बाप-लेकीने कट्ट्यावर उलगडली अनेक प्रश्नांची उत्तरे
महाविकास आघाडीच येणार – आ. थोरात
मुंबई (प्रतिनिधी) – जागावाटप हा प्रश्न केवळ पक्षापुरता मर्यादित नसतो तर त्या त्या मतदारसंघातील उमेदवार, कार्यकर्ते आणिजनता यांचा विचार करावा लागतो. आघाडी म्हणून काम करत असताना 288 जागांसाठी जागावाटप करताना ताणतणाव होता. या ताणतणावात समन्वय साधण्याची जबाबदारी वरिष्ठांनी मला दिली होती. त्यानुसार काँग्रेस 100, शिवसेना (युबीटी) 90, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) 85 आणि इतर जागा मित्रपक्षांना आम्ही दिल्या. गेल्या 3 वर्षांपासून महायुती सरकारने महाराष्ट्राचे राजकारण खालच्या पातळीला नेले असून या 2024 विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचेच सरकार येणार असे वक्तव्य आ. बाळासाहेब थोरात यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या माझा कट्टा कार्यक्रमात केले. 2019 ला संयमी नेर्तृत्व महाराष्ठ्राला हवे होते. त्यावेळी शरदजी पवार व मी उध्दव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का असा प्रश्न आ. बाळासाहेब थोरात यांना विचारले असता त्यांच्या देहबोलीतून ते तयार आहेत असेच दिसले. कन्या डॉ. जयश्री थोरात यांनाही हा प्रश्न विचारला असता आमचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असतील तर आम्हाला आवडेल असे त्यांनी सांगितले.
धांदरफळ येथे झालेल्या सभेमध्ये विखे यांच्याकडून अतिशय अश्लाघ्य भाषेत माझ्यावर जे बोलले गेले ते कोणत्याही सुसंस्कृत नेत्याला शोभणारे नाही. पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी माझ्याबरोबर महिला गेल्या होत्या त्यावेळी 8-9 तास आम्हाला पोलिसांनी थंडीमध्ये बाहेर बसवून ठेवले. गुन्हा नोंदविण्यासाठी टाळाटाळ आणि पोलिसांवर असलेला दबाव मला खटकला. गेल्या काही वर्षांपासून एकवीरा फाऊंडेशनच्या माध्यमातून मी समाजकारणात होते मात्र या निवडणुकीपासून आता पूर्णवेळ राजकारणात आले आहे. युवा संवाद मेळाव्याच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्याला भेट दिल्याने आ. थोरात साहेबांचे काम आणि जनतेचे प्रेम यावेळी दिसल्याचे डॉ. जयश्री थोरात यांनी सांगितले.
आ. थोरात यांनी यावेळी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. काँग्रेसचा पाया हा संविधानाचा पाया आहे. जातीपातीमध्ये भेदभाव करून भाजपा भारतीयांना वेड्यात काढत आहे असे ते म्हणाले. या सरकारला आर्थिक नियोजन जमले नाही. अनेक खात्यांचे, ठेकेदारांचे पैसे देणे बाकी असताना राज्य सरकारवर कर्जाचा डोंगर झाला आहे. लाडकी बहिण योजना आणली मात्र इतर ठिकाणी भाववाढ झाली. वोट जिहादला उत्तर देताना आ. थोरात म्हणाले की, लोकसभेला शेतकरी आत्महत्या, कांदा उत्पादक शेतकरी, बेरोजगारी, इंधन महागाई असे अनेक प्रश्न होते त्यामुळे महायुतीला अनेक ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला. आम्हाला मिळालेली मते ही नाराज झालेल्या जनतेची होती वोट जिहादची नव्हती. नवव्यांदा निवडणुक लढवत असताना मी वसंतरावांपासून, शिंदेंचे सरकार बघितले मात्र अशा प्रकारचे मनभेद कधीही दिसले नाही. राजकारण एवढ्या खालच्या पातळीला जाईल असे कधी वाटले नसल्याचेही ते म्हणाले. बाप-लेकींनी यावेली अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.