
युवावार्ता (प्रतिनिधी)
शहरातील जाणता राजा रोडवर असणाऱ्या महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला मात्र याबाबतची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी चोरट्यांचा हा प्रयत्न हाणून पाडत सिनेस्टाईल पाठलाग करीत एका चोरट्याच्या मुसक्या आवळल्या तर अंधाराचा फायदा घेत एक जण पसार झाला. फरार झालेल्या दुसऱ्या चोरट्याच्या पोलिसांनी अवघ्या बारा तासाच्या आट मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल व धाडसा बद्दल या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही चोरीची घटना आज शनिवारी पहाटे 1 च्या दरम्यान जाणताराजा मैदानाजवळील गिरीराजनगर परिसरात घडली. या ठिकाणी महाराष्ट्र बँकेचे एटीएम असून रात्रीच्या वेळी या परिसरात फारशी वर्दळ नसते. हिच संधी साधून दोघा चोरट्यांनी लोखंडी टामीच्या साहाय्याने सदर एटीएम फोडून त्यातील रोकड लुटण्याचा प्लान बनवून प्रयत्न सुरू केला होता. दरम्यान एटीएम लुटीच्या घटनांनी सावध झालेल्या महाराष्ट्र बँकेने आपल्या सर्व एटीएम सेंटरवर ‘डिजीटल’ सुरक्षा यंत्रणा बसविली होती. दरम्यान चोरट्यांनी एटीएमच्या पत्र्याला लोखंडी टामी लावून तो उचकटण्याचा प्रयत्न करताच याच डिजीटल यंत्रणेने याचा संदेश थेट बँकेच्या मुख्य शाखेला पाठवला. तेथून तत्काळ नगर व संगमनेर पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत संगमनेरात घडत असलेल्या चोरीची माहिती देण्यात आली. ही माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांच्यासह सचिन उगले, विवेक जाधव व अजय आठरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलीस तेथे पोहोचले त्यावेळी दोघेही चोरटे टामीच्या साहाय्याने एटीएमचा पत्रा तोडीत असल्याचे त्यांना दिसले. मात्र त्यातील एका चोरट्याला पोलीस आल्याचा संशय आल्याने त्याने लगेच तेथून धूम ठोकली तर पोलिसांना प्रत्यक्ष पाहून दुसर्यानेही तेथून पळ काढला. मात्र पोलिसांनी चोर पाळलेल्या मालदाड रोडच्या दिशेने धाव घेतली. दोघाही चोरट्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करीत त्यातील एकाची गचांडी पकडत त्याला खाली पाडले. दुसरा चोर मात्र अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरला होता.

याप्रकरणी महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक अक्षय संजय जवरे यांनी पहाटे दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी पाठलाग करुन पकडलेल्या मंगेश बाळु गांगुर्डे (वय 20, रा.चास, ता.अकोले) याला अटक करीत त्याच्यासह पळालेल्या अज्ञात चोरट्यावर गुन्हा रजी. नंबर 61/ 2023 भा.द.वी.कलम 379, 511, 34 प्रमाणे दाखल केला. असून याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निवांत जाधव करत आहे. पोलिसांनी अनेक दिवसानंतर तत्परता दाखवून केलेल्या या कारवाईचे मात्र सर्वत्र कौतुक होत आहे.

बारा तासात दुसरा चोरटा गजाआड :
संगमनेर शहरात रात्री महाराष्ट्र बँकेेचे ए.टी.एम. फोडू पळणार्या एक जणाला पोलीसांनी पाठलाग करुन पकडले होते. तर दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाला होता. रात्रीही पोलीसांनी तत्पर कारवाई करत दमदार कामगिरी केली होती. तर माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी दुसर्या आरोपीच्या शोधासाठी आज दुपारी अकोले तालुक्यातील चास गाव गाठले. याठिकाणी डोंगरदर्यात या आरोपीचा पोलीस नाईक विजय पवार व अविनाश बर्डे या दोघांनी पाठलाग करुन त्यालाही जेरबंद केले. समीर भाऊराव बर्डे असे या पकडलेल्या दुसर्या चोरट्याचे नाव आहे. दोघेही चोरटे वीस ते बावीस वयोगटातील असून त्यांनी मोठा प्लॅन रचून एटीएम फोडून पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र यंत्रणा व पोलीसांच्या सतर्कतेमुळे ही चोरी उघडकीस आली व अवघ्या काही तासात दोन्ही चोरटे जेरबंद झाले.
