दुसऱ्यांच्या वरातीत नाचणाऱ्यांना संगमनेरकर जेवू घालणार नाही

थोरातांचा बालेकिल्ला भेदने म्हणजे दिवसा स्वप्न पहाणे – संगमनेरकरांची भावना

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- संगमनेर विधानसभा मतदारसंघात 1985 पासुन विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांनी विजयाचा इतिहास रचत विकासाच्या आणि बेरजेच्या राजकारणातून आपले वर्चस्व निर्माण केले आहे. सहकाराचे जाळे, उद्योग व्यवसायाला पुरक वातावरण, शांतता व सौदार्ह वातावरणामुळे आज हा तालुका जिल्ह्यात व राज्यात आघाडीवर आहे हे थोरातांचे विरोधक देखील मान्य करतात. एकदा निवडणूक झाली की विरोधातील उमेदवार जनतेकडे पाठ फिरवतात, पक्षांतरे करून कोलांट उड्या मारतात. पण थोरात कायम जनतेतच राहतात. हे संपूर्ण तालुक्याने पाहिले आहे. आताचे विरोधी उमेदवार देखील अनेक दरवाजे ओलांडून, ऐनवेळी दुसरीकडे उडी मारून शेजारच्यांच्या भरवशावर थोरातांना शह देण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आमचा वाद आमच्या घरात, बाहेरच्यांनी आमची घरे फोडून आमच्या घरात आग लावू नये असे म्हणत येथील मतदारांनी कधीच दुसर्‍यांच्या वरातीत नाचणार्‍यांना जेवू घातले नाही. त्यामुळे, आ. थोरातांपुढे आजपर्यंत कोणाचा ही ठाव ठिकाणा लागला नाही. विकासाच्या भक्कम बुरूजावर उभा असणार्‍या थोरात व काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला भेदने आजपर्यंत भल्याभल्यांना जमले नाही तर कधीही एका ठिकाणी स्थिर नसलेल्या नवख्या अमोल खताळांना शक्य होणार का? असा प्रश्‍न सुज्ञ मतदार विचारीत आहे.


संगमनेरला चळवळीचा, सहकाराचा आणि संघर्षाचा इतिहास आहे. येथील निवडणूका देखील खेळीमेळीच्या वातावरणात होतात. निवडणुकीपूरता विरोध नंतर एकत्र. ही येथील संस्कृती असताना शेजारच्यांच्या नादी लागून काही जण ही संस्कृती, प्रेम, सौदार्हपूर्ण वातावरण गढूळ करण्याचे काम करताना दिसत आहेत. आ. थोरात कायम सांगत आले आहे की, संगमनेरच्या विरोधकांना कधी अडचड येऊ दिली नाही. विरोधकांनी संस्था उभारल्या, कॉलेजस उभारले, मी साधा मिठाचा खडा टाकला असता तर काहीही झाले असते. पण आपण तसे कधी केले नाही. विरोधकांना देखील अडचणीत मदत करण्याची परंपरा जपणारे येथील नेतृत्व आहे. मात्र आताचे काही विरोधक जिथे सत्ता असेल तेथे घुगर्‍या खावून संगमनेरमध्ये घाण करत आहे. शेजारची रसद वापरून, जाती – धर्माच्या नावाखाली चार-दोन लोक सोबत ठेवून या मतदारसंघातील शांतता आणि विकासाला बाधा आणण्याचे काम जाणीवपूर्वक करीत आहेत. ज्यांच्या पाठीमागे ग्रामपंचायत, सोसायटी, दुध डेअरीचा साधा सदस्य नसतो, स्वतःला मताचा अधिकारही नसलेले काही जण, व्हॉटसअ‍ॅप युनिव्हर्सिटीची ट्रोल गँग आणि गावात कुणी विचारत नसलेले स्वयंघोषित पुढारी सध्या तालुक्यात परिवर्तन होईल आशा कांड्या पिकवत फिरत आहेत. नेरेटिव्ह सेट करीत आहेत.


कधीकाळी दुष्काळी म्हणून या तालुक्याची ओळख होती. शहरात तर गल्लोगल्ली विहिरी सारखे खोल खड्डे घेऊन पाणी भरले जात होते. परंतु टप्प्या टप्प्याने या तालुक्याने विकासाचा एक एक पल्ला गाठला. शहराची पाणी टंचाईतून मुक्तता झाली, निळवंडे झाले, कालव्यांचे पाणी येऊ लागले. बाजारपेठे फुलली, समृध्दी आली, शिक्षणाच्या सोयी सुविधा निर्माण झाल्या. परिवर्तन ही जादूची कांडी नाही, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, पाठपुरावा करावा लागतो. परंतु मागचे पुढचे काहीच माहित नाही, स्वतः काही केले नाही ते आज परिवर्तनाचा ढोल बडवीत आहे. चुकीच्या कामाला विरोध झालाच पाहिजे यात दुमत नाही. परंतु फक्त विरोधाला विरोध करुन या तालुक्याचा विकास होणार नाही. हे येथील सुज्ञ मतदार जाणतात. एका पक्षावर, एका नेत्यावर, एका विचारांवर निष्ठा न ठेवणारे, तिकीट मिळतंय म्हणून रात्रीतून पक्षांतर करणारे, शेजारच्यांच्या भरवशावर थोरातांना शह देण्याचा चाललेला प्रयत्न येथील जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. आजपर्यंत या मतदारसंघातील एकही विरोधी उमेदवार निवडणूकीनंतर जेव्हढे मते पडली त्या तरी मतांसाठी शब्दाला जागलेला दिसत नाही. पराभूत झालेले उमेदवार जनतेच्या किती कामाला आले हा संशोधनाचा विषय आहे.


एखाद्या प्रश्‍नावरून आकांडतांडव करणे, बेरोजगार तरुणांचा वापर करून वातावरण तापवणे म्हणजे आम्हाला जनतेची फार काळजी आहे असे होत नाही. येथील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील सुज्ञ असून कुठे आक्रमक व्हायचे कुठे थांबायचे हे जाणत असतात. परंतु आता शेजारच्यांच्या भरवशावर गेल्या काही दिवसांपासून संगमनेरात जे चालू आहे ते संगमनेरच्या विकासाला मारकच आहे. अनेक पक्ष फिरून आलेले, सत्ता हे साधन मानणारे उद्या सत्ता गेली तर पुन्हा पहिल्या घरात परतायला कमी न करणार्‍या अशा नेत्यापासून येथील निष्ठावंत देखील अंतर राखून आहेत. ऐनवेळी पक्षात येऊन पक्षापेक्षा नेत्यावर श्रद्धा ठेवून थेट उमेदवारी मिळविलेल्या आणि आता त्यांची पालखी ज्येष्ठांना वाहावी लागत असल्याने अनेक निष्ठावंत नाराजी व्यक्त करतात. मा. खा. डॉ. सुजय विखे यांना येथील राजकारणाचा, नागरीकांच्या मताचा अंदाज आल्याने मोठ्या डरकाळ्या फोडल्यानंतर माघारी परतले आणि खताळ यांच्या गळ्यात उमेदवारी टाकली. जय झाला तर आमचा आणि पराजय झाला तर खताळांच्या माथी मारून नामानिराळे होण्याची ही चाल नविन नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख