लोकनेते मुंडे साहेब जनसागराच्या बिरूदाचे मुकुटमणी हाेते – ना. नितीन गडकरी

0
2454

गाेपीनाथ गडाबराेबरच त्यांचा विचार जनमाणसात जावा – पंकजा मुंडे

मु्ख्यमंत्री शिंदे, ना. दादासाहेब भुसे, खा. हेमंत गोडसे, खा. भारती पवार, खा. प्रितम मुंडे, महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे, आ. छगन भुजबळ, आ. बाळासाहेब थोरात, आ. माणिकराव कोकाटे, आ. सुहास कांदे, मा. आ. राजाभाऊ वाजे यांच्यासह सवर्पक्षीय नेत्यांची उपस्थिती

अलोट गर्दी आणि उत्साहात पार पडला गोपीनाथ गडाचा लोकार्पण सोहळा

युवा नेेते उदय सांगळेंच्या कामाचे सर्वत्र कौतुक

युवावार्ता (किशोर लहामगे / रश्मी मारवाडी) – लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या स्मारकाचे, पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात नांदूर शिंगोटे येथे पार पडला. मुंडे साहेब हे जनसागराच्या बिरूदाचे मुकुटमणी होते असे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे होते. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री ना. दादासाहेब भुसे, केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भारती पवार, महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री आ. छगन भुजबळ, माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात, माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खा. प्रितमताई मुंडे, आ. माणिकराव कोकाटे, आ. सुहास कांदे, मा. आ. राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते.


कार्यक्रमासाठी स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी अलोट गर्दी केली होते. वृध्द पुरूष आणि महिलाही या कार्यक्रमासाठी बाहेरगावाहून येत होते.
पर्यटन विकास महामंडळ, ग्रामविकास निधी व जिल्हा परिषदेच्या निधीतून हे स्मारक साकारण्यात आले आहे. दुपारी 1.30 च्या सुमारास मंत्री ना. गडकरी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गोपीनाथ गडावरील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर या कार्यक्रमाची प्रस्तावना युवा नेते उदय सांगळे यांनी केली. यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.


आ. छगन भुजबळ यांनी यावेळी आपल्या भाषणात स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कामाला उजाळा दिला. राजकारणात आणि सत्तेत उलथापालथ होत असते मात्र मुंडे साहेबांनी जनसामान्यांच्या हृदयात स्थान मिळविले आहे, ते कोणीही हटवू शकत नाही असे गौरवोद्गार काढले. आ. बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्रतील राजकारणात झालेल्या बदलावर भाष्य केले. स्व. मुंडे साहेब व आमची मैत्री राजकारणाविरहीत होती. प्रचंड प्रेम होते. ही मैत्री आणि प्रेमच आम्हाला या कार्यक्रमाला घेवून आल्याचे त्यांनी सांगितले. महसूलमंत्री ना. विखे म्हणाले की, स्व. मुंडे साहेब हे एक वादळ होते. हे वादळ आम्ही संघर्ष यात्रेत, विधानसभेत आणि रस्त्यावर सुध्दा बघितले आहे. नगरमध्येही मोठा गोपीनाथ गड उभारला जाईल असा शब्द यावेळी विखे पाटील यांनी दिला.
पंकजा मुंडे यांना यावेळी गहिवरून आले. स्व. मुंडे साहेबांच्या आवडत्या नांदूर शिंगोटेमध्ये गोपीनाथ गडाचे स्वप्न तुम्ही पूर्ण केले याचा आनंद असल्याचे त्या म्हणाल्या. गड उभारण्याबरोबरच उसतोड कामगारांच्या मुलांचे शिक्षण, त्यांच्यासाठी वसतीगृह आणि सुसज्ज हाॅस्पिटल उभारण्यावर भर देण्याचे त्यांनी सांगितले. सत्तेत असताना आणि मंत्री असताना ऊसतोड कामागारांसाठी काम करण्याची इच्छा होती मात्र या मंडळावर नियुक्ती झाली नाही याची आजही खंत आहे. असे असले तरी कोणापुढेही न झुकता जमलेल्या अलोट गर्दीच्या जोरावरच सामान्य ऊसतोड कामगारांसाठी काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. लोकार्पण सोहळ्याच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल युवा नेते उदय सांगळे व मा. जि.प. अध्यक्ष शितल सांगळे यांचा सत्कार ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला.


मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, स्व. गोपीनाथ मुंडे यांनी 80 टक्के समाजकारण केले आणि 20 टक्के राजकारण केले. त्यांच्या नावे ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहे, हाॅस्पिटल युध्दपातळीवर उभे राहतील आणि प्रेरणेसाठी स्मारकही होतील असे आश्वासन यावेळी दिले. स्व. मुंडे साहेबांनी अठरा पगड जातीच्या लोकांना जोडले यामुळेच शिवसेना-भाजपा युतीचे हे सरकार शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी काम करत असल्याचे सांगितले. मुंडे साहेबांच्या विचारावर चालणाऱ्या लोकांचा हा महासागर पाहून मुख्यमंत्री थक्क झाले.
प्रचंड संघर्ष आणि कष्ट याच्या जोरावर केंद्रातही मुंडे साहेबांनी भक्कम काम केले.
प्रमुख अतिथी ना. नितीन गडकरी यांनी स्व. मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखालीच मी घडलो असे सांगितले. पुणे-मुंबई महामार्गाची योजना मुंडे साहेबांच्या पाठिंब्याशिवाय शक्य नव्हती. त्यांच्या मदतीनेच 3600 कोटीचा प्रोजेक्ट 1600 कोटीला पूर्ण करता आला. मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी ही खरोखर जनमाणसाची पार्टी केली. समर्पित भाव व विचारांवर श्रध्दा ठेवणाऱ्या मुंडे साहेबांना फक्त स्मार्ट सिटी करून नाही तर स्मार्ट व्हिलेज करणे ही खरी श्रध्दांजली ठरेल असे ते म्हणाले.
मा. आ. राजाभाऊ वाजे यांनी उपस्थित पाहुणे आणि पावसातही उभ्या असलेल्या, मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या जनसमुदायाचे आभार मानले.

कार्यक्रमाचा व्हिडीओ बघण्यासाठी : CREDIT – VIRAL IN INDIA

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here