रस्त्यांसह विकास कामांना असलेली स्थगिती दुर्दैवी– आ. थोरात
संगमनेर ( प्रतिनिधी)—राष्ट्रीय महामार्ग ते मालदाड या रस्त्याच्या कामासाठी मालदाडचे सरपंच गोरक्षनाथ नवले व ग्रामस्थांनी सुरू केलेले आमरण उपोषण आज तिसऱ्या दिवशी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले असून तालुक्यातील 77 कोटींच्या रस्त्यांसह विविध विकास कामांना सरकारने दिलेली स्थगिती ही अत्यंत दुर्दैवी असल्याची टीका मा. महसूल मंत्री तथा विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
मालदाड फाटा, माझे घर सोसायटी समोर मालदाड चे सरपंच गोरक्षनाथ नवले व ग्रामस्थांनी गांधी जयंतीच्या दिवशी रस्त्याच्या कामासाठी बेमुदत अमरन उपोषण सुरू केले होते.
मालदाड, सोनुशी ,नान्नज चिंचोली गुरव हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून या रस्त्याच्या कामाकरता काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी 19 कोटी रुपये मंजूर केले आहे. मात्र या कामाला सध्याच्या सरकारने व पालकमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने याबाबत आमदार थोरात यांनी विधानसभेत सुद्धा आवाज उठवला होता. मात्र तरीही रस्त्याचे कोणतेही काम सुरू झाले नाही म्हणून मालदाडचे सरपंच व ग्रामस्थांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणाला मालदाड मधील महिला, वृद्ध ,तरुण ,नागरिकांनी मोठा उत्स्फूर्त पाठिंबा दिला. तीन दिवस शेकडो नागरिक या ठिकाणी येऊन उपोषणास बसले होते. विद्यमान सरकारच्या स्थगिती देण्याच्या जुलमी धोरणाचा निषेध करत होते.
काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी या उपोषणाला भेट देऊन या रस्त्याचे काम तातडीने होण्याकरता जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांना फोन लावून डीपीडीसी व 30- 54 मधून तातडीने काही निधी उपलब्ध करून हे काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, तालुक्यातील रस्त्यांकरता 77 कोटींचा निधी मंजूर आहे . निधी मंजूर असूनही स्थगितीमुळे अनेक रस्त्यांची कामे प्रलंबित आहे .त्यामुळे नागरिकांच्या मोठ्या अडचणी होत आहे. संगमनेरचा विकास काही लोकांना पहावत नसल्याने त्यांनी ही स्थगिती दिली आहे. असे जनतेचे छळ करणारे होत असलेले राजकारण हे अत्यंत दुर्दैवी आहे.
अनेक अडचणीवर मात करून आपण निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले उन्हाळ्यामध्ये पाणी सोडले. मात्र संगमनेरचा आनंद पहावत नसल्याने त्यांनी तातडीने पाणी बंद केले. हॅपी हायवे लोकार्पण झाला. नागरिकांनी आनंद घेतला. मात्र काही मंडळींना संगमनेरचा आनंद पहावत नसल्याने त्यामध्ये अडचनी आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून अशी स्थगिती व होणारी अडवणूक जास्त दिवस चालणार नाही.
सध्या तालुक्याचा कठीण काळ आहे. मात्र पुढच्या वर्षी मोठ्या मताधिक्याने महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येणार असून पुन्हा जनतेचे व विकासाचे सरकार सत्तेवर येणार आहे.
यावेळी सरपंच नवले म्हणाले की आमदार थोरात यांनी मालदाड गावच्या विकासासाठी सातत्याने मोठा निधी दिला आहे. या रस्त्याच्या कामाला निधी मिळून दिला .मात्र काही लोकांनी खोड करून या कामाला स्थगिती दिली .यामुळे उत्तरेतील अनेक गावांसह मालदाडगावच्या नागरिकांचे मोठे हाल झाले आहे. आ थोरात तालुक्याचे दैवत असून त्यांच्या सूचनेनुसार आपण उपोषण मागे घेत आहोत.
यावेळी सात दिवसात रस्त्याचे काम सुरू करणार असल्याचे बीडिओ नागणे यांनी लेखी निवेदन दिले.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आ थोरात यांच्या मध्यस्थीने सरपंच गोरक्षनाथ नवले यांनी आ थोरात यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण मागे घेतले .यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश वर्पे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, नायब तहसीलदार उमाकांत कडनोर, यांच्यासह मालदाडचे गोरक्षनाथ नवले, प्रा. शिवाजी नवले, रवींद्र नवले, शिवनाथ नवले ,भारत नवले, बाबासाहेब नवले, मधुकर नवले, चंद्रकांत गिरी, लहानु नवले, संभाजी नवले ,रामभाऊ नवले, रतनबाई नवले ,शालिनी नवले, दिपाली नवले, भारतीय नवले, जयश्री नवले, विद्या नवले , भाऊसाहेब नवले आदींसह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार थोरात यांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन
उपोषण स्थळी बसलेले नागरिक हे आपल्या तालुक्यातील आहे. जनतेने आपल्यावर सातत्याने भरभरून प्रेम केले असून तालुक्याच्या विकासाकरता आपण मोठा निधी मिळवला आहे. मात्र काही लोकांनी तालुक्यातील रस्त्यांसह दिलेल्या विकास कामांना स्थगितीमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. याबाबत न्यायालयीन लढाई सुद्धा सुरू असून आमदार थोरात यांनी मालदाड रस्त्याकरता डीपीडीसी व 30- 54 मधून तातडीने निधी मिळावा याकरता जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना फोन लावून तातडीने निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या..
पालकमंत्री व सरकार विरुद्ध नागरिक संतप्त
संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते व विकास कामे यांना पालकमंत्री व विद्यमान सरकार यांनी स्थगिती दिली असून या जुलमी व स्थगिती सरकारचा आम्ही तीव्र निषेध करत असल्याचे मालदाडचे ग्रामस्थ व महिला यांनी निवेदनात म्हटले आहे..