जादुटाेणाविराेधी कायद्यानुसार गुन्हा दाखल
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – विजयादशमीच्या दिवशी विवाहितेच्या नवर्याची दारू सोडविण्याचा बहाणा करून, तिला नदीपात्रात फेरी करावी लागेल, असे सांगून विवाहितेवर अत्याचार करणार्या पप्पू आव्हाड (रा. खांडगाव, ता. संगमनेर) याला पोलिसांनी अटक केली. त्याने मंगळवारी (दि. 24) संध्याकाळी 7:30 वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील खांडगाव शिवारातील नदीपात्रात विवाहितेवर अत्याचार केला होता. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तुझ्या नवर्याची दारू सोडवायची असल्यास नदीपात्रात फेरी करावी लागेल असे आव्हाड विवाहितेला म्हणाला. त्यानंतर विवाहिता त्याच्यासोबत खांडगाव शिवारातील प्रवरा नदीपात्रात गेली. आव्हाड याने तिला नेसलेली साडी काढण्यास सांगितली. खाली लिंबू, नारळ ठेवून त्याला फेरी मारण्यास सांगितले. विवाहिता ही लिंबू, नारळाला फेरी मारत असतानाच त्याने तिच्यावर अत्याचार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हा दाखल असलेला आव्हाड पसार झाला होता. त्यात महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळी जादू अधिनियम 2013 कायद्याचे कलम 3 नुसार वाढीव कलम लावण्यात आले आहे. तसेच त्याला खांडगाव परिसरातून ताब्यात घेत अटक केल्याचे तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव यांनी सांगितले. संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पो.नि. भगवान मथुरे करत आहे.