कामगार कायद्यांविषयी ज्ञान मिळविणे आणि अमलात आणणे गरजेचे – अ‍ॅड. सुनिता लाड

0
1471

उद्योजकांसाठी संगमनेर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम

युवावार्ता (प्रतिनिधी) – संगमनेर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या वतीने सोमवार दि. १० जुलै रोजी अमृतवाहिनी एम.बी.ए. कॉलेजमध्ये कामगार कायदे या विषयावर नाशिक येथील प्रसिद्ध कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. सुनिता लाड यांचे ३ तासांचे माहितीपर व्याख्यान झाले. कामगार कायद्यांविषयी ज्ञान मिळविणे आणि अमलात आणणे आता गरजेचे असून सर्व यंत्रणा ऑनलाईन झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मंचावर कामगार कायदे तज्ञ अ‍ॅड. मयांक लाड, अमृतवाहिनी एम.बी.ए.चे प्राचार्य डॉ. एम.बी. लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख अतिथींचा परिचय उद्योजक रणजित वर्पे, सौरभ असावा यांनी दिला. उद्योजक नितीन हासे यांनी प्रमुख अतिथींबरोबर उपस्थितांना मार्गदर्शन केले. उद्योजक संदीप फटांगरे यांनी यावेळी अ‍ॅड. लाड यांचा सत्कार केला.


नाशिकमधील विप्रो आणि आघाडीच्या कंपन्यांबरोबर प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या आणि गेल्या २२ वर्षांपासून कामगार कायद्याचा अभ्यास असलेल्या अ‍ॅड. सुनिता लाड यांनी भविष्य निर्वाह निधी (प्रॉव्हिडंट फंड), कर्मचारी राज्य विमा निगम अंतर्गत असणारा विमा (ई.एस.आय.सी.), दुकान कायदा (शॉप ऍक्ट), किमान वेतन कायदा (मिनिमम वेजेस ऍक्ट), बोनस कायदा, ग्रॅच्युइटी कायदा, कारखाना कायदा, कंत्राटी कामगार कायदा, कर्मचारी भरपाई कायदा आणि इतर संबंधित कायदे याबाबत मार्गदर्शन केले. वेतन आणि वेतन प्रशासन, नियुक्ती पद्धती, मनुष्यबळ आणि त्यांच्या समस्या हाताळण्यासाठी कोणत्या तरतूदी केल्या पाहिजेत हेही यावेळी सांगितले.


कामगार कायदे, कामगार समस्या, युनियन हाताळणी, तक्रार हाताळणी, वाटाघाटी आणि तोडगे तसेच विविध कायदेशीर आणि वैधानिक तरतुदींचे पालन, कायदेशीर मसुदा, मते यासाठी उद्योजकांनी काय केले पाहिजे हे मोलाचे मार्गदर्शन केले. महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळाविषयी (पॉश कायदा) आणि त्यासंदर्भात कंपन्यांनी कशी समिती नेमली पाहिजे याचे देखील मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संयोजन करणाऱ्या उद्योजकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
व्याख्यानासाठी संगमनेर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे सदस्य आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यानानंतर उद्योजकांच्या अनेक समस्यांचे त्यांनी यावेळी निराकरण केले. आभार सह्याद्री अग्रोव्हेटचे संचालक नितीन हासे यांनी मानले.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here