लायन्स संगमनेर सफायर आयोजित राष्ट्रीयत्व आणि महिला सुरक्षा व्याख्यान उत्साहात
संगमनेर (प्रतिनिधी) – भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने लायन्स क्लब संगमनेर सफायर आयोजित स्वातंत्र्योत्सव या कार्यक्रमामध्ये प्रखर वक्ते सुनील देवधर यांनी राष्ट्रीयत्व आणि महिला सुरक्षा या विषयावर ओजस्वी व्याख्यान दिले. संपूर्ण भारतातील महिलांनी राजमाता जिजाऊ यांचा आदर्श अंगी बाळगणे आवश्यक असल्याचे ते यावेळी म्हणाले. या व्याख्यानासाठी संगमनेरमधील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
प्रकल्प प्रमुख आणि लायन्स संगमनेर सफायरचे संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी यांनी सुनिल देवधर यांचे स्वागत व सत्कार केला. प्रकल्प प्रमुख श्रीनिवास भंडारी यांनी मंचावर उपस्थित शिवबच्चन गौड, अध्यक्ष अतुल अभंग यांनी भारत सिंह तसेच उद्योजक महेश लाहोटी व राजेश लाहोटी यांचा सत्कार केला. याप्रसंगी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे अजित माळी, सौरभ कश्यप यांचाही सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर सेक्रेटरी जितेश लोढा, खजीनदार कल्पेश मर्दा आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगतात अतुल अभंग यांनी क्लबअंतर्गत चालणाऱ्या विविध उपक्रमांची उपस्थितांना माहिती दिली. महेश लाहोटी यांनी भारतीय जनता पक्षाच्या आंधप्रदेश येथील सहप्रभारी सुनिल देवधर यांचा थोडक्यात परिचय दिला. प्रकल्प प्रमुख गिरीश मालपाणी यांनी गेल्या 20 वर्षांपासून संगमनेर सफायर स्वातंत्र्योत्सव उपक्रम राबवित असून मनींदरजितसिंग बिट्टा, आफळे महाराज, राहुल सोलापूरकर, संजय मालपाणी आदी वक्त्यांनी आपली व्याख्याने दिली असल्याचे सांगितले. सामुहिक नृत्य स्पर्धा हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रकल्प प्रमुख श्रीनिवास भंडारी यांनी प्रमुख अतिथी आणि उपस्थित श्रोत्यांचे विशेष आभार मानले. ला. सुदीप हासे यांनी प्रमुख व्याख्याते सुनिल देवधर यांचा परिचय उपस्थितांना करून दिला. सुत्रसंचालन प्रा. जितेंद्र पाटील यांनी केले.
सुनिल देवधर यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, आपण आपल्या राष्ट्राविषयी अभिमान बाळगून या भारतमातेची सेवा केली पाहिजे. राजमाता जिजाऊ या उत्कृष्ट प्रशासक, न्यायाधिश, शूरवीर, प्रखर राष्ट्रभक्त, संस्कृतीचा अभिमान असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या मातोश्री होत्या. त्यांचा आदर्श आजच्या तरूण मुली आणि महिलांनी अंगी बाळगला पाहिजे. भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना नेहमीच प्रथम स्थान देण्यात आले. रामायणातील सिता माता, कौशल्या, सुमित्रा, कैकेयी, उर्मिला, मंदोधरा यांनी राजकारभारात लक्ष घातले. या महिला दुपट्टा घेऊन शांत बसल्या नाहीत. महाभारतामध्ये गंगा, उत्तरा, माद्री, सुदेश्ना, चित्रांगदा यांनीदेखील आपआपल्या पध्दतीने राजकारभारात लक्ष दिले. राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, लक्ष्मी सेहगल, कल्पना दत्ता, प्रितीलता वड्डेदार यांनी पराक्रम, संस्कार, शिक्षण, स्वातंत्र्य यामध्ये अनन्यसाधारण योगदान दिले आहे असे सुनिल देवधर म्हणाले.
आजच्या तरूण मुलींनी संस्कार, इतिहास आणि मनाने कणखर राहून अनिष्ठ प्रवृत्तींना आपल्यापासून दूर ठेवले पाहिजे. काही वेळेस बळजबरीने जात बदलवून नंतर अमानुष छळ होतो हेही लक्षात घेतले पाहिजे असे ते म्हणाले. जुन्या ग्रंथांमध्ये आपण कसे रहावे, बोलावे, व्यवहार करताना कसा करावा हे आधीच सांगून ठेवले असून इंग्रजांनी इंग्रजीतून तेच सागितल्यावर आपण भाळून जातो. मात्र रामायण, गीता, ज्ञानेश्वरी यासारख्या ग्रंथांमध्ये आचरण, विचार याविषयी अध्याय नमूद केलेले आहे. इंग्रजी हे केवळ माध्यम असून मातृभाषेतून यापुढे शिक्षण व्हावे असे परखड मत यावेळी सुनिल देवधर यांनी व्यक्त केले.
व्याख्यानानंतर वंदे मातरम, ए मेरे वतन के लोगो आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी मेणबत्ती पेटवून शहीदांना श्रध्दांजली वाहण्यात आली.