कैलास खेर व डॉ.कुमार विश्वास यांचे कार्यक्रम; तिनशे कलाकार साकारणार रामायण महानाट्य
युवावार्ता ( प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेरचे सुपुत्र आणि सामाजिक बांधिलकी जपणारे सुप्रसिद्ध उद्योगपती, मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी यांच्या एकसष्टी निमित्त दिनांक 17 ते 20 फेब्रुवारी असे चार दिवस संगमनेरमध्ये अभीष्टचिंतन समारोह साजरा होणार आहे. या समारोहामध्ये संगमनेरकर रसिकांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार असल्याची महिती डॉ. संजय, मनिष, गिरीश व आशीष मालपाणी यांनी दिली.
शक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता जाणता राजा मैदानावर माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते डॉ.संतोष खेडलेकर लिखित राजेश मालपाणी यांच्या कार्पोरेट आयुष्यावर आधारित ‘ओपन सिक्रेट’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. यानंतर विश्वविख्यात गायक, संगीतकार कैलाश खेर आणि सहकारी भक्तीरसमय ‘कैलाशा’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. कैलास खेर यांनी भारतीय चित्रपट सृष्टीवर आपला वेगळा ठसा उमटविला आहे. देश-विदेशात मोठ्या प्रमाणात त्यांच्या संगीत रजनीचे कार्यक्रम होत असतात. चित्रपट गीतांच्या सोबतच त्यांची चेतनादायी, जोशपूर्ण व अंगावर रोमांच उभे करणारी भक्तीगीतं गायनशैली लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. दिनांक 18 व 19 फेब्रुवारी असे दोन दिवस संध्याकाळी सहा वाजता जाणता राजा मैदानावरील भव्य व्यासपीठावर जगप्रसिद्ध हिंदी कवी आणि प्रेरक व्याख्याते डॉ.कुमार विश्वास ‘अपने अपने राम’ ही पारिवारिक जीवनमूल्यांची रोमहर्षक कथा सादर करणार आहेत. खेर व डॉ. विश्वास यांचे चाहते जगभर विखुरलेले आहेत. या दोन्ही दिग्गज कलाकारांना प्रत्यक्ष बघण्याची, ऐकण्याची संधी संगमनेरकरांना प्रथमच मिळणार आहे.
सोमवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता जाणता राजा मैदानावर स्वामी गोविंद देव गिरि यांच्या हस्ते राजेश मालपाणी यांचा अभीष्टचिंतन सोहळा होणार आहे. हा सोहळा सर्वांच्या वतीने एकत्रितपणे होत असल्याने व्यक्तिगत सत्कार करण्याचा आग्रह कोणीही धरू नये अशी विनंती करण्यात आली आहे. सत्कारानंतर चार हजार चौरस फुटांच्या भव्य रंगमंचावर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या जीवनावर आधारीत, डोळ्यांचे पारणे फेडणारे दिमाखदार महानाट्य ‘रामायण’ सादर होणार आहे. वाल्मिकी रामायणावर आधारित प्रभू श्रीरामांचे जीवन चरित्र असलेल्या या महानाट्यात रामायणातील अपरिचित कथांचा नाट्यविष्कार बघण्यास मिळेल. या महानाट्यात ध्रुव ग्लोबल स्कूलच्या तिनशे कलाकारांचा सहभाग असणार आहे. प्रभू श्रीरामांच्या गुणांचा आदर्श प्रस्तुत करणारे रोमहर्षक प्रसंग, आकर्षक वेशभूषा, उत्कृष्ट अभिनय व स्मरणीय संवाद, मनमोहक नृत्य, भावपूर्ण गीत-संगीत, अत्याधुनिक व सुंदर ध्वनी-प्रकाश संयोजन यामुळे हे महानाट्य प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे आणि दोन तास थेट रामायण काळात घेऊन जाणार आहे.
या सर्व कार्यक्रमांचा संगमनेरकर रसिकांनी आनंद घ्यावा असे आवाहन मालपाणी परिवाराच्या वतीने जय, यशोवर्धन व हर्षवर्धन मालपाणी यांनी केले आहे. कार्यक्रमास होणारी गर्दी लक्षात घेऊन नागरिकांनी चारचाकी वाहने आणण्याचे टाळावे व कोणत्याही मौल्यवान चीजवस्तू सोबत आणू नयेत असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
ओपन सिक्रेट’ पुस्तकाचे शुक्रवारी प्रकाशन
कार्पोरेट क्षेत्रात अनेकांसाठी मार्गदर्शक ठरलेले, अफाट बुद्धीमता, व्यवस्थापन कौशल्य, नाविण्याचा ध्यास घेऊन उद्योग क्षेत्रात आपले वेगळे अस्तित्व निर्माण केलेले राजेश मालपाणी यांच्या जीवनावर आधारीत साहित्यीक डॉ. संतोष खेडलेकर लिखीत ‘ओपन सिक्रेट ’ या पुस्तकाचे शुक्रवार दि. 17 फेब्रुवारी रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन होत आहे. उद्योगजगताला मार्गदर्शन ठरणारे हे पुस्तक प्रकाशनस्थळी अल्पदरात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.