शासन आपल्या दारी अन् विद्यार्थी, प्रवासी मात्र घरी

0
2007

संगमनेर बसस्थानक पडले ओस

संगमनेर प्रतिनिधी –
आज गुरुवारी शिर्डीत ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी स्वतः मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत अनेक मंत्री सोबत अनेक वरीष्ठ अधिकारी आले होते. त्यांच्या दिमतीला व आयोजित सभेला उपस्थित रहावे यासाठी जिल्ह्यातील अनेक बस डेपोतिल बस बुक करण्यात आल्या होत्या. एसटी महामंडळाच्या संगमनेर डेपोतीलही तब्बल ६२ एसटी बसेस या सरकारी कार्यक्रमाच्या दिमतीला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे संगमनेर बस स्थानकातून अनेक बसेसच्या फेऱ्या रद्द केल्याने आज गुरुवारी विद्यार्थी, नोकरदार आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. एकीकडे “शासन आपल्या दारी तर दुसरीकडे विद्यार्थी, प्रवासी मात्र घरी” अशी अवस्था पहायला मिळाली. विद्यार्थी आणि प्रवाशांना वेठीस धरून होत असलेल्या या कार्यक्रमाबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली. शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी उत्तर नगर जिल्ह्यातून शासकीय योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थींना बळजबरीने उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. तसेच सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, आशा वर्कर तसेच भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) च्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. यासाठी सुविधा म्हणून म्हणून त्यांच्या दिमतीला एसटी बसेस देण्यात आल्याने प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती. संगमनेर डेपोतील अनेक एसटी बसेस वापरल्या गेल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शाळा कॉलेजला कसे जायचे? ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी प्रवास करायचा कसा? असे प्रश्न छात्र भारती या विद्यार्थ्यांच्या संघटनेचे राज्य कार्यवाह अनिकेत घुले यांनी उपस्थित केले आहे.


गुरुवारी एसटी बसेसच्या ग्रामीण भागातील पूर्णतः आणि जिल्हा अंतर्गत व मोठ्या शहरातील बहुतांशी फेऱ्या आगारप्रमुखांनी रद्द केल्याने सरकारला या मुलांच्या शिक्षणाबद्दल गांभीर्य आहे का? एसटी बसेस बंद झाल्या तर 70 टक्के पेक्षा जास्त विद्यार्थी शाळा, महाविद्यालयात जाऊ शकणार नाही. एसटी बस बंद असेल तर मुलींचे शाळा महाविद्यालय थेट बंद होते. सरकारने शालेय मुलांचे नुकसान करून एसटी बसेस वापरण्यापेक्षा खाजगी प्रवासी गाड्यांची व्यवस्था का केली नाही. असा प्रश्न निर्माण होतो. ग्रामीण भागात वेळेवर खासगी वाहने उपलब्ध होत नाही, मुली, प्रवासींच्या सुरक्षेची हमी नाही तसेच पास असताना बसणारा आर्थिक भुर्दंड वेगळा. त्यामुळे शासन आपल्या दारी पण विद्यार्थी राहिले घरी अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here