
गाड्यांच सायलेन्सर फोडून टाकत गुन्हाही दाखल
तसेच अडीच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला
संगमनेर (युवावार्ता (प्रतिनिधी)
रस्त्यावर स्टंटबाजी करून स्वतः सह इतरांचा जीव धोक्यात घालणारे तसेच रेसिंग गाड्यांचा कर्णकर्कश आवाज करून इतरांना त्रास देणाऱ्या काही टवाळखोर तरुणांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. अशाच प्रकारे दोन टवाळखोर तरूण काल सोमवारी नाशिक पुणे रस्त्यावर घिरट्या घालत असल्याचा व्हिडिओ उपविभागीय पोलीस अधीक्षकांना मिळाला. त्यानंतर या टवाळखोरांचा शोध घेत त्यांच्या दुचाकी जप्त करत त्यांच्या गाड्यांचा सायलेन्सर फोडून टाकत गुन्हाही दाखल करण्यात आला. तसेच त्यांना अडीच हजार रुपये दंड आकारण्यात येऊन तो तात्काळ वसूल देखील करण्यात आला.

याबाबत उपविभागीय पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी माहिती दिली. त्यानूसार काल सोमवार दिनांक 29 जुलै रोजी संगमनेर शहरातील शासकीय विश्रामगृह ते अमृतवाहिनी कॉलेजपर्यंतच्या जुन्या महामार्गावर दोन मोटर सायकलस्वार स्टंटबाजी करत मोटारसायकल पळवत आहेत. त्यामुळे स्वतः सह इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या काही दक्ष नागरिकांनी या हुल्लडबाज, व स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांचे व्हिडिओ फोटोग्राफ्स काढून ते उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. वाघचौरे यांना व्हाट्सअपवर पाठविले. त्याची तात्काळ दखल घेत रात्रीच त्या दोनही तरुणांचा शोध घेऊन त्यांच्या मोटरसायकल जप्त करण्यात आल्या. दोन्ही मोटरसायकलचे कर्णकर्कश आवाज करणारे हॉर्न तोडून टाकण्यात आले. त्याशिवाय दोन्हींपैकी एका गाडीचे सायलेन्सर मॉडिफाइड असल्यामुळे ते देखील तोडून टाकण्यात आले. शिवाय दोन्ही गाड्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. दोन्हीही स्टंटबाज तरुणांना मोटार वाहन कायद्याखाली प्रत्येकी 2500 रुपयांचा दंड करून तो लगेच वसूल करण्यात आला. याबाबत श्री. वाघचौरे यांच्या वतीने शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, जर कोणी रस्त्यावर अशा पद्धतीने स्टंटबाजी करत असल्यास किंवा नियमबाह्य पद्धतीने सायलेन्सर लावून कर्णकर्कश आवाज निर्माण करत असल्यास अशा गाडीचे व चालकाचे फोटो आम्हाला शेअर केल्यास त्यांच्यावर देखील वरील प्रमाणेच कठोर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान या कारवाईचे नागरीकांनी स्वागत केले असून अशी कारवाई नियमित केल्यास अशा घटनांना आळा बसेल.