नियोजन, कष्ट आणि तंत्रज्ञानाच्या जोडीने फुलवली शेती

संदिप गवराम गुंजाळ

झेंडू, टोमॅटो, फ्लॉवर , कारले, काकडी, ऊस पीक पद्धतीतून साधली समृद्धी

संगमनेर (युवावार्ता प्रतिनिधी )

नगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले तालुक्यातील शेतकरी अलीकडील काळात व्यवसायिक शेतीत कुशल झाला आहे. अनेक शेतकर्‍यांनी शेती, दुध व शेतीवर आधारित उद्योगात यशस्वी भरारी घेतली आहे. अशीच लक्षवेधी व प्रेरणादायी गरूड झेप घेणार्‍या संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील संदिप गवराम गुंजाळ यांच्या परिवाराची ही यशोगाथा … वाचकांसाठी

विविध कारणांमुळे शेतकरी कर्जाच्या खाईत जातो, पर्यायाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाते. अनेक वेळा या आत्महत्येला सरकारला किंवा परिस्थितीला दोष दिला जातो परंतु गुंजाळ परिवाराने एकत्रित कुटुंबाद्वारे कष्ट व नियोजनपूर्वक मेहनत केल्यास कसे घवघवीत यश मिळवता येते हा आदर्श इतरांपुढे ठेवला आहे.
अवकाळी पाऊस, शासनाचे दुर्लक्ष, पडते बाजारभाव यामुळे एकीकडे शेतकरी प्रचंड संकटात असताना संगमनेर तालुक्यातील खांडगाव, ता. संगमनेर येथील संदिप गवराम गुंजाळ यांच्या शेतकरी परिवाराने मात्र उत्कृष्ट शेती नियोजन, कष्ट आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत 20 एकर शेतातून आपल्या परिवाराने समृद्धी मिळविली आहे. त्यांचा हा प्रयत्न व यश इतर शेतकर्‍यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.


संदिप गुंजाळ यांच्या कुटुंबात 6 सदस्य आहेत. त्यांच्या मातोश्री विमल, पत्नी जयश्री तसेच भाऊ सुदर्शन व त्यांच्या पत्नी दिपाली असे हे एकत्रित कुटुंब आहे. एकीचे बळ हे त्यांच्या प्रगतीमागे मोलाचा दगड ठरत आहे. पुर्वी गुंजाळ परिवार पारंपारिक पद्धतीने ऊस शेती करीत होते. मेहनत व जिद्दीच्या जोरावर त्यांनी उस शेतीतून यशस्वी उत्पन्न मिळवून आणखी शेती वाढविली. आज या परिवाराकडे 20 एकर शेती आहे. त्यातील 3 एकरावरती झेंडू, 4 एकरावरती कारले, 6 एकरावर टोमॅटो, 4 एकरावरती फ्लॉवर, 2 एकर शेवंती आणि 3 एकरावरती ऊस अशी पिके उभी आहेत. रासायनिक खत व औषधांमुळे उत्पादन चांगले येते मात्र शेतीचा पोत घसरतो. हळूहळू जमीन खराब होते. त्यामुळे शेती करीत असतांना गुंजाळ हे प्रामुख्याने शेणखत व कोंबड खत, (सेंद्रिय खत) यावर जास्त भर देतात. तसेच पिकांचे योग्य नियोजन करतात. वातावरण बदलाचा अभ्यास करून त्यानुसार कोणते पिकेे कधी घ्यावयाची ठरवतात.


संदिप गुंजाळ नियोजनपूर्वक 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान टोमॅटोची ठिबक सिंचन पद्धतीने तसेच मल्चिंग पेपर याचा वापर करून लागवड करतात. टोमॅटोसाठी सुरूवातीला ते जैविक औषधांवरती भर देतात. गरज असल्यास रासायनिक फवारे फवारतात. टोमॅटो बांधणीच्या काळामध्ये टोमॅटो बांधणीसाठी ते डबल तारीचा मंडप करून सुतळीच्या सहाय्याने झाडांना आधार देतात. त्याचा फायदा त्यांना असा होतो की, टोमॅटोचे हार्वेटिंग संपत आल्यानंतर त्यामध्ये वेलवर्गीय पिके करतात. यामध्ये कारले, काकडी, दोडका अशी पिके केल्यानंतर त्या डबल तारीचा वापर केल्यामुळे हवा खेळती राहते. टोमॅटोचे एकरी 3800 ते 4000 हजार कॅरेट उत्पन्न मिळते. त्यामुळे त्यावर केलेली वेलवर्गीय पीके त्यांना भरपूर उत्पन्न देतात. 25 मे सुमारास त्यांच्याकडे फ्लॉवरची लागवड मोठ्या प्रमाणात असते. त्यातून भरगोस उत्पन्न मिळते. दरवर्षी 1 जूनच्या सुरूवातीला 4 ते 5 एकरावर लाल कोलकत्ता व अप्सरा पिवळा झेंडूची लागवड करतात. त्याची काढणी श्रावणाच्या सुरूवातीस चालू होते.

