संपुर्ण महाराष्ट्रात संस्थेच्या ७९ शाखा असून ३००० पेक्ष्या जास्त उद्योजक संस्थेचे सभासद
युवावर्ता (प्रतिनिधी)
महाराष्ट्रीयन उद्योजकांसाठी सातत्यपूर्ण काम करणाऱ्या संस्थापैकी एक नाव म्हणजे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट. ही संस्था २२ वर्षांपासून नोकरीची मानसिकता सोडून मराठी माणसाने उद्योगधंदा करावा, एकत्र येऊन परस्परांना धंदा द्यावा, उद्योगात यशस्वी होऊन श्रीमंत व्हावे ह्या उद्देशाने कार्यरत आहे. संपुर्ण महाराष्ट्रात संस्थेच्या ७९ शाखा असून ३००० पेक्ष्या जास्त उद्योजक संस्थेचे सभासद आहेत तर १०००० पेक्ष्या जास्त उद्योजक संस्थेशी जोडले गेले आहेत. देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये बांधकाम क्षेत्राचे मोठे योगदान आहे म्हणूनच ह्या क्षेत्रातील लोकांनी एकत्र येऊन एकमेकांमध्ये व्यावसायिक देवाणघेवाण करावी ह्या उद्देशाने संस्थेच्या नाशिक-नगर विभागाने ह्या क्षेत्रातील उद्योजकांसाठी नुकताच VABCIDE कॉनक्लेव्ह हा संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम रॅडीसन ब्ल्यू ह्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित केला होता. ह्या कार्यक्रमासाठी संपुर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ २०० उद्योजक उपस्थित होते. प्रत्येक उद्योगाच्या गळ्यात मोत्यांची हार टाकत नाशिक-नगरची टीम सन्मानाने स्वागत करत होती. कार्यक्रमाचे आयोजन एवढे उत्तम होते कि एवढया मोठया संख्येनं लोकं हजर असूनही कुठल्याही प्रकारे गर्दी दिसत नव्हती. रेजिस्ट्रेशन ते रात्रीच्या जेवणापर्यंत सर्व व्यवस्थापन नीटनेटके आणि चोख होते.
ह्या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात इथे आलेल्या व्यवसायिकांनी आपल्या व्यवसायाची थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर नाशिक-नगर रिजनहेड श्री. अमोल कासार यांनी ह्या कार्यक्रमाची संकल्पना मांडली. बोर्ड ऑफ डायरेक्टर श्री. संतोष पाटील यांनी भारत सरकार पायाभूत सुविधांमध्ये अर्थात इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये प्रचंड काम करत आहे, अनेक देश भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत, संधी तयार आहेत, कश्या मिळवायच्या ह्याकडे आपण लक्ष पुरविले पाहिजे असे सांगितले. त्यानंतर ह्या कार्यक्रमात असलेले काही उद्योजकांच्या स्टॉल्सला उपस्थितांनी भेट दिली. दुसऱ्या सत्रात डेप्युटी सेक्रेटरी जनरल श्री. सुहास फडणीस ह्यांनी त्यांच्या मार्गदर्शनात विमाना सारखी उंच झेप जर घ्यायची असेल तर अनावश्यक गोष्टींचं ओझं सोडून द्या. हार्डवर्क नंतर स्मार्टवर्क आणि आता नेटवर्कचा जमाना आहे त्यातून व्यवसाय वृध्दी करावी असे संदेश दिले. VABCIDE ह्या सेलच्या हेड इंटिरिअर डिझायनर सौ. मानसी मांजरेकर यांनी ह्या सेल ग्रुपच्या आता पर्यंतच्या कामगिरीचा आढावा दिला. त्यांनी सांगितले की सध्या ४० करोड पर्यंत परस्परांमध्ये व्यवसाय झाला आहे पण ह्या ग्रुपची क्षमता ५०० करोड पेक्षा जास्त व्यवसाय करण्याची आहे.
दुपारच्या जेवणानंतर ह्या क्षेत्रातील काही व्यावसायिकांची १० मिनिटांची प्रेझेंटेशनस झाली. नाशिकमधील बांधकाम क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या अशोका बिल्डकॉन ह्या कंपनीचे प्रेझेंटेशन झाले ज्यात त्यांनी कंपनी ह्या क्षेत्रातील व्यावसायिकांना अनेक संधी उपलब्ध करून देऊ शकते असे सूचित केले. तिसऱ्या सत्रात, Association of Consulting Civil Engineers of India चे अध्यक्ष आणि व्यावसायिक श्री. विजय सानप यांनी उलगडलेला त्यांच्या जीवनप्रवासाला उपस्थितांनी उभे राहून मानवंदना दिली. प्रत्येक गोष्ट करतांना तुम्ही त्यात नाविन्यपूर्ण बदल केलेत तरच तुमची प्रगती होऊ शकते हे सांगतांना एका दिवसात ३०६ फ्लॅट्स कसे त्यांनी विकले ह्याबद्दल सविस्तरपणे माहिती दिली. शेवटच्या सत्रात संस्थेचे विश्वस्त आणि बांधकाम क्षेत्रात डॉक्टरेट केलेले श्री. अजित मराठे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ह्या कार्यक्रमामध्ये अनेक व्यावसायिक संधीची देवाणघेवाण झाली असेल पण त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करणे महत्वाचे आहे; असे त्यांनी ह्यावेळी सांगितले. ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे अनेक स्पर्धांचे विजेते, अनेक मानाच्या पुरस्कारांचे मानकरी नाशिक भूषण आर्किटेक्ट संजय पाटील सर ह्यांनी नेहमीच निसर्ग व पारंपरिक गोष्टींसह पर्यावरणाची काळजी घेत व त्यांची जपणूक करत संस्था, उद्योग, घर तसेच प्रकल्पांच्या डिझाईन मध्ये त्यांचा सुंदर मिलाफ कश्या प्रकारे घडवून आणतात ह्या बद्दल सांगितले.
त्यांची प्रवाही भाषेतील मुलाखत अमोल कासार सर व सुहास फडणीस सर ह्यांनी घेऊन मितभाषी संजय पाटील सरांना बोलते केले व त्यांचा नाशिक मधील बेचाळीस वर्षांपासूनचा जीवनपट व पर्यावरण पूरक नाशिकचा विकास उलगडून दाखवला. अगदी डिझाईन म्हणजे काय इथ पासून ते ज्या त्या शहरातले मटेरियल त्या त्या शहरात वापरण्याचे तंत्र व कारण त्यांनी सांगितले. प्रमुख पाहुणे व स्पॉन्सर ह्यांच्या निवडी पासून ते त्यांच्या आमंत्रणा पर्यंत व कॉनक्लेव्हच्या कामाचे टीमला मार्गदर्शन करत, वेळेचे सूक्ष्म नियोजन करण्यापर्यंत डेप्युटी रिजन हेड सौ. अश्विनी कुलकर्णी व आर्किटेक्ट उमेश दागा यांची रिजन हेड अमोल कासार ह्यांना साथ मिळाली.
कार्यक्रमाच्या शेवटी नाशिक-नगरच्या टीमने सर्वांचे आभार मानले. ह्या कार्यक्रमाला उपस्थित प्रत्येक व्यावसायिकाच्या चेहऱ्यावर त्याच्या व्यवसायासाठी अनेक संधी तसेच उत्तम मार्गदर्शन आणि पंचतारांकित व्यवस्था मिळाल्याचा आनंद दिसत होता. नाशिक-नगर मध्ये आयोजित प्रत्येक कार्यक्रम नाविन्यपूर्ण असावा तसेच प्रत्येकाला व्यवसायाची संधी उपलब्ध व्हावी असा आमचा होरा असतो आणि ह्या कार्यक्रमातून तो साध्य झाल्याचे नाशिक-नगर रिजनहेड अमोल कासार यांनी ह्यावेळी नमूद केले. VABCIDE group राष्ट्र उभारणीच्या कामात कोणत्या प्रकारे सहभागी होत आहे ते सांगितले व पुढे ते असेही म्हणाले की हा कार्यक्रम साध्या बँकवेट हॉल मध्ये न करता पंचतारांकित हॉटेल मध्ये करत असतांना मराठी उद्योजकांनी मानसिकता बदलावी, त्यांनी मोठी स्वप्नं पहावी हा आहे. आत्ता पर्यंतच्या सर्व VABCIDE कॉनक्लेव्ह मधील सर्वात यशस्वी कॉनक्लेव्ह करण्याची संधी सॅटर्डे क्लबने नाशिक नगर रिजनला उपलब्ध करून दिल्या बद्दल त्यांनी सॅटर्डे क्लबचे आभार मानले.