गरीबांसह प्रतिष्ठीतही बनले कर्जबाजारी
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनरे – बँकेच्या गोल्ड व्हॅल्यूअरने भन्नाट डोके वापरून बँकेतीलच काही जनांशी संधान बांधले. आपल्या ओळखीतील काहींना आपण शिर्डीत एका जागेचा व्यवहार केला असून माझ्याकडे सोने असून त्यावर कर्जे घ्यायचे आहे. फक्त तुमच्या नावावर ठेवतो बदल्यात तुम्हाला काही मदत करतो असे सांगून तालुक्यातील तब्बल शे दोनशे लोकांची फसवणूक केली. ओळखीचा गैरफायदा घेत त्यांच्या नावावर खोटे सोने तारण ठेऊन लाखो रूपयांचे कर्ज घेऊन पसार झाला. आता मात्र लाखोंचे कर्जे विनाकारण अंगावर आल्याने या कर्जदारांचे धाबे दणाणले आहे. या घोटाळ्यात केवळ गरीबच नाही तर अनेक प्रतिष्ठित घरातील महिला, मुले सुध्दा अडकली गेल्याने अनेक कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान आम्ही कर्ज घेतले नाही, ते आम्ही का भरावे. जर बँक आमच्या मागे तगादा लावत असेल तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नसल्याचे काहींनी सांगितले तर ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी बदनामीच्या भितीने हे कर्ज भरले आहे तर काहींनी मुदत मागवून घेतली आहे.
संगमनेर शहर व तालुक्यातील हातावर काम करून पोट भरणार्या व काही प्रतिष्ठित घरातील युवकांशी, महिलांशी जवळीक साधून एका गोल्ड व्हॅल्यूअर सोनाराने एका जमिनीच्या व्यवहारात मला अडचण आली असून मी माझे सोने तारण ठेवतो, मला मदत करा. माझे पैसे मी भरतो, असे सांगून विश्वास संपादन करत या नागरीकांच्या नावावर बँकेत खोटे सोने तारण ठेवले. हा सगळा प्रकार गेल्या चार ते पाच वर्षांपासून सुरू होता. दरवेळी नवा बकरा शोधून त्याला भावनिक करून गोरगरीब लोकांना जाळ्यात ओढून व काही लालच दाखवून त्या सोनाराने बँकेतून करोडो रुपये कर्ज काढले. दरम्यान जर या सोनाराने बँकेत पैसे भरले नाही तर त्याचेच सोने जप्त होईल आपल्याला काय फरक पडणार आहे असा समज करून हे बोगस कर्जदार निवांत राहिले. आता मात्र प्रकरण समोर येताच तो सोनार संगमनेर सोडून पळून गेल्याने हे कर्जदारच गोत्यात आले.
खाया पिया कुछ नही, ग्लास तोडा बाराणे अशी त्यांची अवस्था झाली आहे. ज्यावेळी तो सोनार बँकेत दुसर्यांच्या नावे खाते खोलून सोने तारण ठेवत होता त्यावेळी त्या बँकेच्या व्यवस्थापकाने ते सोने खरे किंवा खोटे याची तपासणी न करताच कसे ठेऊन घेतले? चार ते पाच वर्षे तो प्रत्येकाच्या खात्यात व्याजापोटी काही रक्कम भरत होते. त्यावेळी खातेदाराला ते माहिती नसताना कसे भरले. बँक कर्मचार्याने दुसरा कोण व्याज कसा काय भरतो याची शहानिशा का केली नाही? दरवर्षी खाते नवे जुने केले, त्यावेळी सोने तपासून का पाहिले नाही. असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत. गोरगरिबांना फसवून आता तो सोनार ’शहाण’ पणाने पळून गेला. ज्यांच्यावर अन्याय झाला त्यात काही विद्यार्थी सुद्धा आहेत. अनेक महिला देखील आहेत, अनेक जण तर प्रतिष्ठित घरातील आहे. शासकीय कर्मचार्यांच्या घरातील आहेत. त्यातील अनेकांची एकच चुक की दुसर्यांना डोळे झाकून मदत करणे.
या प्रत्येकाच्या नावे 2 ते 10 लाखांचे कर्ज आहे. एका व्यक्तीच्या नावे 25 लाखांचे कर्ज आहे. जर हे प्रकरण निस्तारले नाही तर आत्महत्या करण्याशिवाय काहीच पर्याय डोळ्यासमोर दिसत नसल्याची प्रतिक्रिया दिली. आता पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालून ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय मिळवून देणे गरजेचे आहे. अन्यथा काही जण नाहक जीवाला मुकतील तर काही बँकेचे दिवाळे देखील निघेल. त्याचबरोबर ओळख आणि मैत्रीचा गळा घोटला जाऊन कुणी कुणाला मदत देखील करणार नाही. असे अनेक प्रश्न निर्माण होणार असल्याने याची सखोल चौकशी करावी अशी मागणी संगमनेरकर करत आहे.