पुस्तक परिक्षण – हिरालाल पगडाल यांचे चिन्नण्णा

गडाल यांचे आणखी एक उत्तम साहित्य वाचकांच्या भेटीला

आपल्या वाडवडिलांच्या पिढीच्या अशिक्षित असण्याचे परिणाम त्याने लहानपणापासून बघितले, अनुभवले आणि भोगलेही. जे आपल्या घरात तेच आजूबाजूला आपल्या समाजबांधवांतही.
सुदैवाने मुलांच्या शिक्षणासाठी त्याच्या घरचे सकारात्मक होते. आई, वडील शिक्षणाचे महत्त्व जाणून होते.. त्यामुळे त्याच्या शिक्षणाची गाडी कुठे अडली नाही. कळत्या वयात आल्यापासून आपल्या समाजाची स्थिती तो बघत होता, व्यसनाधीनता, अंधश्रध्दा, रूढींना कवटाळून बसण्याची मानसिकता यामुळे आलेले दारिद्र्य.. हे कुठे तरी थांबले पाहिजे.. पारंपारिक हातमाग धंद्यावर आलेले गंडांतर त्यामुळे सैरभैर झालेला पुरुष वर्ग आणि घराचा डोलारा सांभाळण्यासाठी कसरत करणारी घरातली स्री.. तो आणि त्याच्या समवयस्क मित्रांनी चंग बांधला..जन्मापासून मृत्यू पर्यंतच्या सर्व विधीत होणारी अनावश्‍यक कर्मकांड थांबविण्यासाठी पहिले पाऊल टाकले. समाजातल्या मयताची तिरडी दारू मिळाल्या शिवाय उचलली जायची नाही. समाजातल्या दुढढचार्यांना बाजूला सारून या तरुण मुलांनीच अंत्यसंस्काराची जबाबदारी घेतली. आणि ती यशस्वी केली. बुजूर्गांनी खूप आकांडतांडव करण्याचा प्रयत्न केला. पण या अनाठायी खर्चाला फाटा मिळतोय म्हंटल्यावर आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या समाजाची अव्यक्त सहानुभूती या तरुणांना मिळाली. त्यांचाही हुरूप वाढला.. कधी सौजन्याने तर कधी रेटून नेत या तरुणांनी एक एक करत अनावश्यक, अनाठायी प्रथा बंद केल्या.
नवीन पिढीत शिक्षणाचे प्रमाण वाढले. प्रामाणिक, नम्र, कष्टाळू या अंगभूत गुणांमुळे शहरातील विविध उद्योग व्यवसायात ते सहजपणे सामावून गेले. पदवी, द्विपदवीधर झालेल्यांना अधिक चांगल्या नोकर्‍या मिळाल्या. आता तर डॉक्टर, इंजिनिअर, चार्टर्ड अकाऊंटंट असे उच्च व्यावसायिक शिक्षण घेतलेल्यांची संख्याही लक्षणीय झाली आहे.शिक्षण हि त्याची आवड आहे, पॅशन आहे. तो त्यात मनापासून रमतो. त्याने नोकरीही शिक्षकाची निवडली. शाळाही त्यांच्या मनोभूमिकेला साजेशी. इथे येणारे विद्यार्थी आर्थिक, सामाजिक दृष्ट्या मागास. घरी शिक्षणाचे वातावरण नाही, रोजच हातातोंडाशी गाठ त्यामुळे पालकांनाही मुलांकडे हवे तसे लक्ष पुरवता येत नाही असे. मग सगळी जबाबदारी शिक्षकांवर येऊन पडे. मुलांना गोडी वाटली पाहिजे, त्यांनी रोज शाळेत यायला हवे. याला हे आव्हान वाटले. कोणतेही आव्हान म्हंटले की याला आपसूकच स्फुरण येते. वेगवेगळे उपक्रम, कार्यक्रम, अभ्यासात रुची वाढावी अशा पद्धती यातून आपल्या सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने त्याने शाळेचे वातावरण बदलून टाकले. प्रवेश वाढले हजेरी वाढली, निकाल सुधारले.
काम करून शिकणार्‍यांसाठी यांची संस्था रात्र शाळा चालवत असे. वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थी, दिवसभर काम करून येत असल्याने दमलेल्या त्यांना अभ्यासात गुंतविणे मोठे अवघड. त्यामुळे निकाल शून्य टक्के ठरलेला. त्याच्याकडे रात्र शाळेची जबाबदारी आली. मुख्याध्यापक म्हणून त्याने चार्ज घेतला..रात्र शाळेत असणारे निरुत्साही वातावरण, अव्यवस्था, सोयी सुविधांचा अभाव यामुळे चार तास चालणारी शाळा चांगल्या अवस्थेत आणायची हे आणखी कठिण आव्हान होत.
त्याने आधी सुविधा उपलब्ध केल्या. लाईटची व्यवस्था केली, वीज गेल्यावर ही लाईट असावेत म्हणून इन्व्हर्टर आणला. स्वच्छता वाढली. एकेका मुलाशी बोलला, त्यांच्या अडचणी समजाऊन घेतल्या. अभ्यासाच्या पद्धती बदलल्या, मुलांना वैयक्तिक स्वच्छतेचे धडे दिले. रात्र शाळेत सरकारच्या योजनेतील आहाराची सुविधा मिळवली. विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळू लागला.. आणि या सर्व प्रयत्नांचे परिणाम दिसू लागले. हजेरी वाढली. शाळेची, अभ्यासाची आवड निर्माण झाली. प्रवेश घेणार्‍यांची संख्या वाढली. आणि निकाल शून्य टक्क्यावरून शंभर टक्क्यांवर गेला. हे केवळ त्याच्या धडपडीचे आणि त्याच्या संवेदनशील नेतृत्वाचे यश होते.

