बनावट वैद्यकीय व्यवसायावर धडक कारवाई

0
4

चौघांवर गुन्हा दाखल

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – तालुक्यातील निमोण परिसरात विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांवर संगमनेर तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी दुपारी निमोण येथे काही व्यक्ती कोणतीही अधिकृत वैद्यकीय पात्रता नसताना औषधांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत छापा टाकला.

या कारवाईत मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची संशयित औषधे जप्त करण्यात आली. या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी अतुल गणेश घुले (वय 29, निमोण प्राथमिक आरोग्य केंद्र) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 156/2027 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांवर वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम 1961 चे कलम 33 तसेच राष्ट्रीय चिकित्सा आयोग अधिनियम 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात डॉ. वसंत सांडू लांडगे, सतीश कचरू शिरसाट (वय 37, चालक), अरुण शांताराम सरोदे (वय 49) आणि आदित्य वसंत लांडगे (वय 27) या चौघांचा समावेश असून ते छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून श्वासयोग चूर्ण, डायबेटिक पावडर, वाताहार औषधे, सर्वशक्ती पावडर, सुपारी पाक, त्वचारोगावरील औषधे, विविध गोळ्या व द्रव औषधे अशा विविध प्रकारच्या औषधांचा साठा जप्त केला आहे. या औषधांवर आवश्यक माहिती नसल्याने त्यांची वैधता संशयास्पद असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे व पोलीस उपनिरीक्षक एम. व्ही. शिंदे यांनी तातडीने कारवाई केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत असून, या रॅकेटमागील आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घेतला जात आहे.
बनावट वैद्यकीय व्यवसायामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here