हजारो नवद्योजकांना प्रेरणादायी असलेले उद्योजक राजेश मालपाणी यांचे ”ओपन सिक्रेट”

उद्योजक राजेश मालपाणी

पुस्तक परिचय – सुदीप किसन हासे

भारतातील नामांकित उद्योग समूह म्हणून गणल्या जाणाऱ्या मालपाणी उद्योग समूहाचे संचालक राजेश मालपाणी यांच्या कॉलेज जीवनापासून ते मालपाणी उद्योग समूह यशस्वी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची प्रेरक यशोगाथा लेखक डॉ. संतोष खेडलेकर यांनी मांडली आहे. एकूण १८ प्रकरणांमध्ये आपल्या अनुभवातून व्यवसाय वृद्धी कशी करायची याचा जणू मूलमंत्रच (ओपन सिक्रेट) राजेश मालपाणी यांनी सांगितला आहे. पणजोबा जगन्नाथ मालपाणी यांनी खराब तंबाखूपासून तपकीर व्यवसायाची पायाभरणी केली. त्यांचे पुत्र दामोदरनाथ यांनी तंबाखूच्या व्यवसायात पदार्पण करत १९४९ साली गाय छाप नाव रजिष्टर करून व्यवसायाचा दीर्घकालीन विचार केला . पुढे राजेश मालपाणी यांचे वडील ओंकारनाथ मालपाणी (भाऊ) आणि काका माधवलालजी मालपाणी यांनी व्यवसायात कष्ट करून प्रगती केली. परिवार आणि कुटुंबाने व्यवसायिक दृष्टिकोन कसा ठेवावा, परस्परांमधील प्रेम-सामंजस्य कसे असावे, चर्चा करून निर्णय कसे घ्यावेत, मनाचा कौल, कामातील पॅशन याचे सुरेख वर्णन लेखक डॉ. संतोष खेडलेकर यांनी केले आहे. राजेश मालपाणी यांचा संगमनेरसारख्या छोट्या शहरामध्ये पेटिट विद्यालयातून सुरु झालेला शैक्षणिक प्रवास लक्ष्मीनारायण इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे केमिकल इंजिनिअरिंग पर्यंत पोहोचला. गणित आणि सांख्यिकीमध्ये अतिशय हुशार असलेल्या राजेश मालपाणी यांनी शिष्यवृत्ती मिळवून स्वबळावर नागपूर येथे प्रवेश मिळविला. इंजिनिअरिंग करीत असतानाच वडिलांना मदत म्हणून आणि व्यवसायातील उत्सुकता असल्याने नागपूरमध्ये आपल्या गाय छाप च्या मार्केटिंग गाडीमागे पळणाऱ्या राजेशजींचा प्रवास थक्क करणारा आहे. वडिलांकडे स्कुटर मागणाऱ्या राजेश मालपाणी यांना आपल्या पत्रात ओंकारनाथ मालपाणी म्हणतात की, कॉलेज आणि हॉस्टेल जवळ आहे. “गतीसाठी स्कुटर हवी पण गतीसुद्धा सुरक्षित हवी”. अगदी सहजपणे स्कुटर विकत घेता येत असताना सुद्धा गरज आहे का? याचा विचार करणारे आणि शिस्तप्रिय वडील कसे असावेत याचा आदर्श घालून देणाऱ्या ओंकारनाथ मालपाणी यांचे मुलांसाठी लिहिलेले “पत्रसंस्कार” पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यानंतरच्या काळात अगदी पान टपरीवर मार्केटिंगसाठी जाणाऱ्या राजेश मालपाणी यांना मात्र गरज म्हणून लुना मिळाली. नागपूरमध्ये व्यवसाय पक्का करीत असताना अनेक अडचणी येत होत्या मात्र संयमी असणाऱ्या राजेश मालपाणी यांनी अडचणींवर मात केली. काही नवीन कल्पना लढवीत व्यवसाय वृद्धी केली. Learn, Unlearn आणि Relearn या त्रिसूत्रीचा वापर ते नेहमीच करीत असतात. व्यवसायातील केमिकल फॅक्टरी वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने केमिकल शाखेत प्रवेश त्यांनी घेतला होता मात्र ती केमिकल कंपनीच बंद झाली. असे असले तरी कोणतेही शिक्षण वाया जात नाही. इंजिनिअरिंग मुळे गणिती आणि विश्लेषण पक्के झाले असे ते सांगतात. इंजिनिअरिंगनंतर मेरीटवर स्पर्धा परीक्षा देत अमेरिका येथील व्हर्जिनिया टेक्निकल विद्यापीठात सिस्टीम इंजिनिअरिंग सुद्धा अव्वल दर्जात पूर्ण केली. याकाळात १९८२ मध्ये स्वबळावर त्यांनी आयबीएम AT२८६ कॉम्पुटर घेतला. नुसता घेतला नाही तर प्रोग्रामिंग लँग्युएजसुद्धा शिकल्या. त्याकाळचे शिक्षक ग्लीकमन यांनी लाखो पगाराची नोकरी देण्याचे आश्वासन दिल्यानंतरही आपल्या मायभूमीकडे परत येऊन १९८५ मध्ये व्यवसाय करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. घेतलेल्या कॉम्पुटरचा वापर तंबाखूच्या व्यवसायात करणारे भारतातील पहिले व्यावसायिक राजेश मालपाणी असतील. कागद-पेन घेऊन गणिती आकडेमोड करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मनात Automation आणि Upgradation चे बीज रोवणारे राजेश मालपाणी आपल्या कर्मचाऱ्यांना कुटुंबातील सदस्यच समजतात. नवा आलेला आजकालचा मुलगा ते अगदी हुशार भाऊ हा स्वीकारभाव कर्मचाऱ्यांच्या मनात दिसत होता. त्याकाळच्या दुष्काळी संगमनेर तालुक्यात विडी बांधणे हे रोजगाराचे साधन होते.