तो माणसात अधिक रमतो. स्वाभाविकच तो अनेक समविचारी संघटनांच्या कामात सक्रिय असतो. माध्यमिक शिक्षक संघटनेत जिल्ह्याच्या पदावर काम करताना त्याने आपल्या लढाऊ बाण्याने संघटनेचे अस्तित्व दाखवून दिले. शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घातला. आणि न्याय मिळवून दिला. सामंजस्याने, सौजन्याने आणि वेळ पडली तर संघटनेची ताकद दाखवून लढे यशस्वी केले. राज्य पातळीवरील अधिवेशनाचे शिवधनुष्य पेलले. आणि सर्वांचीच वाहवा मिळविली. शिक्षक मतदारसंघात आपल्या संघटनेचे आमदार निवडून आणले. त्यामुळे सेवानिवृत्त झाल्यावर आजही त्याच्याच नेतृत्वाला संघटनेची पसंती आहे.

बाकी त्याचे राजकिय पक्ष, त्यातला सहभाग, त्याची पदे, त्याची व्यक्तिगत प्रगती, उद्भवलेल्या कौटुंबिक समस्या, जीवावरची दुखणी इ. इ सर्व सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या सर्वसामान्य माणसांसारखीच आहेत..

पुस्तकाच्या ‘चिन्नण्णा ‘ या शीर्षकाने उत्सुकता चाळवली होती. तेलगु समाजात धाकट्या भावाला चिन्नण्णा म्हणतात. हा दोन नंबरचा.. म्हणजे धाकटा. त्याचे, हिरालाल पगडाल याचे हे आत्मचरित्र..
गेली चार साडेचार दशके मी त्याला.. त्याचे काम, सार्वजनिक क्षेत्रातला त्याचा वावर बघतोय.. त्यामुळेही त्याच्या या पुस्तकाची उत्सुकता होती..
गेल्या चार पाच दशकातल्या अर्धनागरी गावातल्या सामान्य स्थितीतून स्वतः ला घडवणार्‍या चळवळ्या तरुणाचे हे आत्मकथन आपल्याला अर्धशतकाच्या समाजजीवनाचे दर्शन घडवते.
चांगले आणि वापरातले चपखल मराठी शब्द असताना तोंडात बसलेले इंग्रजी शब्द उगीचच अनेकदा वापरले आहेत..ते टाळले असते तर बरे झाले असते.. त्याच्या वैचारिक भूमिकेचा आणि राजकिय ओढीचा प्रभाव राज्यातल्या, देशातल्या घडामोडींवर भाष्य करताना पडलेला जाणवतो. खर तर हि भाष्ये अनेकदा विषयांवर वाटतात..
हिरालाल पगडाल याचे हे दुसरे पुस्तक..त्याला आता लिखाणाची चांगलीच गोडी लागली आहे..

विनय गुणे..

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख