विकृत घटनांनंतरही भक्तांचे उघडेना डोळे, सोशल मीडियातून ‘चमत्कारांची’ विक्री

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – विज्ञान युगात जग झपाट्याने पुढे जात असताना संगमनेर शहर व तालुक्यात मात्र अंधश्रद्धेचे सावट अजूनही घट्ट असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील काही दिवसांत नाशिकच्या भोंदू ‘खरात बाबा’चे कथित गैरप्रकार, पारनेरमधील महाराजाचा वादग्रस्त प्रताप, वसईच्या महाराजाचा अत्याचार तसेच इतर ठिकाणच्या बुवांवर झालेल्या गंभीर आरोपांच्या घटना समोर आल्या आहेत. तरीदेखील लोकांच्या श्रद्धेचे डोळे उघडत नसल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वी आसाराम बापू, गुरमीत राम रहीम सिंह, रामपाल यांसारख्या तथाकथित बाबांचे कारनामे देशाने पाहिले आहेत. न्यायालयीन कारवाई, तुरुंगवास आणि उघड झालेले गंभीर गुन्हे या सर्वांनंतरही समाजातील काही घटकांचा अशा भोंदू प्रवृत्तीवरील विश्वास कमी झालेला दिसत नाही. संगमनेरात देखील ‘बुवांचे जाळे’ मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. संगमनेर शहरातील विविध भागांसह तालुक्यातील वडगाव पान, गुंजाळवाडी, मांची आणि इतर ग्रामीण भागांत लहान-मोठे तांत्रिक, मांत्रिक, गंडेदोरे देणारे आणि भविष्य सांगणारे बुवांनी अक्षरशः बस्तान बसवले आहे. बाहेरून येणारे ‘बंगाली बाबा’ही येथे मोठ्या प्रमाणात आपला प्रभाव निर्माण करत आहेत. तालुक्यातील वडगाव पान परिसरातील बाबाची आख्यायिका तर राज्यभर पसरली आहे. दारू सोडविणे, लग्न जुळवणे, संतानप्राप्ती, घरातील कलह, आरोग्य समस्या किंवा इतरांबद्दल असलेली समस्या अशा विविध कारणांनी लोक या भोंदू बाबांकडे धाव घेतात. विशेष म्हणजे, काही ठिकाणी दारू सोडविण्याचा दावा करणार्या आश्रमांतील सेवकच व्यसनाधीन असल्याचे प्रकारही समोर आले आहेत.

सोशल मीडियातून ‘चमत्कारांची’ विक्री –
आ जच्या डिजिटल युगात सोशल मीडिया, इंस्टाग्राम, व्हिडिओ प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या तथाकथित बाबांचे ‘चमत्कार’ मोठ्या प्रमाणात पसरवले जात आहेत. आकर्षक व्हिडिओ, भावनिक कथा आणि बनावट अनुभव यांच्या जोरावर लोकांना आकर्षित केले जाते. परिणामी अडचणीत सापडलेले किंवा मानसिकदृष्ट्या खचलेले लोक त्यांच्या जाळ्यात अडकतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन बाबांची ओळख भक्तांना होऊ लागली असून त्यांच्या तथाकथित चमत्काराला नमस्कार करण्यासाठी लाचार भक्तांच्या रांगा लागत आहे.
अंधश्रद्धेविरोधात लढा देणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या आहूतीनंतर महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू झाला. मात्र हा कायदा प्रभावीपणे राबवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांतील काही घटकही अशा भोंदू बाबांच्या प्रभावाखाली असल्याचे दिसत आहे. सध्याच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री व सर्वपक्षीय आमदार, खासदार खरात सारख्या भोंदूच्या नादी लागल्याचे दिसून आले. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी प्रश्नचिन्हात आहे. ‘बाबा’ बदलतात, पण फसवणूक कायम अशी परिस्थिती सर्वत्र पहायला मिळत आहे. एखादा बाबा गैरप्रकरणात, बलात्कारात अडकल्यानंतर त्याचे खरे स्वरूप समोर येते, तेव्हा काही काळ भक्तांमध्ये नाराजी निर्माण होते. मात्र, त्यानंतर तेच भक्त दुसर्या बाबाच्या मागे लागतात आणि पुन्हा त्याच चक्रात अडकतात.

ही साखळी थांबण्याचे नाव घेत नाही. महिलांचे आयुष्य उध्वस्त होते. अशा अनेक प्रकरणांत महिलांवर अत्याचार, आर्थिक फसवणूक आणि कुटुंबांचे उध्वस्त होणे यांसारखे गंभीर परिणाम दिसून आले आहेत. तरीही समाजात अपेक्षित जागृती होताना दिसत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या समस्यांचे समाधान बहुतांश वेळा त्याच्याकडेच असते. मात्र, आत्मविश्वासाच्या अभावामुळे लोक बाह्य आधार शोधतात आणि त्यातून अशा भोंदू प्रवृत्तींचा उदय होतो. आज राज्यासह संगमनेरात निर्माण झालेली ही परिस्थिती केवळ स्थानिक समस्या नसून सामाजिक चिंतेचा विषय आहे. विज्ञान आणि शिक्षणाच्या युगातही जर अंधश्रद्धा इतक्या खोलवर रुजत असेल, तर समाज नेमका कोणत्या दिशेने जात आहे, हा प्रश्न गंभीर आहे.

नागरिकांना दैनिक युवावार्ताचे जाहीर आवाहन
संपूर्ण महाराष्ट्रात भ्रष्टाचार, लैंगिक शोषण आणि बुवाबाजीचे स्तोम उघड होत असताना अद्यापही अनेक ठिकाणी तथाकथित बाबांच्या आश्रमात अंध भक्तांच्या रांगा पाहायला मिळतात. महाराष्ट्रात अंधश्रद्धेविरुद्ध संपूर्ण आयुष्यभर लढा देणारे आणि हौतात्म्य पत्करणारे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे स्मरण जनतेने करावे. डॉ. नरेंद्र दाभोळकर कोणत्या धर्माच्या, जातीच्या विरोधी नव्हते. ते कुणाच्या श्रद्धेच्या विरोधी नव्हते तर ते अंधश्रद्धा आणि बुवाबाजीच्या विरोधात होते. त्यासाठी त्यांनी अनेक प्रकारचे प्रबोधन कार्यक्रम करून जनतेचे समुपदेशन केलेले आहे. तरीही धर्माच्या नावाखाली, अध्यात्माच्या नावाखाली, श्रद्धेच्या नावाखाली सामान्य जनतेला लुटणारे भोंदू, पोटभरू आणि तथाकथित महाराज यांना जनतेने भुलू नये. त्यांच्या चेहर्यावर न जाता स्वतःचे आत्मपरीक्षण करून सत्य काय आहे, योग्य काय आहे, गरजेचे काय आहे याचा विचार करून वास्तवाची, विज्ञानाची कास धरून आपले जीवन जगावे. जगात कोणतीही अशी जादू नाही की, कोणतीही विद्या नाही की मोठा चमत्कार घडू शकेल. परंतु तरीही काही पुराणाचे दाखले देऊन, धार्मिक स्थळांचे दाखले देऊन, धार्मिक ग्रंथांचे दाखले देऊन तथाकथित भोंदू बाबांनी आपली पोटभरू दुकाने उघडलेली आहेत. त्या दुकानाचे गिर्हाईक जनतेने होऊ नये. आपल्या विवेकाला स्मरून, विचार करावा की खरोखर आपलं संकट हा भोंदू दूर कसा करेल? आपल्या अडचणींवर पर्याय किंवा उपाय हा भोंदू देऊ शकला असता तर त्याला त्याचे दुकान चालवण्याची गरज काय? सामान्य जनतेचा श्रद्धाळूपणाचा गैरफायदा घेऊन कोट्यावधी रुपयांच्या मालमत्ता जमा करणारे आणि त्या संपत्तीचा माज म्हणून अनैतिक कृत्य करणारे जे भोंदू बुवा, बाबा, महाराज आणि अन्याय करणारे कोण आहे त्याचा शोध सरकारने घ्यावा, प्रशासनाने घ्यावा. श्रद्धावान जनतेने डोळे झाकून अशा बाबांच्या नादी लागू नये असे झाल्यास खरात सारखे भोंदू निर्माण होतात.




