वडील आणि काका अतिशय कष्टाने आपला गाय छाप चा व्यवसाय वाढवत असताना कर्मचारी संपाची मोठी अडचण होत होती. राजेश मालपाणी व्यवसायात आल्यानंतर पॅकिंगमध्ये काही बदल केले आणि त्याचा वाढीव मोबदला म्हणून १९८७ साली २० दिवस संप चालला. राजेश मालपाणी अत्यंत हुशारीने व्यसायातील अडचणी हेरल्या. पॅकिंगमध्ये बदल केला. मशीनमध्ये बदल केला. साचा बदलला. कामगारांचे कष्ट कमी केले. मशीन समजून घेतले. कामगारांच्या कुटुंबातील प्रश्न सोडवले, कामगार नेत्यांबरोबर संवादाला सुरुवात केली. अनुशासन आणले. यासर्व धोरणांमुळे संपाचा प्रश्न राजेश मालपाणी यांनी कायमचा मिटविला. खुल्या आर्थिक धोरणांमुळे अनेक उद्योगधंदे बंद पडत होते. आपल्या व्यवसाय कसा टिकवायचा आणि वाढवायचा याची टिकटिक राजेश मालपाणी यांच्या डोक्यात होती. कर्मचारी केवळ शरीराने कामावर न येता त्यांच्या Hand, Head आणि Heart चा वापर केला पाहिजे असे नवीन धोरण त्यांनी राबविले. स्वतः मालक तंबाखूचे हारे उचलताना पाहून कामगारांना अपृप वाटायचे. नियमावली म्हणजे पळवाट असून अनुशासन असले की यश मिळते हे त्यांनी जाणले. व्यवसायाशी निगडित प्रत्येक घटकाच्या मनोवस्थेत जाऊन विचार केल्यावर यश मिळतेच हे त्यांनी सिद्ध करून दिले. व्यवसायात प्रगती करायची असेल तर आधुनिकता, वेग आणि दर्जा टिकविला पाहिजे. कम्फर्ट झोन च्या बाहेर जाऊन काम केले पाहिजे. No Pain No Gain या उक्तीप्रमाणे त्यांनी स्वतःला व्यवसायात झोकून दिले. फ्लोअरवर विविध प्रकारची गाणी लावणे, नवीन पॅकिंग मशीन आणणे, ऑटोमेशनचा वापर करून स्वतःच डोसिंग मशीन तयार करणे, मशीनचा स्पीड वाढविणे, तीन घडीचे पेटंट, कर्मचाऱ्यांना तंबाखू डस्ट आणि वासाचा त्रास होऊ नये म्हणून डस्ट कलेक्टर बसविणे यामुळे कर्मचारी मनापासून काम करू लागले आणि व्यवसायात प्रचंड गती आली. कामाबद्दलची बांधिलकी आणि उत्तरदायित्वाची भावना कर्मचाऱ्यांमध्ये वाढू लागली.

