अजित दादांचे बंड पूर्वनियोजित – आ. थोरात

0
1679

दबावापुढे झुकून मुळ विचारधारा सोडून शरण जाणार नाही, थोरातांचा निर्धार

काँग्रेसला अच्छे दिन येणार, संधी मिळाली तर मुख्यमंत्रीही होणार – थोरात

युवावार्ता (प्रतिनिधी) संगमनेर – काही जण तपास यंत्रणांच्या धाक – दबावाला बळी पडून फुटले आहे. अशा लोकांना कोणतीही विचारधारा नसते. परंतु काॅंग्रेस पक्ष व माझ्यासारखा कार्यकर्ता विचारधारा मानणारा असतो. त्यामुळे भविष्यात असा कोणताही दबाव आला तरी त्या प्रसंगाला तोंड देऊ, पण मुळ विचारधारेपासून कदापी लांब जाणार नाही किंवा भाजप सारख्या पक्षाला शरण जाणार नाही. अशी परखड भुमिका काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी मांडली. त्याचबरोबर अजित पवार यांच्या बंडाची आम्हाला फार पूर्वीच कुणकुण लागली होती, असा दावाही आ. बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. अजित पवार सभेत केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करायचे. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांवर आवरून बोलायचे. यावरूनच आम्हाला त्यांच्यात काहीतरी शिजत असल्याचा वास येत होता, असे सांगत त्यांनी अजितदादांचे बंड पूर्वनियोजित असल्याचे सांगितले.


अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या 8 आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी एका मराठी न्यूज पोर्टलशी संवाद साधताना उपरोक्त दावा व आपली व पक्षाची भुमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, कोरोनाच्या संकटात आम्ही अडीच वर्षे चांगल्या पद्धतीने काम केले. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्षे पूर्ण करेल असे वाटत होते पण शिवसेना नेते एकनाथ शिंदे मोठ्या संख्येने आमदार घेऊन बाहेर पडले तेव्हा धक्का बसला. या बंडाचा थोडासाही सुगावा लागला नाही याचे आम्हाला आश्चर्य वाटते. त्यानंतर आता वर्षभरानंतर आणखी एक धक्का बसला. काहीतरी होणार असे वाटत असताना अचानक अजित पवार सरकारसोबत जात उपमुख्यमंत्री झाले. काहीतरी शिजत असल्याचा वास आम्हाला येत होता. कारण, महाविकास आघाडी म्हणून आम्ही खूप चांगले काम करत होतो. वज्रमूठ सभेमुळे लोकांमध्ये उर्जा निर्माण झाली होती. काही महिन्यांपूर्वी झालेल्या एका सर्व्हेत महाविकास आघाडीला लोकसभेच्या 38, तर विधानसभेच्या 180 जागा मिळतील असा दावा करण्यात आला होता. त्यामुळे भाजपपुढे आघाडी तोडण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. तेव्हा कुठूनतरी सिग्नल मिळायचे. ईडी व अन्य कारवायांची झालेली वाढ हे सुद्धा एक सिग्नल होते, असे ते म्हणाले.


अजित पवार सभेत केवळ एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधायचे पण देवेंद्र फडणवीसांना मोकळे सोडायचे हा सुध्दा एक सिग्नल होता. हे सर्वांना जाणवत होते. भाजपचा लोकसभा निवडणुकीसाठी मविआत फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यातून काही गोष्टी घडतील याचा अंदाज होता. शरद पवार यांचा राजीनामाही एक सिग्नल होता, असेही बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले. दरम्यान काॅंग्रेस पक्षाची भूमिका मांडताना ते म्हणाले की, पक्ष राज्यघटना व विचारधारा मानणारा पक्ष आहे. सत्तेसाठी किंवा तत्वासाठी दलबदल करणारे नाही. संगमनेर तालुक्यातील सर्व सहकारी संस्था उत्तम व आदर्शवत काम करीत आहेत. परंतु उद्या त्यावर बोट ठेवून कुणी तपास यंत्रणांचा ससेमिरा पाठिमागे लावला तर आपण त्याला सामोरे जाऊ पण कुणा पुढे झुकणार नाही. आज राज्यात काॅंग्रेस हाच खरा विरोधी पक्ष व विरोधकांमधील मोठा भाऊ झा असून आगामी काळात पक्षाला मोठी संधी मिळणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.



आज काही जणांच्या अतिमहत्वकांक्षेमुळे राजकारणाची गटारगंगा झाली आहे. सत्ताधाऱ्यांनी व काही जणांनी खालची पातळी गाठली आहे आणि मीडिया त्यालाच महत्त्व देत आहे. परंतु या सर्वात काॅंग्रेस पक्ष किंवा पक्षाचे नेते कुठेही वायफळ बडबड किंवा चुकीचे वागत नसल्यामुळे जनतेच्या मनात पक्षाचा जनाधार वाढत आहे. भारत जोडो यात्रेमुळे देखील पक्षाला मोठा फायदा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here