गणेशोत्सवावरही दुष्काळाचे सावट
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – श्रावण संपल्यानंतर येणारा पोळा आणि गणेशोत्सव हे सण खरे तर मराठी माणसांसाठी अत्यंत आनंदाचे सण असतात. चांगला पाऊस झालेला असतो, पिके शेतात डौलत असतात, शेतकरी थोडा निवांत झालेला असतो. त्यामुळे बैल पोळा आणि त्यानंतर गणेशोत्सवाच्या तयारीला लागलेला असतो. मात्र कधी नव्हे ते यंदा पोळा सणासह गणेशोत्सव संकटात सापडला आहे. पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. बळीराजा संकटात सापडला असतांनाच लम्पी आजाराने डोके वर काढल्याने पारंपरिक पोळा सणावर विरजण पडले आहे. अनेक शेतकर्यांनी आपले गाय, बैल घरीच सजून गावात ट्रॅक्टरची मिरवणूक काढून ट्रॅक्टर पोळा साजरा केला. तर दुसरीकडे गणेश मंडळांना वर्गणी गोळा करतांना व वर्गणीदाराला वर्गणी देतांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
आज सर्वत्र बैल पोळा सणाचा उत्सव साजरा केला जातो आहे. परंतु हा सण साजरा करताना दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकर्यांमध्ये पुर्वीचा जोश तर नाहीच उलट काळजी वाढली आहे. तर गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. गणेश मंडळांची लगबग सुरू आहे. मंडळांना सर्व काही प्रथम बुकींग करावे लागत असते. मुर्तीची निवड, सजावटीचे सामान, देखावे आदी सर्व गोष्टी बघाव्या लागत असल्याने गणेश मंडळांना आपले आर्थिक बजेट आखावे लागते मात्र यावर्षी त्यांचेही आर्थिक बजेट कोलमडतांना दिसत आहे.
शहरात शंभर-दिडशे छोटे मोठे सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. तर अनेक गावात एक गाव एक गणपती संकल्पना राबविली जाते. मात्र स्वतः चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी व राजकीय, सामाजिक ताकद वाढवण्यासाठी प्रत्येक स्वयंभू नेता धडपडत असतो. त्यामुळे दिवसेंदिवस गणेश मंडळांची संख्या वाढत आहे. दरम्यान यातील अनेक गणेश मंडळांना राजकीय पक्षांचे पाठबळ असल्याने त्यांना मोठा आधार मिळतो. मात्र यावर्षी दुष्काळ आणि निवडणूकांचे कोणतेही वारे नसल्याने हा राजकीय आधार कमकुवत झाला आहे. त्यामुळे वर्गणीचा मोठा भार हा उद्योजक आणि व्यावसायिकांवर पडला आहे. मात्र कुणाकुणाला आणि किती किती वर्गणी द्यायची असा यक्ष प्रश्न वर्गणी देणार्यांना पडला आहे. तर याबाबत कायदा सुध्दा कडक करण्यात आला असून वर्गणीसाठी कुणाला जबरदस्ती करता येणार नाही. त्यामुळे गणेश मंडळे देखील हतबल आहे.