43.90 लाखांचा मुद्देमाल जप्त
संगमनेरच्या तरूणाईची दिशा कोणती ? किती घरे होणार उध्वस्त ?

आरोपीच्या चौकशीतून आणखी मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता
संगमनेर (प्रतिनिधी)-
संगमनेर शहरात गेल्या काही दिवसांत अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रकार धडाधड समोर येत असताना आता या रॅकेटमध्ये अतिशय घातक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘एमडी’ (मेथेड्रोन) ड्रग्सचा समावेश झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार आज (ता. 21) पहाटे शहर पोलिसांनी संयुक्त पथकासह धडक कारवाई करत पुणे–नाशिक महामार्गावरील गणेशनगर परिसरातून तब्बल 43 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल आणि टोयोटा फॉर्च्यूनर गाडी जप्त केली आहे. या प्रकरणी आशिष सुनीलदत्त मेहेर (वय 20, रा. सातपूर, नाशिक) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या चौकशीतून अजून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.

चित्रपटाला शोभेल अशी पोलिसांची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक समीर बारवकर, उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्या पथकाने ही कारवाई आज शुक्रवार पहाटे 3 वाजता केली. गोपनीय माहितीच्या आधारे संशयित वाहनावर लक्ष ठेवण्यात आले होते. संबंधित वाहन पुण्याकडून आले व नाशिक रस्त्यावरील परिवार शॉपिंग सेंटरच्या मागील बाजूस थांबले. सदर वाहन एमडी तस्करीसाठी असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी चारही बाजूंनी नाकाबंदी करून चित्रपटातील एका रोमांचक प्रसंगाला साजेशी कारवाई करत वाहनावर झडप टाकली. वाहनाची झडती घेताना आत मनाई असलेला एमडी ड्रग्जचा मोठा साठा सापडला. आरोपीला ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तरुणाईचा वाढता कल चिंताजनक –
एमडीसारख्या प्राणघातक अमली पदार्थांचा साठा संगमनेरमध्ये हातोहात चालत असल्याचे या कारवाईने स्पष्ट झाले आहे. वाढत्या ड्रग्ज तस्करीमुळे शहराची अवस्था ‘उडता संगमनेर’ कडे वाटचाल करत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः तरुण वर्ग या नशेच्या आहारी वेगाने जात असल्याचे गंभीर संकेत मिळू लागले आहेत. नशेच्या व्यापाराला मूळापासून नष्ट करण्यासाठी पुढील काळात अधिक कडक व सखोल तपास सुरू ठेवण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.




















