वीरगाव व समशेरपूरमधील शेतकऱ्यांना पिक विमा भरपाई मंजूर

0
1640

वंचित मंडळांचा सरकारने पुनर्विचार करावा : किसान सभा

युवावार्ता (प्रतिनिधी)
अकोले –
अकोले तालुक्यातील वीरगाव व समशेरपूर परिमंडळातील शेतकर्‍यांना 25 टक्के पिक विमा अग्रिम नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. तालुक्यातील या दोन्ही परिमंडळामध्ये पावसाने 21 दिवसांपेक्षा अधिक खंड दिल्याने ही भरपाई मंजूर करण्यात आली आहे. पिक विमा योजना खरीप 2023 अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान या जोखमीच्या बाबी अंतर्गत नुकसानभरपाई निश्चीत करण्यासाठी अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अधिसूचना काढून याबाबतची घोषणा केली आहे. अकोले तालुक्यातील शेतकरी विविध कारणांमुळे पिक विमा लाभापासून सातत्याने वंचित रहात होते. शेतकर्‍यांना आपत्तीमध्ये संरक्षण मिळावे यासाठी किसान सभेने सातत्याने पाठपुरावा केला होता. तालुक्यातील वंचित गावांनाही पिक नुकसानभरपाई मिळावी यासाठीही किसान सभा प्रयत्न करत आहे.


पिक विमा योजनेतील तरतुदीनुसार तीव्र दुष्काळ स्थिती, पावसातील 3-4 आठवडयापेक्षा जास्त खंड आल्याने एकूण पावसाचे कमी झालेले प्रमाण, तापमानातील असाधारण घट किंवा वाढ जसे दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 20 टक्के पेक्षा जास्त तफावत, पर्जन्यमानातील असाधारण कमी किंवा जास्त प्रमाण जसे दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 20 टक्के पेक्षा जास्त तफावत, मोठ्या प्रमाणात किड रोग यांचा पिकांवरील प्रादुर्भाव व इतर नैसर्गिक आपत्ती, पूर परिस्थिती ज्यामुळे एकूण पिक पेरणी क्षेत्राच्या 25 टक्केपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाल्यास पिक संरक्षित रकमेच्या 25 टक्के रक्कम आग्रीम स्वरूपात देण्याची तरतूद विमा योजनेत करण्यात आली आहे. किसान सभा व समविचारी शेतकरी संघटनांनी पावसातील खंडामुळे होत असलेल्या नुकसानीबाबत विमा संरक्षण मिळावे यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या स्तरावर पाठपुरावा केला होता. अकोले तालुक्यात यानुसार पहिल्यांदाच याबाबतचा लाभ शेतकर्‍यांना मिळतो आहे.
अकोले तालुक्यातील समशेरपूर व वीरगाव परिमंडळातील गावांमध्ये पिक विमा घेतलेल्या शेतकर्‍यांच्या सोयाबीनसाठी प्रति हेक्टरी 14,317 रुपये, भातासाठी 12,940 रुपये, बाजरीसाठी 8,478 रुपये, तर भुईमुगासाठी 9,500 रुपये, अग्रिम नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. उर्वरित परिमंडळातील शेतकर्‍यांचेही पावसाच्या खंडामुळे नुकसान झाले आहे. पिक विमा योजनेतील अटींमुळे हे शेतकरी वंचित रहात आहेत. वंचित शेतकर्‍यांना सरकारने एन. डी. आर. एफ. अंतर्गत नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी किसान सभेचे डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे , एकनाथ मेंगाळ प्रकाश साबळे, ज्ञानेश्वर काकड, राजू गंभिरे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here