उत्तर नगर जिल्ह्यालाही उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता
ऐन पावसाळ्यात टँकरच्या मागणी वाढ
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – 121 वर्षानंतरचा सर्वाधिक कोरडा महिना ठरलेला ऑगस्ट महिनाही ठरला आहे. मात्र पावसाने सरासरी देखील न गाठल्याने नगर जिल्ह्यासह राज्यावर दुष्काळाचे सावट ओढावले आहे. सध्या पावसाळा सुरू असतांना बाहेर उन्हाळा असल्याचा भास होत असल्याने उभी पीके माना टाकू लागली आहे. अनेक ठिकाणी पेरणी झाली मात्र पीक उगावले नाही तर काही ठिराणी पीक उगावले मात्र आता ते पावसाअभावी जळू लागले आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. पाऊस नसल्याने बाजारपेठाही थंडावल्या आहे. एकूणच येणारा अगामी काळ भीषण दुष्काळ घेऊन येतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
यावर्षी पावसाला काहीशी उशिराने सुरूवात झाली. मात्र त्यानंतरही पावसामध्ये सातत्य नसल्याने अनेक ठिकाणी आजही समाधानकारक पाणीसाठा नाही. उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेले भंडारदरा धरणही यावर्षी 15 ऑगस्ट नंतर कसेबसे भरले. तर निळवंडे धरण आजही 85 टक्क्यांवर स्थिर आहे. भंडारदरा पाणलोटात काहीसा समाधानकारक पाऊस झाला असला तरी लाभक्षेत्रात अजूनही पावसाच्या जलधारा कोसळल्या नाही. अकोले तालुका वगळता इतर अनेक तालुक्यात सरासरीप्रक्षा कमी पाऊस झाला आहे. मराठवाड्यातही कमी पाऊस झाला असल्याने जायकवाडीचा पाणीसाठा स्थिर आहे. आगामी काळात नगर व नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीला पाणी सोडण्याची अपरिहर्यता निर्माण होण्याची शक्यता आहे. समन्यायीद्वारे अशी वेळ आल्यास उत्तर नगर जिल्ह्यालाही उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
अपुर्या पावसामुळे व बळीराजा संकटात सापडल्यामुळे उद्योग व्यावसायांवर त्याचा परिणाम होतांना दिसत आहे. कृषि क्षेत्रावर अधारीत अनेक उद्योग व्यवसाय सध्या अडचणीत आले आहे. तर शेती आणि सहकार समृद्ध झाल्यास बाजारपेठा फुलून जातात. मात्र यावर्षी तशी परिस्थिती दिसत नाही. शासनाकडून संभाव्य दुष्काळाबाबत उपाय योजना सुरू झाल्या असल्यातरी या योजना थेट जनते पर्यंत व्यवस्थीत पोहचत नसल्याने त्याचा फारसा परिणाम जाणवत नाही. दरम्यान संगमनेर तालुक्यातील तळेगाव परिसर, पठार भागात ऐन पावसाळ्यात टँकरची मागणी वाढू लागली आहे. अनेक ठिकाणी तर आत्ताच प्रशासनाला टँकर सुरू करावे लागले आहे. लवकरच परतीचा पाऊस सुरू होणार आहे. हा पाऊस जर चांगला झाला नाही तर मात्र भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर्षी अनेक तज्ज्ञांचे अंदाजही चुकले आहे. तर पंजाबराव डख यांच्याबात आता विश्वास उरला नाही अशी परिस्थिती आहे.