ग्राहकांनी खरेदीत पदार्थातील भेसळ व वजनाची खात्री करावी
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – वर्षातील दिपावली हा सण सर्वात मोठा व सर्व धर्मियांसाठी आनंदाचा उत्सव असतो. या सणामध्ये कपडे, फटाके हे मुख्य आकर्षण असले तरी दिवाळी फराळ हा सर्वांच्याच आवडीचा विषय असतो. घरोघरी व रस्त्या रस्त्यावर फराळाचे स्टॉल उभारले गेले आहे. परंतु याच फराळामध्ये काही विघ्नसंतोषी लोक अधिक नफेखोरी करण्यासाठी वजनात फसवणूकीसह तेल, तुप, खवा, मावा यासह अनेक पदार्थांमध्ये भेसळ केली जात असते. केमिकल, घातक पदार्थ भेसळ करून नागरीकांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. मात्र अन्न व औषध प्रशासनाचे याकडे होणारे दुर्लक्ष चिंताजनक आहे. सालाबादप्रमाणे अन्न व औषध प्रशासनाने शहरातील काही ठिकाणी तपासणी करत फराळाचे नमुने तपासणीसाठी नेले तर काही ठिकाणी वजन काट्यांची तपासणी केली.
दिवाळी सण म्हटले की, सुट्या, खेळ आणि फराळ असा त्रिवेणी संगम असतो. या काळात वर्षातील सर्वात जास्त दुध, तुप, खवा, मवा, पनीर, तेल, मिठाईचे पदार्थ विक्री होत असते. दुध उत्पादनापेक्षा अनेक पट या काळात विक्री होते. मग हे अतिरिक्त दुध येते कुठून असा प्रश्न नेहमीच समोर येतो. तर अनेक वेळा या दुधामध्ये केमिकल पावडर टाकली जाते तसेच रासायनिक पध्दतीने दुध तयार केले जाते. हे दुध मिठाई साठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. खव्यातही भेसळ करून वजन वाढविले जाते. ही भेसळ अनेकवेळा लहान मुले, ज्येष्ठ नागरीक यांच्या जीवावर बेतत असते.
सणासुधीच्या काळात रेडिमेड मिठाई म्हणजे भेसळीचे सर्वात जास्त प्रमाण असते. मात्र आकर्षक सजावट, रंगसंगती, याला भुलून नागरीक हे भेसळीची मिठाई खरेदी करतात. तसेच आता मसाल्याच्या पदार्थामध्येही मोठ्या प्रमाणावर भेसळ होऊ लागली आहे. मसाल्याला भडकपणा येण्यासाठी त्यात केमिकलयुक्त रंग टाकले जातात. त्याचबरोबर तांदाळामध्ये सध्या प्लॅस्टिकचे तांदुळ टाकल्याचे अनेक ठिकाणी समोर येते. दरम्यान या मिठाई व खाद्यपदार्थाच्या दुकानांची नियमीत तपासणी होणे गरजेचे असतांना दिवाळीत एक प्रक्रिया म्हणून अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणीचा फार्स अवळला जातो. थातूरमातूर कारवाई केली जाते. मात्र कठोर कारवाई कुणावरही होत नसल्याने दरवर्षी भेसळीचा हा गोरख धंदा वाढत आहे. दरम्यान अन्न पदार्थातील घातक भेसळ रोखण्यासाठी अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा 1954 मंजूर करण्यात आला आहे. पण त्याची कठोर अंमलबजावणी होत नाही. विविध प्रकारच्या अन्न पदार्थातील भेसळीमुळे विषबाधा होते. मानवाच्या अवयवांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. अनेकवेळा जर सेवन झाले तर कर्करोगासारखा गंभीर आजार होतो.
अन्न पदार्थात नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची भेसळ होत असते. मात्र दिवाळीसारख्या सणांमध्ये भेसळीचे प्रमाण जास्त वाढते. सरकारच्या अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई देखील होते. मात्र त्यांची अपुरी यंत्रणा व नागरीकांचे अज्ञान, बेसावदपणा यामुळे या भेसळखोरांचे फावत असते. परंतू नागरीकांनी आता सजग होऊन वजनातील भेसळीसह अन्न पदार्थातील दगड, खडू, भुकटी, लाकडाचा भुसा, कलर, केमिकल यांचे मिश्रण व भेसळ ओळखून आशा विक्रेत्यांना, भेसळखोरांना उघडे पाडणे गरजेचे असून कठोर कारवाईचीही गरज आहे.