त्यामुळे संपूर्ण श्रावण, गणपतीतील 10 दिवस, नवरात्रातील 9 दिवस, दसरा या सर्व सणांना मोठ्या प्रमाणावर झेंडूची मागणी असते. मागील वर्षी टोमॅटोच्या सोबत मार्चमध्ये 4 एकर कारल्याची लागवड केली. त्यात त्यांनी एका तारीच्या साहाय्याने मंडप उभारणी करून त्यामध्ये क्रॉप सपोर्ट नेटचा वापर केला. त्यामध्ये त्यांना 32 टन कारल्याचे उत्पन्न मिळाले. त्यांना प्रति किलो 30 रूपये प्रमाणे सरासरी भाव मिळाला. खर्च वजा जाता सात लाख पन्नास हजाराचा फायदा झाला. असे त्यांनी अनेक प्रकारचे यशस्वी प्रयोग आपल्या शेतीत केले आहेत. त्यामुळे प्रगतशील शेतकरी म्हणून संदिप गुंजाळांची ओळख पंचक्रोशीत झाली आहे. त्यांनी अनुभवी शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन, दुसर्‍या शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन पहाणी करून त्यांचे अनुभव ऐकून तसेच रोजचे बाजाराभाव, संगमनेरसह इतर मोठ्या बाजारपेठांच्या बाजरभावांची माहिती घेऊन आपला माल विक्रीसाठी पाठवून गुंजाळ परिवाराने आपली प्रगती साधली आहे. त्यांची ही प्रगती खांडगावकरांना दिशादर्शक व अभिमानास्पद तर आहेच पण त्याच बरोबर समस्त शेतकरी वर्गासाठी प्रेरणादायी आहे. श्री. संदिप गवराम गुंजाळ यांचे यशस्वी वाटचालीस दैनिक युवावार्ता परिवाराच्या शुभेच्छा.


संकलन- सुहास सातपुते
दैनिक युवावार्ता, संगमनरे

संदिप गुंजाळ बोलतात की…
शेतातील माल माझ्याशी बोलतात… पाणी कधी पाहिजे, किती पाहिजे, जेवण करीत असतांना भाजी खाल्यावर जशी चव समजतेना तसेच झाडाकडे पाहिल्यावर त्याला काय कमी आहे काय जास्त आहे माझ्या लक्षात येते.
आम्ही बाराही महिने 40/50 मजुरांना रोजगार उपलब्ध करून देतो. मजूर सुद्धा आमच्या मळ्यात काम करत असतांना आनंदी असतात. शेतात सर्वात उंच ठिकाणी 1 कोटी लिटरचे शेततळे आहे. त्याचे 15 एकर क्षेत्रासाठी विनामोटार पाणी शेतीसाठी वापरले जाते. माझा दिवस पहाटे 4 वाजता चालू होतो. सकाळी 9 वाजेपर्यंत शेतातील सर्व फवारे आवरून दिवसभराचे नियोजन केले जाते. या नियोजनानुसार व शेतीविषयक लागणारा अभ्यास करून शेती करत असल्यामुळे आज आमची शेती फायदेशीर व प्रगतशील आहे.
मोलाचे सहकार्य करणारे मान्यवर –
थोरात कारखान्याचे संचालक रमेश भाऊ गुंजाळ यांनी तरूण शेतकरी एकत्रित करून गटशेती तयार केली. त्यातून ते सर्वांना योग्य दरात खते, औषधे, शेतीसाठीची अवजारे, मल्चिंग पेपर तसेच आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी अनेक विद्यापीठाचे तंत्रज्ञ व मार्गदर्शक बोलवतात.
विश्‍व हायटेक नर्सरीचे मालक विरेंद्र थोरात यांनी आम्हाला उच्च प्रतीची हायटेक रोपे उपलब्ध करून दिली. ‘शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी…’ धोरण, नियोजन व कष्ट यामुळे आजपर्यंत एकही पीक वाया गेलेले नाही.
माऊली कृषी सेवा केंद्राचे रामशेठ ढेरंगे, भाऊसाहेब बोर्‍हाडे, निलेश रहाणे, अमोल कोल्हे यांनीही शेतीसाठी आवश्यक असणारी खते व औषधे वेळच्या वेळी उपलब्ध करून दिली आहेत. तालुका कृषी अधिकारी प्रविण गोसावी, कृषी अधिकारी कानवडे तसेच आंबरेे ताई यांचेही महत्त्वपूर्ण सहकार्य लाभते. हवामानात बदल झाला तर पिकांवर काय परिणाम होतो व त्यासाठी काय काळजी घ्यावी लागते या विषयीचे मार्गदर्शनही ते करतात.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख