संघर्षशील व्यक्तिमत्व – गोरख कुटे

सामाजिक कार्याचा वसा जपणारे

उद्याेजकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व

संगमनेरच्या सामाजिक, राजकीय, सहकार आणि औद्योगिक क्षेत्रातील सक्षम नेतृत्व

संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यात खरी लढण्याची ताकद असते. हे वाक्य तंतोतंत लागू पडतं मित्रवर्य माजी नगरसेवक गोरख कुटे पाटील यांना. हे सांगण्याचे कारण म्हणजे कुटे पाटील यांचा आज अभिष्टचिंतन सोहळा. खरंतर वय वाढत जातं तसं तसं माणसाचं आयुष्य कमी होत जातं. हे जरी एकीकडे खरं असलं तरी दुसरीकडे मात्र वाढत्या वयाबरोबर माणूस परिपक्व होत असतो. संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणीही यशस्वी होत नाही. जोपर्यंत छन्नीचा घाव आपल्या अंगावर घेत नाही, तोपर्यंत दगडाला देखील देवत्व येत नाही. अशाच अपार संघर्षातून कणखरपणे उभे असलेले गोरख भाऊंचे व्यक्तिमत्व आहे.


संगमनेरच्या सामाजिक, सहकार आणि राजकीय क्षेत्रातील एक सक्षम नेतृत्व ठरलेले गोरख कुटे पाटील आज यशस्वी उद्योजक आहेत. काही काळ संगमनेर नगर परिषदेचे नगरसेवक असलेल्या कुटे पाटील यांनी आपल्या कर्तृत्व आणि कामातून एक वेगळी ओळख निर्माण करत अनेकांशी नाळ जोडली आहे. वारसा असला तरी कर्तृत्व सिद्ध करावंच लागतं. याची अनेक उदाहरणे पावलोपावली दिसत असली तरी संघर्षाच्या कठीण काटेरी वाटेवर ठामपणे यश मिळविणारी माणसं नेहमीच समाजाचा आदर्श ठरली आहेत.
आज सर्वच क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या या व्यक्तिमत्त्वाला जीवनात अनेक खाचखळगे पार करावे लागले. कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना एक दिवस घरातील इंधनासाठीचे सरपन संपल्याने उधारीवर सरपन न मिळाल्याने संपूर्ण कुटुंबालाच उपाशीपोटी झोपावे लागले होते, अशा परिस्थितीत आयुष्यामध्ये अपार संघर्ष करत वखार सुरू करत पुढे श्री गणेश सॉ मिलची उभारणी करत यशाची मुहूर्तमेढ रोवणार्‍या वसंतराव कुटे यांच्या आयुष्याचा संघर्ष वयाच्या पंधराव्या वर्षापासून अनुभवणार्‍या गोरख कुटे पाटील यांना व्यवसायातील बारकावे, अडचणी आणि त्यावर मात करण्याचे बाळकडू मिळाले.


वडिलांना व्यवसायात मदत करता करता गोरख कुटे पाटील यांनी या व्यवसायाला आणखी जोड देत वडिलांकडून मिळालेला समृद्ध वारसा पुढे नेला आहे. वडिलांनी उभ्या केलेल्या सॉ मिल व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी यात आणखी भर घालत वसंत लॉन्स सुरू केले. त्या पाठोपाठ त्यांनी परदेशातून आयात केलेल्या कोळशाचा वापर करून के. पी. एंटरप्राईजेस या नव्या व्यवसायाची जोड देत रडत बसू नका, परिस्थितीशी संघर्ष करा, यश तुमचेच आहे असा मोलाचा सल्ला कृतीतून इतरांना दिला.


आपल्या व्यवसायाबरोबरच कुटुंबाला मिळालेला सामाजिक कार्याचा वारसा जोपासत त्यावर पसरलेल्या कोविड काळामध्ये संगमनेरकरांच्या सेवेत उतरलेल्या गोरख कुटे पाटील यांनी आपल्या अद्ययावत असणार्‍या प्रशस्त वसंत लॉन्स प्रशासनाला कोविड सेंटरसाठी मोफत दिले. त्या काळात रुग्णांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था असो किंवा इतर अनेक सुविधा मोफत देण्याचे काम त्यांनी केले. तसेच माळीणसाठी मदत, कोल्हापूर पूरग्रस्तासाठी मदत पाठविणे. तसेच या काळात प्रशासनाला मदत व्हावी यासाठी आलेल्या राखीव पोलीस दलाच्या तुकडीची मुक्कामाची सोय त्याच जवानांबरोबर आपली दिवाळी सुद्धा साजरी केली. अशी देशभक्ती स्वतःत रुजवणारे गोरख कुटे पाटील होय. आयुष्याच्या चढउताराच्या प्रवासात त्यांना पत्नी अर्चना यांची मोलाची साथ लाभली. मुलांना सुसंस्कारित करण्याबरोबरच उच्च शिक्षित करण्यात त्यांचे योगदान आहे. या दाम्पत्याचा मोठा मुलगा अजय सध्या पुण्यामध्ये सीए करत आहे. तर दुसरा मुलगा प्रणव सध्या ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकत आहे.


आयुष्याच्या या सगळ्या घडामोडीत उद्योग, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर आणि शालिनीताई महाराज देशमुख इंदोरीकर, माजी आ. डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, उद्योजक गिरीशभाऊ मालपाणी, राजहंसचे संचालक लक्ष्मणराव कुटे, डॉ. अमोल पाठक, के. के. थोरात, अरुणकाका ताजणे, प्रकाश राठी, सोपानराव कुटे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले असल्याचे ते नम्रपणे सांगतात. अनेक चढउतारांचा सामना करत जिद्द करा, जग बदला असा कृतीतून सल्ला देणार्‍या गोरख भाऊंच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने परमेश्‍वर त्यांना उदंड निरोगी आयुष्य आणि आनंदमय जीवन देवो, याच मनोकामना !


शब्दांकन – अरुणकाका ताजणे
के. के. थोरात, संगमनेर

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख