कामचुकारपणा, राजकारण, पर्यायी व्यवसाय, नको नको ते उद्योग करणारे शिक्षक यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा घसरला आहे. तालुक्यातील सुकेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा गुणवत्तापूर्ण म्हणून गणली जायची. त्यामुळे खाजगी शाळेतून मोठ्या संख्येने व मोठ्या विश्‍वासाने विध्यार्थी या शाळेत आले होते. हळूहळू पटसंख्या वाढली. परंतु काही आळशी व राजकारणी वृत्तीमुळे अडीचशे पटसंख्या असलेल्या शाळेत फक्त दीडशे, पावणेदोनशे मुले शिल्लक राहिल्याने शाळेचे अस्तित्व धोक्यात आले आहे.


गरीब, सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना जिल्हा परिषदेची शाळा हक्काची वाटत होती. मात्र ढसाळ कारभारामुळे व ढासळत्या गुणवत्तेमुळे पालक आपल्या पाल्यांना दुसर्‍या शाळेत पाठवण्याच्या विचारात आहेत. जिल्हा परिषदेचे अनेक गुरुजी हे शिक्षक, बँक, राजकीय पक्ष, किंवा अंतर्गत राजकारणात नेहमी व्यस्त असतात. मोबाईलवर गेम खेळणे, चॅटिंग करणे, व्हिडिओ पहाणे यातच अनेक वेळा व्यग्र असतात. तसेच स्थानिक राजकारणी देखील या गुरुजींना गावपातळीवरच्या राजकारणात ओढत असतात. सरकारचे शिक्षणापेक्षा इतर कामात शिक्षकांना जुंपून शिक्षणाकडे दुर्लक्ष करण्यास भाग पाडतात.

तुम्ही मुलांना शिकवण्याऐवजी तासंतास मोबाईलवर बोलत बसता, दिवसभर व्हाट्सएपवर ऑनलाईन असता. असा जाब शाळासमिती किंवा शिक्षण अधिकारी विचारत नाही. शाळा समितीचे सदस्यच त्यांच्या सोबत शाळेत गप्पा मारत बसता. त्यामुळे मुलांच्या शिकवण्याकडे दुर्लक्ष होते. मुलांना अभ्यास करायला सांगून चक्क शाळेत झोपा काढणारे शिक्षक आहेत. शाळेत गटबाजी करून एकमेकांची जिरवजीरव करतात. सुकेवाडीत तर काही शिक्षकांची गावात एवढी वट तयार झाली आहे की आता ते दोन शिक्षक फक्त ग्रामपंचायत लढवायचे बाकी असल्याचे बोलले जाते. पालकांनी समितीला, पुढार्‍यांना वारंवार सांगूनही त्यांच्या सूचनांचे पालन होत नाही. नागरिकांना तुमचे कौतुक सोहळे नको तर विद्यार्थ्यांचे कौतुक सोहळे कधी पाहायला मिळतील याची अपेक्षा आहे. चुकीच्या वागण्यामुळे, न शिकवल्यामुळे गावातील शाळेतील मुलांचे भवितव्य अंधारात दिसत आहे. म्हणून सर्व पालक या वर्षी मुलांना खाजगी शाळेत पाठवण्याच्या तयारीत आहेत. गरीब परिस्थिती असल्यामुळे आमच्याकडे एवढा पैसा नाही परंतु शाळेच्या व गावाच्या शाळा समितीच्या चाललेले राजकारण पाहता मुलांचे भविष्य नक्कीच धोक्यात आहे. अशी चर्चा होत आहे. मुलांना साधे लिहिता वाचता येऊ नये हे चांगलं नाही. अशी बोलकी प्रतिक्रिया पालक व्यक्त करत आहे.
गुरुजी मुले जेंव्हा तुमची तंबाखू खाण्याची मिमिक्री करून घरी सांगतात व तुम्ही मुलांना ये पळा बाहेर तिकडं लांब खेळा नाहीतर मारीन म्हणता आणि वर्गात मस्त ढाराढूर झोपा घेता! तेव्हा आम्ही काय विचार करावा? असा प्रश्‍न पालकांना पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here