नदी काठावर पुन्हा वाळू रिक्षा दिसल्यास जाळून टाकू
संतप्त नागरिकांचा महसूल पोलीस प्रशासनाला इशारा
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – जुनाट भरधाव वाहणार्या रिक्षातून प्रवरा नदीवरील गंगामाई घाट परीसरातून बेसूमार वाळू तस्करी रात्रंदिवस सुरू होती. या रिक्षांमुळे नदीकाठी फिरण्यास जाणार्या ज्येष्ठ नागरीकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. वारंवार प्रशासनाला सांगूनही याबाबत कारवाई होत नसल्याने अखेर संतप्त झालेल्या नागरीकांनी आज सकाळी या वाळू तस्करांविरूद्ध एल्गार पुकारत वाळूच्या रिकाम्या गोण्यांची होळी केली. तसेच ठिय्या आंदोलन करत यापुढे नदीकाठी वाळू रिक्षा दिसल्यास चालकासह पेटवून देऊ असा थेट इशारा प्रशासनाला दिला.
राज्यात सत्ता परिवर्तनानंतर महसूलमंत्री पद मिळालेल्या ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नविन वाळू धोरणाची घोषणा करत अवैध वाळू तस्करी पूर्णपणे रोखल्याचा दावा अनेक वेळा केला होता. मात्र संगमनेरात प्रवरातिरी अवर्तन काळातसुद्धा बेसुमार वाळू तस्करी सुरू असल्याचे वारंवार समोर येत होते. वाळू वाहतूकीसाठी वाळू तस्कर जुनाट रिक्षांचा वापर करीत आहे. सध्या प्रवरा नदीला पाणी असूनही हे वाळू तस्कर या पाण्यातून वाळू काढून या रिक्षा शहरातून भरधाव वेगाने फिरत आहे. विना नंबरच्या, छत नसलेल्या, चोरीच्या रिक्षांचा या वाळू तस्करीत सर्हास वापर केला जात आहे. भरधाव वेगामुळे अनेकवेळा अपघाताची शक्यता निर्माण होत होती. या रिक्षा चालकांना कोणी अडविल्यास त्यांच्याकडून दमदाटी व प्रसंगी शिवीगाळ केली जात होती. त्यामुळे या वाळू तस्करांविरूद्ध शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासन माहित असूनही कारवाई करत नसल्याने हा संताप दिवसेंदिवस वाढत होता. अखेर आज बुधवारी सकाळी या संतापाचा कडेलोट झाला.
प्रवरा नदीच्या गंगामाईघाट परिसरात सकाळी अनेक नागरीक, महिला, ज्येष्ठ नागरीक, स्पर्धक फिरण्यासाठी, पळण्यासाठी जात असतात. त्यांना या वाळू तस्करांच्या आरेरावीला व दहशतीला अनेक वेळा सामना करावा लागतो. तसेच त्यांच्या रिक्षांमुळे जीविताला धोकाही निर्माण होत. त्यामुळे या नागरीकांनी या वाळू तस्करांविरूद्ध संघर्ष पुकारत त्यांच्या वाळूच्या गोण्या रिकाम्या करून त्यांची होळी केली. महसूल अधिकार्यांना घटनास्थळी बोलवून त्यांची कान उघडणी केली. जर पोलीस, महसूल, प्रशासन या वाळू तस्करांना रोखू शकत नसेल तर आम्ही यापुढे हे सहन करणार नाही या रिक्षा चालकासह पेटवून देऊ याची पुढील जबाबदारी ही प्रशासनाची असेल असा इशारा यावेळी नागरीकांनी दिला. यावेळी गंगामाई ट्रस्ट, पुरोहित संघ, संगमनेर व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व ज्येष्ठ नागरीक उपस्थित होते. या नागरीकांच्या वतीने मुख्याधिकार्यांना यावेळी निवेदन देण्यात आले.
नागरीकांच्या तक्रारीनंत महसूल विभागाचेतलाठी तोरणे आप्पा घटनास्थळी दाखल झाले. यावेळी नागरीकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. तसेच लाचखोरीचा आरोप केला. यावर तोरणे आप्पा यांनी आपण कुणाकडूनही लाच घेत नसून ती घेत असल्यास सिद्ध करून दाखवा आपण राजीनामा देऊ असे सांगितले. तसेच माझ्यावर कोर्टात केस सुरू असून वकील म्हणतात वाळू पकडायचा तुम्हाला अधिकार नाही मग आम्ही करायचे काय असा प्रतिसवाल केला.