अगदी कमी शिकलेल्या कर्मचाऱ्यांवर विश्वास आणि सकारात्मकता ठेवल्यामुळे हेच कर्मचारी चांगली मशिन्स बनवू लागले. यश मिळू लागले.राजेश मालपाणी म्हणतात उत्तम कल्पना सुचणे हि कोणाची मक्तेदारी नाही. म्हणूनच वरिष्ठ व्यवस्थापकापासून तर शेवटच्या कर्मचाऱ्याला लागू होईल अश्या कैझेन जीवपद्धतीची संकल्पना अंगिकारली. काम करत असताना ते कमी खर्चात अधिक चांगल्या प्रकारे कसे करता येईल? श्रम, पैसे यांची बचत कशी होईल? ग्राहक अजून समाधानी कसा होईल? हा विचार सर्वजण करू लागले. यातून मालपाणी उद्योग समूहात चमत्कारिक बदल झाले. मशीन्समध्ये बदल झाले. प्रोसेस बदलल्या. वेळ आणि पैसे यांची बचत होत गेली. चहा वाटप करणारा अकौंटिंगचे काम करू लागला. इगो सोडून आणि व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिस देण्यावर या परिवाराने भर दिला. गाय छाप नंतर अमृता चहा व्यवसाय, उत्सव तेल, बादशाह खैनी, विंड मिल, सोलर, वॉटर पार्क, थीम पार्क, साईतीर्थ, इमॅजिका, बांधकाम क्षेत्र, आय.टी. पार्क, सरगम रिटेल्स ची उभारणी करून “मालपाणी ब्रँड” या परिवाराने तयार केला. फॅमिली बिजनेस च्या पुढे जाऊन “हाऊ टू डू बिझनेस ऍज फॅमिली” हि संकल्पना सर्व भावंडांनी मांडली. राजेश मालपाणी यांचे बंधू डॉ. संजय मालपाणी शैक्षणिक, योगा, गीता आदी क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहेत. बंधू मनीष , गिरीश, आशिष हे आपल्या यशाच्या शिखरावर आहेत. पुढची पिढी यश, जय, हर्ष मालपाणी अधिक जोमात व्यवसायात उतरले आहेत. दिव्या मालपणीचे स्किनव्हेस्ट स्टार्टअप भारतात प्रसिद्ध आहे. मातोश्री ललितादेवी, काकू सुवर्णकाकी, पत्नी संगीता, भाऊजयी अनुराधा, रचना, सुनीता, दीप्ती शैक्षणिक, सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. नवनवीन तंत्रज्ञान, उत्कृष्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजीज, ध्यास, अभ्यास, चौकस बुद्धी, मल्टिटास्किंग आदींच्या जोरावर मालपाणी उद्योग समूहाने यशोशिखर गाठले आहे. शेतकरी, पुरातील पान शॉप वाल्याना अर्थिक मदत, कर्मचारी आणि तालुक्यासाठी सामुदायिक विवाह सोहळा, ग्राहक भांडार, घरकुल योजना, शैक्षणिक कर्ज, वेल्फेअर योजना, घरकुल योजना, मालपाणी हॉस्पिटल, मालपाणी विद्यालय, ध्रुव ग्लोबल स्कुल, संगमनेर महाविद्यालय, संगमनेर फेस्टिवल, वृक्षारोपण, स्वछता मोहीम अशा योजनांमुळे आणि सामाजिक कार्यामुळे केवळ मालपाणी उद्योग समूहातील कर्मचारी नाही तर संपूर्ण संगमनेर तालुका आपले कुटुंब मालपाणी परिवाराने बनविले आहे. कुटुंबात वावरत असताना सर्वजण काही नियम पाळत असतात. हे नैतिक अधिष्ठान सर्व भावंडाना एकत्र ठेवत आहे. नात्याचे खाते सर्वात मोठे असून कौटुंबिक मूल्ये जपली की कितीही पिढ्या घरचा व्यवसाय वृद्धिंगत करू शकतात असे राजेश मालपाणी यांचे मत आहे. सुसंवाद असला कि सर्व शक्य आहे असेही ते म्हणतात. मेडिटेशन आणि धार्मिक अधिष्ठान यामुळे जीवन सुखमय झाले आहे.Money, Material, Manpower, Machinery याबरोबरच Moral (मॉरल) म्हणजेच नैतिकता हीच आमच्या यशस्वी व्यवसायाची गुरुकिल्ली असल्याचे राजेश मालपाणी म्हणतात. नम्र, शालीन, आदर्श उद्योजक, आदर्श कुटुंबप्रमुख, आदर्श समाजसेवक असलेल्या राजेश मालपाणी यांच्या प्रेरक कॉर्पोरेट यशोगाथा “ओपन सिक्रेट” या पुस्तकाचे एक एक पान नवीन उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. लेखक डॉ. संतोष खेडलेकर यांनी केलेली अचूक शब्दांची मांडणी पुस्तक वाचायला खिळवून ठेवते. प्रत्येक प्रकरणामधून “की टेकअवेज ” काय आहेत याचीसुद्धा मांडणी उत्तम प्रकारे केली आहे. जीवनाच्या पदोपदी माणसाने कसे वागले पाहिजे याचा वस्तुपाठ या निमित्ताने राजेश मालपाणी यांनी घालून दिला आहे. या पुस्तकातून केवळ उद्योजक राजेश मालपाणी यांचा जीवनपट मांडलेला नसून आपल्या यशाचे गमक, सिक्रेट न ठेवता ते समाजासाठी ओपन करून दिले आहे.

  • सुदीप किसन हासे,
    संचालक, युवा उद्योग समूह, संगमनेर
    मोबाईल – ७७२००४६००५
    ई-मेल – hase.sudeep@gmail.com

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख