संगमनेरात बेवारस महिला – मुलांचा सुळसुळाट

0
2105
संगमनेरात बेवारस महिला – मुलांचा सुळसुळाट

बसस्थानकाची बनवली दुर्दशा – प्रशासनाचे कानावर हात

सक्तीच्या भीक मागणीने व्यापारी त्रस्त

युवावार्ता (प्रतिनिधी)
आजचीच बातमी आहे की, भारताने लोकसंख्येच्या दृष्टीने जगात अव्वल स्थान मिळवून चीनला मागे टाकले आहे. खरे तर ही फार आनंदाची किंवा अभिमानाची गोष्ट नाही. कारण याच बेसुमार लोकसंख्येपैकी अनेक लोक आजही बेकारीत व बेवारसपणे जगत आहेत. संगमनेर शहरात तर गेल्या काही दिवसांपासून अशा बेवारस महिला, मुलांचे जथ्थेच्या जथ्थे फिरताना दिसत आहे. एकेका महिलेकडे चार चार, पाच पाच मुले तेही बहुतेक सारख्या वयोगटातील. त्यामुळे या महिला नेमक्या कोण? त्यांच्याकडे असणारे मुले नेमके कुणाचे याची कुठलीही माहिती प्रशासनाला नाही. तसेच या महिला, मुले दिवसभर शहरात भीक मागत असतात, अनेक वेळा भिक्षेसाठी सक्ती करत असल्याने व्यापारी वर्ग हैराण झाला आहे.
संगमनेर शहराचे वैभव वाढविणारे बसस्थानक निर्माण करण्यात आले आहे. परंतु सध्या या बसस्थानकाचा ताबा हा भीकारी, बेवारस महिला, मुले, चोर, लुटारू, अतिक्रमणधारक व बेशिस्त पार्किंग वाल्यांनी घेतला आहे. त्यामुळे या बसस्थानकाची पुरती शोभा गेली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी बाहेरून असंख्य महिला, मुलांचे जथ्थेच्या जथ्थे ठाण मांडून बसले आहे. या महिलांकडे असंख्य मुले आहेत. सर्व मुले हे एक ते दहा वयोगटातील आहेत. हे मुले व या महिला दिवसभर बसस्थानक परिसरात व शहरातील बाजारपेठेत भीक मागत फिरत असतात.


डोक्याला पट्टी, एक मुल कडेवर, एक हाताला, एक पुढे एक मागे असा हा तांडा पैशांसाठी नागरिक, प्रवासी व व्यापार्‍यांकडे हट्ट धरत असतात. नाही दिले तर लवकर जात नाही, त्यांना हाकलून दिले तर प्रसंगी शिवीगाळ करायला हे लहान मुले, महिला पुढे मागे पहात नाही. दिवसभर या टोळ्या शहरातील अनेक दुकानांमध्ये घुसून एकप्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.
मुळात या महिला येथील नाहीत. या बाहेर गावातून संगमनेरात येतात व लोकांना भावनिक साद घालून पैसे गोळा करतात. इतक्या मोठ्या संख्येने या महिला, मुले असतांना त्यांच्या सोबत एकही पुरूष नाही. मग हे मुले नेमके कुणाचे? याबाबत या महिला नीट माहिती देत नाही. कोणतेही प्रशासन याचा शोध घेत नाही, की जबाबदारी घेत नाही. कचरा, भंगार गोळा करता करता काही महिला बांधकामावरील साहित्य चोरतात. बसस्थानकात पाकीटमारी, दागिने चोरणे च्या घटना घडत असताना अनेकांचा या महिलांवर संशय येतो परंतु कोणी त्याची चौकशी करत करत नाही. या महिलांच्या व भिकार्‍यांच्या वावरामुळे बसस्थानक असुरक्षित बनले आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे.


आपल्या देशात लोकसंख्येचा मोठा प्रश्‍न आहे. परंतू असे असले तरी शिक्षण हमी कायदा आहे. बालकामगार विरोधी कायदा आहे. त्यामुळे या महिलांकडे असणारी अनेक मुले शिक्षणापासून वंचित आहे. तसेच ही मुले भीक मागतात प्रसंगी पैशाससाठी काही कामे करतात. त्यामुळे शिक्षण हमी कायदा व बालकामगार विरोधी कायदा यांच्यासाठी लागू नाही का? असा प्रश्‍न खर्‍या अर्थाने निर्माण होतो. तसेच देशात मुलांची तस्करी हा मोठा प्रश्‍न उदभवला आहे. या महिलांकडे असणारे असंख्य मुले खरच त्यांची आहे का? त्यांचे पालक कोण आहे. याचा कधी कोणत्या यंत्रणेकडून शोध घेतला जातो की नाही. आणि जर घेतला जात नसेल तर या लहान मुलांचे भत्तिव्य अंधारमय असून समाजालाही घातक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here