घातक हत्यारांसह चार जण ताब्यात, एक फरार
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – मागील कालावधीत संगमनेर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर चोरी व दरोड्याच्या घटना घडल्या आहेत. या चोर्या, दरोडे रोखणे व नागरीकांना भयमुक्त करणे यासाठी पोलीस यंत्रणा वरिष्ठांच्या आदेशाने कामाला लागली होती. दरम्यान आज शुक्रवारी रात्री दिडच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व संगमनेर शहर पोलीसांचे पथक नाशिक पुणे महामार्गावर गस्त घालत असताना एका स्वीफ्ट कारमध्ये अज्ञात तरूण संशयितरित्या बसलेले आढळून आल्याने पोलीसांनी त्यांना हटकले. पोलिसांना पाहून बोबडी वळालेल्या या तरुणांची व त्यांच्या वाहणाची झडती घेतली असता त्यांच्याकडे कुर्हाड, करवत, दोरी, सुरी, मिरची पावडर असे गुन्ह्यात वापरण्यात येणारे घातक शस्त्र आढळून आले. त्यामुळे या तरूणांना या पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र यातील एक जण अंधाराचा फायदा घेत पसार झाला. तर चार जण ताब्यात घेण्यात आले. यातील तीन जण पुणे जिल्ह्यातील तर एक जण अकोले तालुक्यातील आहे.
याबाबत पो. कॉ. प्रमोद गाडेकर यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे की, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या आदेशानुसार म.पो.स.ई. पटेल. कॉ. प्रमोद गाडेकरसह, पो. ना. दातीर, कॉ. आढाव, कॉ. बोडखे, चालक आठरे, होमगार्ड थोरात हे नाशिक पुणे महामार्गावर मध्यरात्री गस्त घालत असताना सुर्या देशी बार पासून काही अंतरावर एक विना नंबरची पांढर्या रंगाची स्वीफ्ट कार उभी होती. या पोलीस पथकाला संशय आल्याने त्यांनी आपली गाडी या गाडीजवळ नेली असता गाडीतून एक बाजूच्या शेतात पळून गेला. त्यामुळे या पथकाने गाडीतील चौघांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी या गाडीची झाडाझडती घेतली असता गाडीत घातक शस्त्र आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी महेंद्र लक्ष्मण मधे (25) नारायणगाव ता. जुन्नर, अविनाश चंद्रकांत जाधव (26) रा. शिरोली बोरी ता. जुन्नर, प्रविण चंद्रकांत जाधव (24) रा. शिरोली बोरी ता. जुन्नर, रोहन रामदास गिर्हे (20) रा. खोडद ता. जुन्नर, मुळ गाव शिदोड ता. अकोले यांना ताब्यात घेतले. तर सोन्या (पुर्ण नाव माहीत नाही) असे पळून गेलेला इसमाचे नाव आहे.
पोलीसांनी या वाहनाची तपासणी केली असता व या आरोपींकडे चौकशी केली असता हे तरूण दरोड्याच्या उद्देशाने जात असल्याचे अढळून आले. यावेळी पोलीसांनी महेंद्र मधे याच्याकडून 15 हजार रूपये किंमतीचा मोबाईल, 1 कुर्हाड, लाकडी मुठ असलेला सत्तूर, अविनाश जाधव याच्याकडून 12 हजार रूपये किंमतीचा 1 मोबाईल, 1 करवत, प्रविण जाधव यांच्याकडून 15 हजार रूपये किंमतीचा मोबाईल, 1 करवत, मिरची पावडर, रोहण गिरे याच्याकडून 15 हजार रूपयांचा मोबाईल, 1 करवत, दोन लाख रूपयांची स्वीफ्ट गाडी असा एकूण 2 लाख 57 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पुढील तपास शहर पोलीस करत आहे.