मुस्लिम समाजासह सर्व नागरीक एकवटले
संगमनेर (प्रतिनिधी)
नगर पालीकेच्या तत्कालीन सत्ताधार्यांनी मनमानी पद्धतीने रहिवासी भागामध्ये नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल हे माहित असतांनाही एसटीपी प्लांट (जल नित्सारन केंद्र) उभारण्याचा घाट घातला. या विरोधात स्थानिक रहिवासी व विविध संघटनांनी वेळोवेळी विरोध केला मात्र सत्ताधारी व प्रशासनाने या प्लांटचे काम सुरूच ठेवते हा विरोध मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येथील नागरीकांच्या वतीने मागील 1 महिन्यापासून या विरोधात साखळी उपोषण केले. मात्र तरीही या आंदोलनाकडे लोक प्रतिनिधी तसेच प्रशासनाने ढुंकणही पाहिले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या रहिवाश्यांनी व एसटीपी प्लांट हटाव कृती समितीच्यावतीने तसेच परिसरातील हजारो नागरीकांनी आज शुक्रवार दि. 22 जुलै रोजी दुपारी 3 वाजता येथील प्रांत कार्यालयावर धडक व अभूतपूर्व असा मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले.
नगर परिषदेद्वारे होऊ घातलेल्या एसटीपी प्लांटमधून मोठ्या प्रमाणात घातक वायू निघणार आहे. तसेच संपूर्ण शहरातील मलमुत्र, कचरा या ठिकाणी जमा होणार करून या ठिकाणी त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी सुटणार आहे असा आरोप येथील नागरीकांनी केला आहे. या दुर्गंधी व घातक वायूमुळे परिसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. लहान मुले, वृध्द नागरीकांना विविध आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. तसेच या प्रकल्पातून नदीपात्रात सोडण्यात येणारे केमिकलयुक्त दुषित पाण्यामुळे आजूबाजुच्या अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजनांवर त्याचा दुष्परीणाम होणार आहे. सदर प्लांट हा शहराबाहेर 2 ते 3 किलोमीटर असणे बंधनकारक असतांना हा प्रकल्प नागरी वस्तीत उभारण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील 2 ते किलोमीटर भाग प्रभावीत होणार आहे. सुरूवातीपासून येथील नागरीकांच्या या प्लांटला विरोध नसून त्याच्या जागेला विरोध आहे. पालिकेने सदर प्लांट दुसर्या जागेत हस्तांतरीत करावा अशी मागणी सनदशीर मार्गाने आत्तापर्यंत करण्यात आली आहे. मात्र त्याकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले.
जोर्वे नाका येथील या जागेवर सुरूवातीला महिलांसाठी जॉगींग पार्क, मुलांसाठी गार्डन करण्याचा ठराव नगरपालीकेत करण्यात आला होता. मात्र नगरपालीकेने परस्पर या जागेची निवड करून संबंधीत नगरसेवकांच्या परस्पर सह्या घेऊन संमती घेतली असा एसटीपी हटाव कृती समितीने केला आहे.
एसटीपी प्लांटची जागा बदलून तो नागरी वस्ती बाहेर करावा अशी मागणी लोकशाही मार्गाने करूनही प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही. त्यामुळे आज शुक्रवारी रोजी दुपारी जोर्वे नाका ते प्रांत कार्यालयावर संतप्त नागरिकांनी भव्य मुक मोर्चा काढला. यात भाजप, शिवसेना, वंचित बहुजन आघाडीसह अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, विविध संघटना, तसेच परिसरातील हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
सदर मोर्चा शांततेच्या मार्गाने प्रांत कार्यालयावर आला असता या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी ॲड. श्रीराम गणपुले, मुजीब शेख, शौकत जहागीरदार, इसाक खान पठाण, आयुब शेख, अजीज ओहरा, शाकीब शेख, जमीर शेख, गौस सय्यद, फिरोज पठाण, तनीष मिरझा, अमर कतारी, नजीर शेख, बनोबी पठाण, शफीक बेपारी, संजय भालेरावर यांच्यासह अनेक
नागरीकांनी या एसटीपी प्लांट बाबत नागरीकांची भुमिका मांडत येथील जागेला विरोध दर्शवला. तसेच प्रांताधिकारी यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
मुस्लिम समाजाकडून प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने व शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्यात आला होता. यात महिलांनाही मोठा सहभाग होता. तसेच स्वयंसेवकांनी कुठेही गडबड होणार नाही, पोलीसांवर ताण पडणार नाही, वाहतूक ठप्प होणार नाही यासाठी प्रयत्न केले.
पोलीसांची बघ्यांची भुमिका
शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोर्चा निघणार आहे. त्याचा मार्गही पोलीसांना माहीत होता. तशी परवानगी देखील मोर्चेकऱ्यांनी घेतली होती. परंतु पोलिसांनी यावेळी वाहतुकीचे कोणतेही नियोजन केले नाही. मोर्चाच्या मार्गानुसार वाहतूक वळविणे गरजेचे होते, त्यासाठी अतिरिक्त पोलिसांची नेमणूक करण्याची गरज होती. परंतु संबधित अधिकाऱ्यांनी केवळ मोर्चावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे या मोर्चोत अनेक वाहने नाहक अडकून पडली. तर या वाहनचालकांना रस्ता दाखविण्यासाठी कुठेतरी एकच पोलीस कर्मचारी उभा असल्याचे दिसत होते.