पठार भागात वाळूचा टेम्पो, ट्रॅक्टर जप्त
हजार रूपयांची वाळू मिळणार कधी ?
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – महसूल मंत्र्यांनी वाळू लिलाव व वाळू तस्करी बंद करून नविन वाळू धोरणाची घोषणा केली. मात्र या धोरणाची अंमलबजावणी सुरू न झाल्यामुळे संगमनेरसह पठार भागातील नद्यांमधून बेकायदेशीर वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर अद्यापही सुरूच आहे. साकुर नजीक असणार्या मांडवे, शिंदोडी येथील मुळा नदीच्यापात्रातून बेकायदेशीर रित्या वाळू वाहतूक करणारा विनानंबरचा टेम्पो आणि ट्रॅक्टर संगमनेर येथील महसूलच्या भरारी पथकाने पकडला आहे. या कारवाईत वाळूसह सुमारे सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संगमनेर तालुक्यातील मुळा प्रवरा, आढळा, म्हाळुंगी या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या वाळूचा उपसा सुरू आहे. या बेकायदेशीर वाळू उपश्यावर पोलीस व महसूल विभागाकडून कारवाई देखील सुरू आहे. पठारभागात केलेल्या कारवाईत भारत काळणार (रा. चिखलठाण ता. राहुरी) यांचा विना क्रमांकाचा टेम्पो वाळूवाहतूक करताना आढळून आला. तर तुषार धुळगंड (रा. मांडवे) याचा विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर वाळू उपसा करत असताना मिळून आला. महसूल पथकाने दोन्ही वाहने आणि त्यातील 1 ब्रास वाळू असा 7 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
पठार भागातील मुळा नदीपात्रातून वाळू उपसा होत असल्याची माहिती संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांना समजली. त्यांनी तत्काळ भरारी पथकातील नायब तहसीलदार उमाकांत कडनोर मंडलाधिकारी इरप्पा काळे, कामगार तलाठी अनिल कुंदेकर, प्रदीप गोरे यांना आपल्यासमवेत घेत मुळा नदीपात्र गाठले आणि छापा टाकला. अवैध वाळू आजही नागरीकांना सहा ते सात हजार रूपये ब्रासने मिळत आहे. महसूलमंत्र्यांनी दावा केल्याप्रमाणे हजार ते दिड हजार रूपये घरपोहच वाळू कधी मिळणार याकडे सर्वसामान्य नागरीकांचे लक्ष लागले आहे. महसूल विभागाने तातडीने या धोरणाची अंंमलबजावणी करावी.