संगमनेर मर्चंट्स बँक निवडणूकीत अखेरच्या क्षणी एकोप्याचे दर्शन

व्यापार्‍यांच्या कामधेनूत राजकारण टाळून बिनविरोधचा रचला इतिहास

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – बँकेचे संस्थापक स्व.ओंकारनाथजी मालपाणी यांचा आर्थिक संस्थांमधील कामकाज राजकारणविरहित असावे असा नेहमीच आग्रह असते. त्याचे अनुकरण करतांना उद्योगपती राजेश मालपाणी यांनी प्रत्येक इच्छुक उमेदवारांशी समन्वय साधून बँकेच्या व सभासदांच्या हितासाठी निवडणूक टाळावी असे आवाहन केले. काहींनी क्षणिक असहमती दर्शविली असली तरी शेवटच्या क्षणी सर्वांनीच मनाचा मोठेपणा दाखवत बँकेच्या हितासाठी राजेश मालपाणी यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. आणि बहुचर्चित व्यापार्‍यांची कामधेनू असणारी संगमनेर मर्चंटस् बँक निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली. बँकेच्या स्थापनेनंतर गेल्या 58 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच संस्थेची निवडणूक बिनविरोध झाल्याने या निमित्ताने नवा इतिहासही लिहिला गेला आहे.

आर्थिक सहकार क्षेत्रात गेल्या सहा दशकांपासून दबदबा असलेल्या संगमनेर मर्चंन्ट्स बँकेची निवडणूक जाहीर झाली होती. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सतरा जागांसाठी 39 उमेदवारांनी 56 अर्ज दाखल केले होते. त्यातील अनुसूचित जाती-जमाती मतदार संघात व्यापारी एकता पॅनेलचे उमेदवार राजेंद्र कारभारी वाकचौरे यांची बिनविरोध निवड झाली होती. तर सर्वसाधारण गटाच्या बारा जागांसाठी शेवटच्या दिवसापर्यंत 15 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक लागणारच अशी स्थिती होती.

मात्र निवडणूक टाळण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्नशील असलेल्या उद्योगपती राजेश मालपाणी यांनी अखेरपर्यंत सर्व उमेदवारांशी वारंवार शिष्टाई केली. त्याला प्रतिसाद देत सर्वसाधारण गटातील प्रवीण सिद्राम दिड्डी व सुनिता मनीष मणियार यांनी आपले अर्ज माघारी घेतले. मात्र जुगलकिशोर जगदीश बाहेती यांनी निवडणुकीतून माघार घेण्यास नकार दिल्याने ऐनवेळी व्यापारी एकता पॅनेलचे प्रमुख, राजेश मालपाणी यांनीच आपला अर्ज मागे घेण्याचा प्रस्ताव ठेवला, मात्र त्याला तीव्र विरोध करीत व्यापारी एकता मंडळाचे ज्येष्ठ सदस्य, संस्थेचे माजी चेअरमन श्रीगोपाळ रामनाथ पडताणी यांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाहेती यांच्यासाठी आपली उमेदवारी मागे घेतली.


त्यामुळे सर्वसाधारण गटात राजेश ओंकारनाथ मालपाणी, प्रकाश सुरेश राठी, संतोष मोहनलाल करवा, सम्राट श्यामसुंदर भंडारी, संदीप श्रीनिवास जाजू, प्रकाश विश्‍वनाथ कलंत्री, मधुसूदन सुभाषचंद्र नावंदर, मुकेश रमणलाल कोठारी, महेश बिहारीलाल डंग, वैभव सुनील दिवेकर, संजय शंकरलाल राठी व जुगलकिशोर जगदीश बाहेती यांची बिनविरोध निवड झाली आहे. सर्वसाधारण महिला गटातही शेवटपर्यंत दोन जागांसाठी चार अर्ज शिल्लक राहीले होते. मात्र सुनिता मनीष मणियार व सिमा संजय अंत्रे यांनी मालपाणी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपले अर्ज मागे घेतल्याने या गटात किर्ती राजेश करवा व उषा किशोरकुमार नावंदर या दोन महिला प्रतिनिधींची बिनविरोध निवड झाली.


नागरिकांचा इतर मागास प्रवर्गाच्या एका जागेसाठी व्यापारी एकता पॅनेलच्या रविंद्र रत्नाकर पवार यांच्यासाठी ज्ञानेश्‍वर बाबुराव कर्पेे, अजित रंगनाथ ताजणे व अरुण माधवराव शहरकर यांनी आपले अर्ज माघार घेतले. भटक्या विमुक्त जाती/विशेष मागास प्रवर्गातही व्यापारी एकता मंडळाच्या यांच्यासह गुरुनाथ भिकन बाप्ते, संदीप दत्तात्रय चोथवे, सदानंद अशोक सिसोदे, प्रवीण सिंद्राम दिड्डी व सोमनाथ सदाशिव कानकाटे यांनी अखेरच्या क्षणी आपली उमेदवारी मागे घेत यंदाची निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांना बळ दिल्याने शाम विजय भडांगे यांच्या बिनविरोध निवड झाली.

राजेश मालपाणींच्या “नेतृत्वाचे” सर्वत्र कौतुक

हजारोंची सभासद संख्या आणि कोट्यवधींच्या ठेवी असणाऱ्या संगमनेर मर्चंट बँक निवडणूक बिनविरोध करणे सोपे नव्हते. नेतृत्वगुण, संयमीवृत्ती असलेल्या राजेशजी मालपाणी यांनी हे अशक्य काम शक्य केले. सर्व संगमनेरकरांच्या चर्चेमध्ये फक्त राजेश मालपाणी यांचेच कौतुक आहे.

गड आला पण पडताणींसारखा “सिंह” गेला. श्रीगोपाल चा असा “जयगोपाल” रुख रुख लावणारा – राजेश मालपाणी

जुगलकिशोर बाहेती यांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे निवडणूक बिनविरोध होत नाही हे पाहून कोणी न सांगता स्वतःचा अर्ज श्रोगोपाल पडतानी यांनी मागे घेतला. राजेश मालपाणी यांनी स्वतःचा अर्ज माघारी घेण्याचा ठराव ठेवला. मात्र पडतानी यांनी कसलाही विचार न करता आपला अर्ज मागे घेतला. बँकेसाठी व ग्राहकांसाठी तुझी तळमळ, व्यापारी वर्गातील प्रचंड संपर्क, निस्वार्थ परोपकारी धार्मिक स्वभाव व संस्कार या सर्वांचा विचार केला की बिनविरोध प्रक्रियेत कोणाच्या तरी हट्टामुळे आपण खूप काही गमावले असे वाटते. श्रीगोपाल चा असा जयगोपाल रुख रुख लावणारा आहे. बिनविरोध प्रक्रियेत गड आला पण सिंह गेला असे काहीसे झाले आहे.
तुझ्या प्रेमा पोटी केलेल्या त्यागा समोर नतमस्तक आहे. तुसी ग्रेट हो. सलाम कबूल करो. अशा शब्दात राजेश मालपाणी यांनी आपल्या मनातील घालमेल व्यक्त केली.

उद्योजक संदीप चोथवे म्हणजे “बाजीगर”


निवडणूक अर्ज माघारी प्रक्रियेमध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती / विशेष मागास प्रवर्ग मतदार संघातून अगदी ऐनवेळी उद्योजक संदीप चोथवे यांनीही माघार घेतली. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी हारून जिंकलेल्या संदीप चोथवे याना सर्वजण “बाजीगर” म्हणत आहेत.

  उद्योजक गुरुनाथ बाप्ते, सोमनाथ कानकाटे, ज्ञानेश्वर कर्पे, अरुण शहरकर, अजित ताजणे, प्रवीण दिड्डी, सदानंद शिसोदे, सुनीता मणियार, सीमा अंत्रे यांचेही निवडणूक बिनविरोध होण्यात यांचे असलेले मोलाचे योगदान नाकारता येणार नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख