विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी दडपशाही – आ. थोरात
युवावार्ता (प्रतिनिधी)
शिर्डी- काँग्रेस पक्षाच्या शिर्डी शहराध्यक्षावर अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केला आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात झालेल्या शरद पवार यांच्या कार्यक्रमानंतर परतत असताना काँग्रेसच्या शहराध्यक्षावर हा हल्ला झाला आहे. दहा ते बारा जणांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात काँग्रेस शहर अध्यक्ष सचिन चौगुले व सुरेश आरणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर संगमनेरात उपचार सुरू आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघातील लोणी गावात हा हल्ला झाला आहे.
काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले हे काल (मंगळवारी) सायंकाळी कार्यक्रमावरून घरी परतत होते. त्यावेळी दहा ते बारा जणांनी अचानक गाडी समोर आणली आणि त्यांच्यावर लोखंडी गज, हॉकीस्टिक व चॉपरने प्राणघातक हल्ला केला. राहता तालुक्यातील लोणी गावात मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात सचिन चौगुले आणि त्यांच्याबरोबर असलेले सुरेश आरणे हे दोघे जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर दोघांनाही संगमनेर तालुक्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी चौगुले यांची रूग्णालयात जाऊन भेट घेतली. ही घटना दहशतवादी कृत्य असून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. पोलिसांनी निपक्षपातीपणे कारवाई केली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारासुद्धा आ. थोरात यांनी दिला आहे.
काही दिवसांपूर्वी सचिन चौगुले यांनी विखे पाटलांवर निशाणा साधत टीका केली होती. त्यानंतर हा हल्ला झाल्यामुळे पुन्हा एकदा आ. थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील संघर्ष समोर आला आहे. नेमका हल्लेखोर कोण? हे शोधण्याचं पोलिसांसमोर आता आव्हान असून पोलीस काय कारवाई करतात, याकडे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे.