स्वातंत्र्यदिनी संगमनेरात सुनील देवधर यांचे व्याख्यान

लायन्स सफायरचा उपक्रम, राष्ट्रीयत्व आणि महिला सुरक्षा यावर मार्गदर्शन

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार्‍या लायन्स क्लब संगमनेर सफायरने यंदा संगमनेरकरांना वैचारिक मेजवाणी देणारा कार्यक्रम आयोजित केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून अहमदनगर जिल्हा प्रचारक ते व्हाया पूर्वांचल मानवसेवेचा सुगंध पसरवित भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिवपदापर्यंत पोहोचलेल्या सुनील देवधर यांच्या ‘राष्ट्रीयत्व आणि महिला सुरक्षा’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. देवधर यांच्या ओजस्वी वाणीतून राष्ट्रीयत्व श्रवणं करणे म्हणजे पर्वणीच समजले जाते.


लायन्स क्लब संगमनेर सफायरचे संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी व श्रीनिवास भंडारी यांच्या संकल्पनेतून गेल्या दोन दशकांपासून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला स्वातंत्र्योत्सवाचे आयोजन केले जाते. या निमित्ताने आजवर विविध सांस्कृतिक, सामाजिक, देशभक्तीपर कार्यक्रमांसह स्पर्धा आणि व्याख्यानांचे आयोजन केले गेले आहेे. यापूर्वी श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर, दहशतवाद विरोधी मंचचे अध्यक्ष मनिंदरजीतसिंग बिट्टा, राष्ट्रीय कीर्तनकार डॉ.चारुदत्त आफळे, प्रेरक वक्ते डॉ. संजय मालपाणी आदींची व्याख्याने झाली आहेत.
सुनील देवधर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अहमदनगर जिल्हा प्रचारकपदी कार्यरत असतांना जिल्ह्यात खूप काम केले आहे. अतिशय समर्पित वृत्तीने राष्ट्राला वाहून घेतलेल्या देवधर यांना त्यानंतर पूर्वांचलची जबाबदारी सोपविण्यात आली. तेथेही त्यांनी आपल्या कामाची अमिट छाप सोडतांना कधीकाळी डाव्या विचारांकडे झुकलेल्या मेघालय, त्रिपुरासारख्या पूर्वांचलमधील राज्यांमध्ये राष्ट्रीयता रुजविण्याचे धाडस केले. अगदी सायकलवरुन उंचच उंच डोंगरदर्‍यात फिरुन त्यांनी दुर्गम भागातील नागरिकांना विपरित स्थितीतही राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे काम केले.


गरीब, अनाथ, निराधार मुलांसाठी कार्यरत असलेल्या ‘माय होम इंडिया’ या दिल्लीतील सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आजवर देशभरातील हजारों मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. देशासाठी वाहून घेतलेल्या देवधर यांच्यावर आता भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अतिशय अभ्यासू आणि व्यासंगी व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणार्‍या देवधर यांच्या ओजस्वी वाणीतून राष्ट्रभक्तीचा महिमा ऐकण्याची संधीच या निमित्ताने संगमनेरकरांना मिळणार आहे.
येत्या मंगळवार 15 ऑगस्ट रोजी साय. 7 वाजता मालपाणी लॉन्स, कॉलेज रोड, संगमनेर येथे होणार्‍या या व्याख्यानाला संगमनेरकरांनी अअवश्य उपस्थित रहावे असे आवाहन प्रकल्प प्रमुख गिरीश मालपाणी, श्रीनिवास भंडारी, सफायरचे अध्यक्ष अतुल अभंग, सेक्रेटरी जितेश लोढा, खजिनदार कल्पेश मर्दा, सदस्य धनंजय धुमाळ, मिलिंद पलोड, उमेश कासट, डॉ.जितेंद्र पाटील, डॉ.भाऊ जाखडी, महेश डंग, प्रशांत गुंजाळ, हरमितसिंग डंग, अनिरुद्ध डिग्रसकर, संतोष अभंग, सुदीप हासे, सुनिता मालपाणी, नम्रता अभंग, सोनाली नावंदर, सपना डंग आदींनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख